Saturday, July 13, 2019

24

1) मुरघास करण्यासाठी मकेची कुट्टी करणे व ती टाकीत भरणे हे काम सोपे नाही. त्यात सोपे पणा अनानेसाठी गेल्यावर्षी थोडं डोकं चालवलं होतं.
2) खरं तर मुरघासाचा टाकीजवळ मका आणून ट्रॅक्टर माउंटेड चाफ कटर च्या साह्याने मका कुट्टी करून टाकीत सहज भरता येते. हा चाफ कटर मका कुट्टी पण करतो आणि टाकीत पण भरतो. पण याची किंमत जास्त असून सर्व सामान्यांच्या आवाक्यात नाही.
3) माझे एक गुरुजन जे शेतकरी आहेत ते हा चाफ कटर भाडोत्री देतात. शेतात चाफ कटर नेऊन मकेची कुटी करून ट्रॉलीत भरायची आणि पुन्हा ट्रॉली मुरघासाचा खड्यात किंवा टाकीत ओतायची.
4) मी गेल्या वर्षी छोटी कुट्टी मशीन ट्रॉलीत ठेवली, ट्रॉली सह कुटी यंत्र शेतात नेऊन विजेच्या खांबावरून वीज घेऊन ट्रॉलीत कुट्टी केली. पुन्हा हे सगळं साडगं मकेच्या कुट्टी सहित मुरघासाचा टाकीजवळ आणायचं; त्यातली कुटी टाकीत भरायची व पुन्हा कुट्टी यंत्रासह ट्रॉली शेतात न्यायाची.
5) या पद्धतीत वेळ, श्रम वाचले, मुरघास करायला सोपं गेलं.
खालील चित्र पहावे.

बाळू मोटे


23

1) चारा साठवणूक करणे हि बंदिस्त शेळी पालनाची विशेषतः कोरडवाहू भागातील महत्वाची गरज आहे. चाऱ्याचा पुरेसा स्टोक असणे व तो पाऊस, ओलसरपणा, वारा, ऊन इ पासून उच्च प्रतीचे संरक्षण करणे अति आवश्यक ठरते.
2) खरे तर साठवलेला चारा शेळ्यांना खाऊ घालू नये असं माझं मत आहे; त्याच कारण म्हणजे एक तर त्याची किंमत वाढते व दुसरे म्हणजे त्याच्यातले अन्नघटक काही प्रमाणात कमी होतात उदा प्रोटीन 2 %नि कमी होते आणि तिसरं म्हणजे त्याची palatability/ स्वादिष्टता कमी होते.
3) परंतु कोरडवाहू भागात किंवा केवळ ज्या ठिकाणी वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होईल याची हमी देता येत नाही अश्या ठिकाणी चारा साठवणूक करावा लागतो तरच बंदिस्त शेळी पालनास अर्थ आहे नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अश्या ठिकाणी चाऱ्याची सकस्ता हा दोन नंबर चा मुद्दा होतो आणि चाऱ्याची उपलब्धता हा एक नंबर चा मुद्दा होतो.
4) चारा साठवण्याचा दोनच पद्धती चांगल्या आणि व्यवहार्य आहेत, असे मी माझ्या अभ्यासावरून व अनुभवावरून सांगू इच्छितो. एक म्हणजे सुकी पद्धत त्याला वैरण वगैरे तर दुसरी म्हणजे ओली पद्धत त्याला मुरघास वगैरे आपण म्हणतो. सुक्या पद्धतीत चारा उन्हात वळवून त्यातील ओलावा 10-8टक्के पेक्षा कमी करून अखंड किंवा कुट्टी करून साठवतात. ओल्या पद्धतीत चारा 60-65 टक्के ओलावा असताना व कुट्टी करून आंबवून किंवा काही रसायनांचा उदा युरिया वैगरे चा उपयोग करून हवाबंद पद्धतीने साठवतात.
5) पारंपरिक वैरण साठवण्याची पद्धत सर्वांच्या परिचयाची असते.तीस पाऊस, ओलावा,वारा, उंदीर, आग इ पासून जपावे लागते.
6) मुरघास बनवण्याचे व ओला चारा साठवण्याचे तंत्र आता बहुअंशी अभ्यासाचे, परिचयाचे व अनुभवाचे झाले आहे. मुरघास कसा बनवावा, साठवावा व वापरावा याविषयी यथे उहापोह करावयाचा नाही मुरघसच्या अथ पासून इथपर्यंतच्या  प्रक्रियेत ज्या काही नकारात्मक बाजू पहिलारू शेतकऱ्याला भेडसावतात त्या बद्दल फारसं कोणी बोलत नाही. कानाला चिमटा...! बऱ्याचदा या चिमट्यातली वेदना समजून घेण्याइतपत आपले विचारचक्षु तीक्ष्ण नसतात! मी या चॅनेल वर लिहितो, हे अनुभवांचे/आत्मक्लेशाचे फुगे आहेत, हे किती फुगवायचे आणि कोणाला वाटायचे, विकत कि फुकट!
हे असं केलं नसतं तर बरं झालं असत, अस वाटतं ते केल्यावरच! एका विकसनशील देशातल्या नागरिकांकडून आपण आणखी काय अपेक्षा ठेवणार! यशाची गुरुकिल्ली सांगणारे बरेच भेटले, अपयशाचा मास्टर पीस उलगडून दाखवणारा वाटाड्या सहसा नाही भेटला.
पहिल्या प्रयत्नात जे नुकसान होतं ते पाहून पहिल्या प्रयत्नांत जो उत्साह असतो त्याचे रूपांतर failurnes मध्ये किंवा प्रयत्नांचा पराभव होतो. दुरितांचे तिमिर जाण्यासाठी मुरघसच्या या पहिल्या प्रत्नाचा अयशस्वी पराभव स्वीकारण्याची तयारी देखील सुरवातीलाच करून ठेवायला हवी.
7) एकदम मोठी 60 टन,80,200 टन टाकी बांधण्यापेक्षा छोट्या शेळी पालकाने प्रत्येकी 10 टनांच्या पाहिजे तितक्या टाक्या बांधाव्यात.
8) मुरघास उघडताना टाकीच्या 7 बाजूंपैकी कोणत्याही सोईस्कर एका बाजूकडून ती बाजू संपूर्ण उघडेल या पद्धतीने उघडावा व पूर्ण बाजूचा थोडा भाग खरवडून मुरघास काढावा. समजा आपण वरच्या बाजूने मुरघास उघडणार असू तर वरती घातलेला कागद पूर्ण काढावा व पूर्ण बाजू खरवडून मुरघास काढावा. मोठ्या टाकीत असं शक्य होत नाही.
9) मुरघास शक्यतो वरून उघडावा व वरून खाली काढावा.
10) मुरघासाचा माझा पहिला प्रयोग हा वेंधळ वेडा होता. Kvk त असताना बरेचदा मुरघास बनवताना पाहिला, शेतकऱ्यांना सांगितलं, अभ्यास वैगरे केला, डेमो वैगरे दिले. तरीही माझ्या पहिल्या छोट्या प्रयोगात अर्धा मुरघास कुजका निघाला. मी पक्व मका वापरली, चुकीच्या पद्धतीने उघडला, जेवढा रोजचा उपसा असायला हवा तेवढा केला नाही, भिंतींना चांगलं प्लास्टर नव्हतं आणि पावसापासून पुरेसं संरक्षण नव्हतं.
11) मूरघासात मीठ, गुळ, मिनरल मिकश्चर आदी तस्तम पदार्थ वापरण्याचा सल्ला दिला जातो. माझ्या मते ते काहीही वापरू नये. मूरघासात सायलेज कल्चर किंवा ते नसेल तर दही किंवा ताक वापरावे. येन केन प्रकारे त्यात लेक्टॉ बॅसिलस नावाचे जिवाणू जाणे आवश्यक असते.
12) मुरघास शेणा मातीने बंद करण्याचा सल्ला दिला जातो. खरोखरीच तसं शक्य होतं काय? हवा बंद करण्याची दुसरी कोणती सोपी पद्धत आहे?
13) मुरघास शक्यतो मका पिकाचाच करावा, इतर अनेक पिकांचा करता येतो पण करू नये असं मला वाटतं.
14) मुरघासाची टाकी अभ्यास करून बांधावी. टाकी बंधातानाच चुका होतात आणि मग ते कायमचं निस्तराव लागतं. या साठी प्रथम छोट्या प्रमाणात डेमो करून पहावा.
15) नकारात्मक अनुभवांचे किंमत नकारात्मक असते कि काय? ह्यांची देवाण घेवाण केली नाही तर आपण कसले मैत्र जीवांचे परस्परे पडो.
22

1) जून महिन्यात दोन शेळ्यांना 2-2 करडे झाली व दुसऱ्या दोन शेळ्यांना 1-1 करडू झाले. त्यांच्यापासून आपणास मिळणारे उत्पन्न कसे आहे व ते आपणास परवडते का त्याचा विचार या पोस्ट मध्ये करायचा आहे.
2) एका शेळीचा तिच्या गाभण काळातला व तिच्या वेतातील पहिल्या तीन महिन्याचा तसेच तिच्या करडांचा पहिल्या तीन महिन्याचा संगोपनाचा खर्च असं सर्व गृहीत धरून 375 रु प्रति महिना मनाला आहे. म्हणजे 8 महिन्याचा एकूण खर्च (फक्त चारा व खुराक) हा 3000 रु होतो.
3) सोबतच्या चित्रात करडांचे 90 दिवसांची वजने काढली आहेत. 90 दिवसाचं वजन अधिक जन्मतः वजन गुणिले 200 रु असं गणित करून त्यांची विक्री किंमत काढली आहे.
4) पहिल्या शेळी पासून मिळणारा निवळ नफा :-3950-3000=950 रु
दुसरया शेळी पासून:-3340- 3000=340 रु
तिसऱ्या शेळीपासुन :-4445- 3000=1445रु
4थ्या शेळीपासुन:- 4354-3000=1354रु.
5) आपल्याला एका शेळी पासून 8 महिन्यात किमान रु 3000/- निवळ नफा मिळायला हवा.
6) एका शेळीला जेंव्हा एकच करडू होते तेंव्हा तिच्याकडून त्या वेतात जास्त निवळ नफा मिळण्याची काही अश्या राहत नाही.
7) 2 करडे चांगल्या वजनाची मिळण्याकरिता शेळीची अनुवंशिकता चांगली असणे आवश्यक ठरते.
8) चारा घरचा असल्यास चार्यापासून जे उत्पन्न मिळेल ते नफ्यात धरले नाही; ते धरल्यास नफा आणखी वाढेल.
9) खुराक घरचा असल्यास वरील प्रमाणे नफा आणखी वाढेल.
10) मार्केटिंग कौशल्य नुसार नफा आणखी वाढेल.


बाळू मोटे बारामती


21

1) या पोस्ट मध्ये मी माझ्याबद्दल थोडक्यात लिहिणार आहे, या लिखाणाचा उद्देश केवळ एवढंच आहे; या चॅनेल चा लेखक नेमका कोण आहे, त्याचा अनुभव काय आहे, हे आपणास समजावं.
2) पोस्ट क्रं 1 मध्ये मी आत्मप्रौढी बाबत लिहिलं होतं, इथं कदाचित ते होईल असं वाटत; काही अंशी ते अपरिहार्य आहे असं मला वाटतं. स्वतः बद्दल सांगणं, स्वतःची ओळख करून देणं यात काही गैर आहे, असही काही नाही, बहुतेक जणं हे विधान मान्य करतील.
3) आपण नेहमी तञ् किंवा अनुभवी लोकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, नव्हे तसा तो आवर्जून करणे हे आपल्याच हिताचे असते.
4) मी कृषी शाखेचा पदवीधर आहे (BSc. Horticulture). 2008 ते 2014 पर्यंत मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थेत कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होतो. kvkbaramati. com नावाच्या वेबसाइटवर आपण या कृषी विज्ञान केंद्राची माहिती पाहू शकता. हे पद सर्वात कनिष्ठ तांत्रिक पद होते. माझ्याकडे 2008 ते 2012 पर्यंत टोमॅटो उत्पादन वाढी संबंधी एक केंद्र शासनाचा प्रकल्प होता, त्यानंतर पुन्हा 2011 ते 2014 पर्यंत आणखी एक दुष्काळ निवरणासंबंधी करावयाच्या उपाय योजनांचा प्रकल्प होता. हि माझी तिथली प्रमुख कामे. या व्यतिरिक्त मी तेथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, kvk च्या उत्पादनांचे प्रदर्शन लावणे, संस्थेच्या अंतर्गत रिपोर्टींग व डॉक्युमेंटेशन करणे, स्वयंचलित खते व सिंचन देणारी यंत्रणा चालवणे इ कामे करत असे. यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे मार्फत तेथे कृषी पदवीचा कोर्स चालवला जातो, यात मला मुलांना भाजीपाला हा विषय शिकवावा लागे. दर शनिवारी व रविवारी याच्या तासिका असायच्या. आम्ही एक इटली या देशातून टोमॅटो रोपे लागवड यंत्र आणले होते, त्याचा काही उपगो होत नव्हता. मी त्यात थोडीशी अड्जस्टमेंट करून ते यंत्र ऊस रोपे लावण्याकरिता तयार केले व त्याची यशस्वी चाचणी देखील घेतली. या संबंधीचा व्हिडिओ आपणास kvk च्या वेबसाइटवर किंवा यु ट्युब वर पाहायला मिळेल. Kvk च्या नवीन इमारतीचे उदघाटन करण्याकरिता महामहिम राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी kvk त आले होते, या कार्यक्रमात kvk च्या वीस वर्षाच्या कामाचा आढावा घेणारे एक पुस्तक प्रकाशित झाले होते, त्या पुस्तकाचा कच्चा मसुदा मी व माझ्या सहकार्यांनी तयार केला होता. हा मसुदा तयार करण्यासाठी आम्हाला साधारण वीस दिवस लागले. या कमी आम्ही kvk चे सर्व जुने दप्तर चाळून काढले, एक प्रकारचे ते संशोधन होते.  दुष्काळ निवारण संदर्भातल्या उपाय योजना बाबत मी एक पुस्तक तयार केले होते, ते संपादनाची अंतिम टप्प्यात आले होते परंतु नोकरी सोडल्यामुळे ते काम पूर्ण झालं नाही. माझे ऍग्रोवोंन मधून बरेच लेख प्रकाशित झाले आहेत.Kvk मध्ये एक किऑस्क किंवा टच स्क्रीन संगणक आहे, त्यावर एक ppt बेस प्रोग्रॅम मी बनविला होता, अर्थात मी नोकरी सोडल्यामुळे तो अपुर्ण राहिला आहे. तसेच एक LED टीव्ही आहे त्यावर kvk च्या उत्पादनांची माहिती दाखवली जाते. ती माहिती मी बनविली होती. शेतकरीयांच्या ऑनलाइन विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं काम मी एक वर्ष केलं होतं, आता ती वेबसाईट कधी बंद असते तर कधी चालू. (Aaqua.org). मी काम करत असलेल्या दुसऱ्या प्रोजेक्ट ची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात अली, kvk च्या वतीने माझा व गावाच्या वतीने एक शेतकरी श्री पांडुरंग वाबळे यांचा सत्कार आयसीआर चे त्यावेळी चे उपमहासंचालक श्री एस अय्यपन यांचे हस्ते झाला. त्यावेळला आम्हाला विमान प्रवासाचा योग्य व दिल्ली फिरून पाहण्याचा योग्य देखील kvk मुळे मिळाला.
Kvk ला अनेक पुरस्कार मिळालेत, त्यापैकी दोन पुरस्कारांसाठी मी प्रपोझल्स बनविली होती. Fao यांचे एक पिकांना पाणी देण्यासंबंधीचे CROPWAT नावाचे सॉफ्टवेअर ऑनलाइन मोफत मिळते, याचा मी अभ्यास करून स्वयंचलीत प्रणालीवर पाणी मोजून देण्याचे प्रयोग केले होते. Kvk तील कामाबाबत आणखी बरेच लिहिता येईल. तेथील माझ्या गुरू व kvk च्या प्रमुख डॉ कादरभाई या होत्या. खरं तर मी जे काही तेथे काम केलं ते केवळ त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला करता आलं. त्या नसत्या तर कदाचित मी तेथे एक वर्ष देखील नोकरी करू शकलो नसतो. एखाद्या संस्थेचा प्रमुख कसा असावा, मॅनेजमेंट कसं असावं, नियोजन आणि ध्येय धोरण कशी आखावी आणि राबवावेत, प्रेझेन्टेशन कशी करावीत हे सर्व आणि आणखी कितीतरी बाबींचे आदर्शवत उदाहरण म्हणजे डॉ कादरभाई या होत. या कार्यकाळात अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणे घेण झालं. बराच भारताचा बराच भाग फिरायला मिळाला. मी kvk चा व डॉ कादरभाई यांचा सतत ऋणी आहे.
5) शेळ्या व मेंढ्या सांभाळणे हा आमच्या फॅमिलीचा पारंपरिक व पूर्वापार व्यवसाय आहे. माझ्याकडे सध्या 200 मेंढरं आहेत आणि ती सतत फिरतीवर असतात. पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील बराचसा भाग मी मेंढरमागे सुट्टीच्या (दिवाळी, उन्हाळा इ) फिरून काढला आहे. अनेक जणांच्या शिव्या खाल्या, काही ठिकाणी मार देखील खाल्ला आहे

. सध्या मेंढरमागे माझी आई, मावशी मावसभाव असतात. मी इकडे  शेळी पालन व शेती सांभाळून त्यांना मदत करत असतो. आर्थिक स्थिती बेताची असल्याने माझं शेळी पालन मंद गतीने पुढे जात आहे.
6) 2014 मध्ये नोकरी सोडल्यावर काही ठिकाणावरून नोकरी साठी बोलावणे आले होते, पण शेळी पालन करायचं हा निश्चय करून मी आमच्या कोरडवाहू शेतीत आलो. अजूनही येथेच शेळी पालनात करियर करायचं या निर्णयावर मी ठाम आहे. (उद्या कदाचित हा निश्चय बदलू शकतो.).

धन्यवाद.
20

1) अती तेथे माती अशी आपल्याकडे एक म्हण सर्वमुखी आहे.
2) सुवर्णमध्य साधने म्हणजे एखाद्या बाबीचा समतोल साधने होय.
3) सॅच्युरेशन म्हणजे संपृक्त स्थिती होय. पाणी धरून ठेवणे हा मातीचा एक भौतिक गुणधर्म आहे. मातीमध्ये सतत पाणी ओतत राहिलो तर माती स्वतःमध्ये पाणी धरून ठेवते पण तिच्या एक विशिष्ट पातळी पर्यंत धरून ठेवते, जेंव्हा हि विशिष्ठ पातळी गाठली जाते आणि अश्या वेळेला जेंव्हा पाण्याचा एक थेंब जरी टाकला तरी तो वाहायला लागतो. या स्थितीला ती माती पाण्याने संपृक्त झाली किंवा सॅच्युरेट झाली अस आम्ही (agricos) म्हणतो.
4) शेळ्यांना व करडांना जो चारा, खुराक किंवा टॉनिक वैगरे आपण देतो त्याबाबतीत आपण या सॅच्युरेशन च्या पॉईंट चा विचार करायला हवा.
5) जसा जसा सॅच्युरेशन चा पॉईंट जवळ येत जाईल तसे चारा खुराक इ वाया जाण्याच प्रमाण वाढत असणार.
6) प्रमाणबद्ध व स्टॅण्डर्ड वजन वाढीकरिता जातीपरत्वे किती चारा खुराक वैगरे दयावा जेणे करून चारा खुराक जास्त होऊन वाया जाणार नाही याचा काही अभ्यास कोठे झाला आहे काय?
7) माझ्या मते खुरकाच्या बाबतीत करडांना व शेळ्यांना तेवढा खुराक द्यावा, जेवढा त्या एका दमात खाऊन संपवतात. म्हणजेच खाऊन थोडा शिल्लक राहायला हवा.
8) एका दमात खाऊन झाल्यानंतर त्यांचं पाहिलं मानसिक समाधान(जे पचन संस्थेशी अत्यंत निगडित आहे) म्हणजेच पाहिलं सॅच्युरेशन होईल.
9) अशी किमान तीन सॅच्युरेशन होणे कमाल वजन वाढीकरिता आवश्यक आहेत असं माझं सध्याचं मत आहे (उद्या कदाचित बदलू शकेल).
10) पहिल्या सॅच्युरेशन ला जास्त खुराक खातील व विष्ठेतून, मूत्रातून कमी वाया जाईल, दुसरंया सॅच्युरेशन मध्ये खुराक पहिल्या पेक्षा कमी खातील परंतु विष्ठेतून, मूत्रातून पहिल्या पेक्षा जास्त वाया जाईल तर तिसऱ्या सॅच्युरेशन मध्ये खुराक दुसऱ्या पेक्षा कमी खातील परंतु विष्ठेतून, मूत्रातून दुसऱ्या पेक्षा जास्त वाया जाईल.
11) मला वाटत प्रत्येक शेळी पालकाने आपल्याला किती खुराक देणे परवडते याचा बारकाईने अभ्यास करणे व त्याबरोबरच कमाल परतावा देणारी वजन वाढ कशी मिळवता येईल याचा अभ्यास करायला हवा.
12) वरील विवेचन माझे स्वतःचे (बाळू मोटे) असून त्यासंदर्भात मला कोणताही शास्त्रीय माहितीचा स्रोत मिळाला नाही, सबब या माहितीचा थेट वापर करण्यापेक्षा हि माहिती अ ब क ड समजून आपण येथून पुढील माहिती अनुभवण्यास सुरवात कारावज हि विनंती.
19

1) मिनरल मिकश्चर शेळ्यांच्या आहारात दररोज वापरले पाहिजे, असं सगळे सांगतात आणि ते बरोबर देखील आहे. प्रश्न असा आहे कि ते नेमकं शेळ्यांना कसं खाऊ घालायचं आणि नेमकं किती व कोणत्या कंपनीचं खाऊ घालायचं?
2) शेळ्यांना खुराक व चार्यातून त्यांच्या शरीरासाठी आवश्यक सर्व खनिज व जीवनसत्वे कमी अधिक प्रमाणात मिळतात. भौगोलिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी काही अन्नद्रवांची मतीमध्येच कमतरता असते, त्यामुळे ती पुढे पिकात येते व त्यानंतर त्याच अन्नद्रव्याची कमतरता जनावरांमध्ये देखील येते. हे सर्व सुसंगत आहे.
3) उदा. बारामती परिसरात बहुतांश जमिनीमध्ये Zn झिंक व Mg मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते. म्हणून मका पिकास एकरी 10 किलो झिंक व मॅग्नेशियम देण्याची हमखास शिफारस केली जाते. जर अशी कमतरता असलेल्या जमिनीत मका चारा पीक घेतलं आणि त्यास हि दोन्ही अन्नद्रव्य वरखातातून दिली नाहीत तर चार्यातून हि अन्नद्रव्य जनावरांना मिळणार नाहीत किंवा कमी प्रमाणात मिळतील. अडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार?
4) अश्या प्रकारची खनिजांचे व क्षारांची कमतरता जनावरास पडू नये म्हणून मिनरल मिकश्चर द्यायलाच हवे. विशेषतः बंदिस्त शेळी पालनात तर गरजेचं आहेच.
5) मेंढ्याना 20 ppm पेक्षा जास्त जर तांबे हा घटक दिला तर त्याची toxicity (विषारी पणा) येते. शेळ्यांमध्ये देखील येते पण मेंढ्या जास्त सेन्सिटिव्ह असतात.
6) ऍग्रिमीन फोर्ट नावाच्या एका उत्पादनात 1 किलो पावडर मध्ये 1200 mg एवढं कॉपर म्हणजे तांबे असते असे दिले आहे. हि पावडर 25 ते 30 ग्रँम दररोज शेळीला देण्ययाची शिफारस आहे.
7) 1 किलोत(1000ग्राम) 1200 mgम्हणजे (1200/1000=1.2mg/gm) म्हणजे 1 ग्राम पॉवडर मध्ये 1.2 मिली ग्राम/mg कॉपर आहे.
8) दररोजचा डोस 25 ग्रॅम म्हणजे(25x1.2) 30 mg तर 30 ग्राम म्हणजे (30x1.2) 36mg कॉपर आपण शेळीला खाऊ घालणार.
9) जर 25 ग्राम पॉवडर 1 लिटर पाण्यात टाकली तर कॉपर चं 30ppm चं द्रावण तयार होईल आणि जर 30 ग्रॅम पॉवडर 1 लिटर पाण्यात टाकली तर 36 ppm चं कॉपर चं द्रावण तयार होईल. याचाच अर्थ असा कि या डोस प्रमाणे आपण शेळ्यांना त्यांच्या दररोजच्या 20 ppm च्या गरजेपेक्षा 10 ते 15 ppm ने कॉपर जास्त होईल.
10) अजून एका बाबीचा आपल्याला येथे विचार करणे आवश्यक आहे. 20 ppm कॉपर हि त्या शेळीची दररोजची गरज आहे. जी नैसर्गिक रित्या चार्यातून व खुरकातून भागवली जाते. म्हणजेच चार्यातून व खुरकातून काही तरी प्रमाणात कॉपर त्या शेळीला मिळणार आहे. समजा चार्यातून व खुरकातून त्या शेळीला 10ppm कॉपर मिळाले तर एकूण कॉपर 40 ते 46 ppm होईल.
11) मिनरल मिकश्चर खाऊ घातल्यानंतर शेळ्या करडे भुळकांडतात असा माझा अनुभव आहे. 40 ते 46 ppm जर कॉपर शेळीच्या शरीरात जाणार असेल तर त्याचे toxisity निर्माण होईल जिचे परिणाम हळू हळू दिसतील.(स्लो पॉइझनिंग सारखे)
12) हे जसे कॉपर/तांबे च्या बाबतीत आहे तसेच इतर मिनरल च्या बाबतीत देखील म्हणता येईल.
13) एरिया स्पेसिफिक मिनरल मिकश्चर नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यात असा प्रकार टाळण्याचा प्रयत्न केलेला असतो. शेळ्यांबाबतीत असे संशोधन कोठे झाल्याचे माझ्या माहितीत नाही.
14) जनावरांचे रक्त लघवी चारा व माती इत्यादींचे परीक्षण करून त्यात कोणती मिनरल कमी/जास्त आहेत त्याचा विचार करून एरिया स्पेसिफिक मिनरल मिकश्चर बनविले जाते. KVK बारामती येथे संकरित गाईंची असे मिनरल मिकश्चर बनविले आहे. परंतु अश्या स्वरूपाच्या उत्पादनास देखील खूप मर्यादा आहेत असे मला वाटते.
15) माझ्या मते एका शेळीला 10 ग्राम पेक्षा जास्त मिनरल मिकश्चर देण्याची आवश्यकता नाही.
16) वरील सर्व विवेचन हे केवळ विचारार्थ आहे, या माहितीचा प्रत्यक्ष उपयोग करायचा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे मी सूचित करतो.
18

1) डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हा अर्थ शास्त्रातील एक कन्सेप्ट आहे. तस माझं शिक्षण काही अर्थ शास्रातून झालं नाही, त्यामुळे मला या विषयीचे ज्ञान फार जास्त नाही पण तरीही हा कन्सेप्ट शेळी पालनाशी कसा निगडित आहे हे आपणास समजून घेणे उचित ठरेल.
२) आपण दोन उदाहरणे पाहू, उदाहरणे हैपोथेटिकल म्हणजे कल्पनिक आहेत-
:- पहिलं उदा (चित्र 1) पिकामध्ये युरियाचा वापराबाबतचे आहे. समजा एक एकर क्षेत्रामध्ये कांदा हे पीक लावले, त्यास स्तंभ 2 मध्ये दाखवल्या प्रमाणे यूरिया च्या मात्रा दिल्यास येणारे उत्पादन किती मिळेल हे स्तंभ 3 मध्ये दर्शविले आहे.
या उदाहरणात जसे यूरिया वापराचे प्रमाण वाढवत गेलो तसे कांद्याचे उत्पादन देखील वाढत गेले. 15 किलो यूरिया वापरल्यानंतर त्यापासून 400 किलो उत्पादन निघाले, त्यानंतर मात्र उत्पादन वाढले मात्र घटत्या वाढीच्या वेगाने. म्हणजेच जास्तीच्या युरियाची उपयोगिता हळू हळू कमी होत गेली. याला म्हणतात डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. याचा अर्थ असा कि 10 ते 15 किलो युरियाचा वापरातून आपणास जास्तीत जास्त मार्जिन(परतावा) मिळेल. यूरिया आणखी जास्त वापरल्यास कांद्याचे उत्पादन वाढेल पण परतावा कमी कमी होत जाईल.
:- आता दुसरं उदाहरण थेट ज्या साठी हि पोस्ट लिहित आहे त्याचंच घेऊयात. आपण शेळ्यांची करडं कोणत्या वयात विकल्यास आपणास जास्तीत जास्त परतावा मिळेल, ते आपणास पाहायचे आहे. हे उदाहरण अर्थात काल्पनिक आहे, त्यामुळे प्रत्येक शेळी पालकाने या विषयीचा आपला स्वतःचा अभ्यास करावा व त्यानुसार कार्यवाही करावी हे उत्तम.
चित्र 2 मध्ये करडांच्या वयानुसार किती खुराक दिला जातो तसेच करडांचे वजन त्यांच्या वयानुसार किती किलो वाढेल ते दिले आहे. या उदाहरणात पूर्ण वाढ झालेल्या शेळी बोकडचे वजन 50 ते 55 किलो गृहीत धरले आहे. तेंव्हा त्याची पहिल्या 12 महिन्यात त्याच्या एकूण वजनाच्या 65-70 टक्के वजन वाढ होईल असे गृहीत धरले आहे. पाचव्या स्तंभात करडांच्या वयानुसार व नगावर खुल्या बाजारात विक्री केल्यास अंदाजे काय किंमती मिळतात ते दिले आहे. त्यापुढील स्तंभात दोन लगतच्या किमतीतील फरक दाखविला आहे. शेवटच्या स्तंभात खुरकवरील खर्चाने त्या महिन्यातील फरकाला भागले आहे. याचा अर्थ असा कि 1 रु खुराकावर खर्च केल्यास आपणास किती रुपये परतावा मिळेल. म्हणजेच उदा दुसऱ्या महिन्यात 1 रु खर्चून आपणास 67 रु परतावा मिळेल, पाचव्या महिन्यात 1 रु खर्चून आपणास 7.50 रु परतावा मिळेल या प्रमाणे. खर्च म्हणून आपण येथे फक्त खुरकवरील खर्च गृहीत धरला आहे, चारा व व्यवस्थापन या वरील खर्च सध्या बाजूला ठेवला आहे. (तो देखील येथे विचारात घेऊन या उदाहरणाचे मांडणी करता येईल, पण ते किचकट होईल.) पहिल्या व दुसऱ्या महिन्यात करडू पाळण्यासाठी विकले जाते त्या साधारण 1 ते 2 हजार एवढी किंमत मिळते, त्यानंतर ते कापण्यासाठी विकले आहे असे गृहीत धरले आहे.
-शेवटच्या स्तंभावरून आपणास हे लक्षात येईल कि सुरवातीला आपणास जास्त परतावा (67 रु) मिळतो तो त्यानंतर जसे वय वाढेल तसा कमी कमी होत जातो.
- पण स्तंभ क्रं4 मध्ये मात्र वजन वाढत गेले आहे.
- याचाच अर्थ असा कि करडाचे वजन/वय जसे वाढत जाईल तसे त्याच्या खुरकवरील खर्च वाढत जाईल व परतावा कमी होत जाईल.
- 8व्या महिन्यापर्यंत आपणास खुराक घालणे परवडते कारण खर्च नफा गुणोत्तर 1:2.08 असे आहे. त्यानंतर मात्र नफा कमी कमी होत जातो.
- या उदाहरणात प्रस्तुत नियमाचा (डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी) विचार केल्यास करडू 5 -6 महिन्याचे असताना विकल्यास जास्त आर्थिक परतावा मिळेल, असे दिसते.
3) चित्र क्रं 3 मध्ये मुलांचे 0-12 महिने, 1-2 वर्ष,2-3 वर्ष व 3-5 वर्ष या कालावधीत त्यांची वजने कशी असावीत याचे स्टॅण्डर्ड दिले आहेत. या नुसार पहिल्या 12 महिण्यात मुलांची वजने दरमहा किलोने वाढतात व त्यानंतर ती दर महा ग्रॅम ने वाढतात हे दिसून येते.(या आलेखांचा बारकाईने अभ्यास करावा)
4) करडांच्या बाबतीत देखील असा स्टॅण्डर्ड ग्राफ/आलेख कुठे उपलब्द आहे? या विषयी अधिक सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे माझे मत आहे.
5) शेळी/ बोकडाची वाढ त्याच्या वयाच्या 3 वर्षापर्यंत चालू असते. पहिल्या 12 महिन्यात त्याच्या एकूण वजनाच्या 65 ते 70 टक्के वजन वाढ मिळले, त्यानंतर त्याची वजन वाढ सावकाश होईल. असे माझे गृहितक आहे.
6) समजा एखाद्या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या शेळी/बोकडचे वजन 55 किलो असेल तर पहिल्या 12 महिन्यात त्याचे वजन 40 किलोच्या आसपास होईल. ते नैसर्गिक व स्वाभाविक आहे. उरलेलं 15 किलो वजन पुढील सुमारे 2 वर्षात हळू हळू वाढेल असं मी मानतो.
7) पहिल्या 6 महिन्यापर्यंत वजन वाढीचा वेग जास्त असावा त्यानंतर तो कमी होत जातो असे )मला वाटते.

8) एकूणच या विषयावर चर्चा करण्यास मला अधिक आनंद वाटेल.






बाळू मोटे बारामती
17

1) या वर्षी मी मेथीघासात एक प्रयोग केला, आणि तो यशस्वी झाला..!(बहुदा माझे बरेच प्रयोग यशस्वी होत नाहीत)
2) मेथी घासात हरळी व लाव्हाळाची फार मोठी समस्या असते. गेली दोन तीन वर्ष ती मी अनुभवली. मी कृषी शाखेचा पदवीधर असल्याने त्यातील ज्ञान मला या कामी उपयोगाला आले.
3) मी ज्या शेतात घास पेरणार होतो त्या शेतात जास्त प्रमाणात हरळी व लव्हाळा होता. जमिनीची वारंवार मशागत करून कितीही हाताने गोळा केला असता तरी पहिल्या 3-4 महिन्यात हराळीने व लव्हाळ्याने मेथी घासाचा गळा घोटला असता.
4) या शेताची मी उन्हाळ्यात मशागत केली नव्हती.(मी उन्हाळ्यात कोणत्याही शेताची कसलीच मशागत करत नाही) जून च्या सुरवातीला पाऊस पडल्यानंतर 10-15 दिवसात हि दोन्ही तणे चांगली वाढली. मग मी ग्लायफोसेट हे तणनाशक पंपास(15 लिटर) 200 मिली (होय200मिली) घेऊन फवारणी केली.
5) त्यानंतर 2-3 दिवसात पुन्हा पाऊस झाला. मग पहिल्या फवारणीच्या 10 दीबसनंतर मी पुन्हा तीच फवारणी परत एकदा घेतली.
6) पुन्हा 10-15 दिवस थांबून मी रानाची पॉवर टिलर ने मशागत केली. दरम्यानच्या काळात सर्व तण मरून गेले होते.
7) मग नेहमीप्रमाणे वाफे काढून मेथीघास पेरून भिजवून घेतला.
8) नेहमीच्या प्रमाणापेक्षा 10 पट जास्त प्रमाणात ग्लायफोसेट वापरले होते. मला वाटत होते कि घासाचे बी आता उगवणार नाही. पण ते व्यवस्थित उगवले. त्याबरोबर हरळी व लव्हाळा सोडून इतर सर्व प्रकारची गवते उगवली.
9) घास उगवून 20 दिवसानंतर मी त्यावर किझोल्फोप इथिल (टरगा सुपर) हे तण नाशक 15 मिली पंपास घेऊन फवारणी केली. एक दोन दुकानदारांना मी याविषयी विचारले तर ते म्हटले कि हे तणनाशक वापरू नका, काही नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार नाही.
10) साधारण 10 दिवसात जे जास्त प्रमाणात एकदल वर्गीय तणे जसे कि कुंदा, शिपी, लोणा वैगरे होती ती सर्व मरून गेली.
11) आता घासात फक्त द्विदल वर्गीय तणे जसे गाजर गवत, माठ, लाल पानाचे गवत, कुर्डू इ राहिली.
12) घासाची खुरपणी न करता राहिलेल्या गवतासाहित घासाचे जावळ कापून मी सध्या शेळ्यांना खाऊ घालत आहे.
13) गवताची खोडे पुन्हा फुटतात पण त्यांच्यापेक्षा कापलेला घास जास्त वेगाने वाढतो त्यामुळे हि गवते जास्त जोर करत नाहीत.
14) अशा रीतीने खुरपणी शिवाय मी हरळी, लव्हाळा व इतर एकदल वर्गीय तणांचा बंदोबस्त केला.
15) माझा हा प्रयोग आपण करावा अशी मी अजिबात शिफारस करत नाही. जर आपण अश्या पद्धतीने या प्रयोगातील तणनाशके वापरणार असाल, व त्यातून चुकून आपले काही नुकसान झाल्यास मी(बाळू मोटे) त्यास अजिबात जबाबदार नसेन, याची कृपया नोंद घ्यावी.
16) असा प्रयोग आपण केला किंवा करत असाल तर आपली मते मला जरूर कळवा.

बाळू मोटे बारामती
16

1) आमचा वाडा (मेंढरं) राहुरी विद्यापीठातील कॅनॉल वर सन 2004 साली होती. तेथे आम्ही जवळपास 15 ते 20 दिवस होतो. जवळच वांबोरी नावाचे एक गाव आहे, तेथील आसपासच्या एका वस्तीवरील एक शेतकरी आमच्या वाड्यावर आले, त्यांनी सांगितले कि त्यांचा एका शेळीच्या सडातून दुधाच्या गाठी येतायेत.
2) माझी आई मेंढरांकडे असते, ती त्या शेतकर्याच्या घरी गेली आणि त्या शेळीला वळ (कास दाह किंवा मस्टायटीस) झाला होता. सलग 3-4 दिवस आईने त्या शेळीची ट्रीटमेंट केली आणि शेळी बरी झाली. पूर्ववत दूध देऊ लागली.
3) त्या शेतकऱ्याने माझ्या आईसाठी साडी घेऊन तिचा सन्मान केला.
4) वरील उदाहरण सांगायचे काही कारण नव्हते, परंतु नुकताच माझ्या एका शेळीला मस्टायटीस झाला आणि मी प्रथम माझ्या आईकडे त्यासंबंधीच्या उपचारकरिता विचारणा केली.
5) अनुभव हाच गुरू असतो आणि अडाणी माणसे देखील अनुभवाने समृद्ध असतात( बहुदा आपण शिकलेले ते मान्य करत नाही).
6) मस्टायटीस झाला आणि तो योग्य रित्या बरा नाही झाला म्हणजे एक तर शेळीची कास निकामी होते किंवा तिचा एक सड निकामी होतो, दुसरे म्हणजे ती प्रजोत्पादन करते परंतु दूध पाजू शकत नाही. या परिस्थितीत शेळी कमी भावात विकून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.
7) जेंव्हा कासेतून चीक येत असतो तेंव्हा जर करडांची टाळू म्हणजे डोक्याचा माथा जर कसेला लागला म्हणजे धका बसला तर कास कठीण, कडक होते. तो मस्टायटीस नसतो. असं आई सांगते. दुसरं असं कि शेळीच्या किंवा मेंढीच्या सडाला खांडूक होतं. खांडूक म्हणजे सडावर एक विशिष्ट जखम होते. हा देखील मस्टायटीस नसतो. तिसरा प्रकार म्हणजे कासेतून एक किंवा दोन्ही सडातून दुधा ऐवजी सुरवातीला दुधाच्या गाठी, रक्त मिश्रित दुधाच्या गाठी, त्यानंतर रक्त मिश्रित पाणी येते. कास सुजते.
हे सर्व आपणास दिसते आपण समजू शकतो. पण अनुभवी माणसाला आणखी एक लक्षण चेक करावं, ते असं, ज्या ठिकाणी कास शरीराला चिकटलेली असते तिथे एक मोठी शिर मागच्या बाजूने आपणास दिसते. ती शिर सुजते व गाठ तयार होते. मायांगच्या आत देखील एक अशीच शिर असते, ती सुजते व गाठ तयार झाल्यासारखे वाटते.
8) शेळीच्या सडाला खांडूक झालं म्हणजे तिला मस्टायटीस होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. एरवी शेळीला मस्टायटीस होण्याची शक्यता फारच कमी असते. माझ्या शेळीच्या बाबतीत नेमकं असंच झालं.
9) वळ(मस्टायटीस) झाल्यावर वळ मोडणे हि एक प्रक्रिया असते, ती व्यवस्थित पार पडली म्हणजे कास निकामी होत नाही.
10) सर्व प्रथम दोन्ही सडातील दूध सावकाश पिळून काढावे. हळद, गूळ, तूप, चुना (थोडासा), मीठ(थोडे), व शेळीच्या कासेतील मळ सारख्या प्रमाणात घेऊन त्याचे कणकीसारखे  मिश्रण तयार करावे. त्यातील थोडे घेऊन मायंगात बोट घालून खालच्या बाजूला जी गाठ असते ति चोळावी.
कसेवर जी गाठ असते ती देखील वरून खाली या पद्धतीने चोळावी. कासेला मसाज करावा. असे तीन दिवस दिवसातून एकदा करतात. दूध दिवसातून 2-3 वेळा पिळून काढावे लागते.
11) टायलॉसिन, निओमयसिंन, एन्रोफ्लोक्सासिन इ अँटी बायोटिक शेळीला योग्य मात्रेत टोचावे लागते. शेळीच्या सडात प्रतिजैविक जसे पेडिस्टरीन वैगरे सोडता येत नाही.
12) ताप, कणकनी, ठणक थांबवण्यासाठी निमुसुलाईड, किंवा प्यारासीटमोल ची गोळी किंवा इंजेकशन द्यावे लागते.
13) कासेत इंजेकशन टोचू नये, त्यामुळे कास किंवा सड निकामी होण्याची शक्यता असते.
14) वेखंड पाण्यात उगाळून त्याचा लेप कासेवर पाठीमागील बाजूवर द्यावा. त्याने सड निकामी होत नसल्याचं अनुभव आमचे मेंढपाळ मंडळी सांगतात.
15) सध्या तरी मला डॉक्टर जे उपाय करतात ते माहित नाहीत.
जे मला माझ्या आईने व इतर मेंढपाळ मंडळींनी सांगितले ते मी येथे नमूद केले. हे उपाय स्वतःच्या जबाबदारीवर वापरावेत, कोणत्याही नुकसानीस मी जबाबदार नसेन. यातुन शेळी बरी होणे, पुन्हा दूध देऊ लागणे हे एक मोठे आव्हान असते.
लेखक- बाळू मोटे बारामती
15

मेथी घासामध्ये rl 88 म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक चांगली जात विकसित केली आहे. तिचं उत्पादन भरपूर मिळतं व ती अमरवेल या तनास प्रतिकार क्षम आहे.

हि जात एकदा लावली कि 3 वर्ष चालते. दर 21 दिवसांनी कापायला येते. इतर जातींपेक्षा या जातीत प्रोटीन चे प्रमाण देखील थोडे जास्त आहे.

बी मिळवण्यासाठी विद्यापीठातील गवत संशोधन केंद्राशी संपर्क साधावा. साधारण 500 ते 800 रु प्रति किलो असा दर असेल.(सध्या मला दर माहित नाही)

माझ्या मते मेथी घास दर वर्षी वेगळ्या शेतात लागवड करावा. त्यामुळे उंदीर, गवत व कमी उत्पादन या त्रासापासून काही प्रामनात मुक्ति मिळते.
14

१) शेळी व मेंढीत मेंढी उत्तम कि शेळी उत्तम, असा प्रश्न मला नेहमी पडतो. बंदिस्त साठी आपण शेळीला जास्त महत्व देतो, कारण तिच्या कडून जास्त मांस उत्पादन व नफा मिळतो असे आपण मानतो. मग फिरसत्या पद्धतीत शेळीपासुन मेंढीपेक्षा जास्त नफा मिळणार हे उघड आहे, मग पारंपरिक मेंढपाळ शेळ्यांचे मोठे कळप का पाळत नाहीत. सरासरी 15 ते 20 शेळ्यांचे कळप दिसतात तर मेंढ्यांच् सरासरी 100 ते 150 चे दिसतात.
२) मेंढी पेक्षा शेळीचं मटण रुचकर, चविष्ट आहे. मेंढीला 1 तर शेळीला 2 पिल्लं होतात. मेंढी पेक्षा शेळीला जास्त दूध असतं. जशी मेंढरपासून लोकर मिळते तशी शेळ्यांपासून देखील लोकर(मोहेर) मिळते. मेंढ्याना fmd लगेच होतो तर शेळ्यांना सहसा होत नाही. बाजारात एकाच वजनाच्या कोकरास व बोकडस कोकरपेक्षा जास्त दर मिळतो. अशी तुलना केली तर बऱ्याच बाबतीत  शेळी मेंढी पेक्षा उजवी ठरते.
3) अस असून देखील धनगर समाजातील मंडळी शेळी पालन करण्यापाइक्षा मेंढी पालन का करतात?
4) चाऱ्याच्या बाबतीत शेळी मेंढी पेक्षा कितीतरी पटीने चोखंदळ आहे. निकृष्ट प्रतीचा चारा खाऊन मेंढ्या स्वतःची गुजराण करू शकतात, शेळ्या नाही. माळावरच वाळलेल गवत ज्वारीच्या शेतातील धसकटे इ खाऊन मेंढ्या चांगल्या राहू शकतात. मेंढ्याना देखील अश्या चाऱ्याचेइ सवय लावावी लागते. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे मेंढ्या समूहात व्यवस्थित राहतात, त्यांना चांगली शिस्त असते, शेळ्या फार बेशिस्त असतात, जिकडे शेलका शेंडा तिकडे शेळीचा डोळा कायम असतो, ती एका जागेवर चरत नाही. मेंढी वेली कि तासाभरात तिचे कोकरू स्वताहून मेंढीला दूध पिऊ लागते , बऱ्याच वेळा शेळीच्या करडांना 2 ते 3 दिवस दूध पिण्यासाठी आपणास मदत कारावज लागते. माझ्या मते शेळ्यांपेक्षा मेंढ्यांच्या पिल्लांची मरतुक फार कमी होते. जेंव्हा पावसाची झड लागते तेंव्हा भर पावसात मेंढ्या चरू शकतात, लिंब, पिपरण, वड इ पाला अश्या वेळेला धनगर बांधव मेंढ्याना देतात. अश्या वेळेला मेंढ्या अर्ध पोटी उपाशी राहिल्या तरी त्यांच्या ताब्यातीवर वाईट परिणाम कमी प्रामनात होतो, शेळ्या मात्र लगेच खराब होतात. पाऊस शेळ्यांना अजिबात सहन होत नाही, मेंढ्या पावसाला भीत नाहीत. शेळी आजारी पडली कि तिचं चलनवलन बऱ्याच वेळा थांबते, आजारपणात शेळ्या बऱ्याच वेळेला मरतात. मेंढ्या शेळ्यांपेक्षा लवकर आजारी पडतात पण त्यांचे चलनवलन लवकर थांबत नाही, त्या आजाराने लवकर मरत नाहीत. FMd, ppr, इ आजार झालेले एवढंच नव्हे अंथराक्स सारखे आजार झाले तरी मेंढ्या त्यातून बऱ्या होतात. शेळीला साधी बुळकांडी लागली कि शेळी दगावू शकते. शेळीला विष बाधा सहन होत नाही, तिला साधा विंचू चावला तरी शेळी मरू शकते, बऱ्याच वेळेला मरते.

अश्या रीतीने शेळ्यानपेक्षा मेंढ्या फिरस्ती साठी योग्य ठरतात.


बाळू मोटे बारामती


[In reply to शेळी पालन चॅनेल]
मोठ्या शेळ्यांसाठी गव्हाण.

1) सुमारे 8 ते 10 शेळ्या एका गव्हाणीत आरामशीर चरू शकतात.
2) लेंड्या व मुतारी अजिबात आत जात नाही
3) भरपूर चारा टाकता येतो विशेषतः कोरडा किंवा सुका चारा.
4) चारा सांडवता येत नाही
5) स्वच्छता करायला एकदम सोपं
13

१) काल kvk बारामती (कृषी विज्ञान केंद्र) येथे माझे टोमॅटो लागवड व्यवस्थापन व बंदिस्त शेळीपालन या विषयावर व्याख्यान झाले.
२) जून 2014 मध्ये मी kvk मधील नोकरी सोडली आणि त्यानंतर पुन्हा तेथे जाऊन लेक्चर देण्याची हि पहिली वेळ. खूप आनंद वाटला. नोकरीस होतो तेंव्हा दररोज कित्येक शेतकरी बांधवाना, विध्यार्थ्यांना लेक्चर्स, मार्गदर्शन देत होतो, तो तेथील नित्याच्या कामाचा भाग होता. परंतु कालच लेक्चर मला बहिस्थ होतं, आणि मला मी kvk त आता काम करत नसल्याचं जाणीव मला काहीतरी हरवलं असल्यासारखं वाटत आहे.
३) agri clinic agri business management नावाचा manage हैद्राबाद यांचा 2 महिन्याचा कोर्स kvk त चालवला जातो. शेतीशी निगडित कोणकोणते उद्योग कसे करायचे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसे बनवायचे या विषयी हे प्रशिक्षण असतं. कृषीतुन पदवी किंवा पदविका झालेली लोक यास पात्र असतात. बँकेकडून 20 लाखापार्यंत लोन मिळतं, व त्यावर सरकार 36 टक्क्यापर्यंत अनुदान देतं.
४) प्रशिक्षणास लहान मोठे छोटे मोठे व्यवसाय करणारे कृषी पदवीधर होते.
५) एकूण व्याख्यान चांगलं झालं,त्यांनी भरपूर प्रश्न विचारले.
६) kvk मध्ये मी 6 वर्ष नोकरी केली, त्यासंबंधी पुढील 1-2 पोस्ट मध्ये मी माहिती लिहिणार आहे.
12

१) जितकं जित्राब (पाळीव प्राणी) मोठं तितकं त्याची fecundity (पिल्लाना जन्म देण्याची क्षमता) कमी असते.
२) ज्या जित्राबाची fecundity जास्त असते त्यांच्यात पिल्लांचा नैसर्गिक मृत्यू दर जास्त असतो.
३) जास्त पिल्लं देणाऱ्या प्राण्यांचा गर्भार काळ कमी दिवसाचा तर कमी पिल्लं देणाऱ्या प्राण्याचा गर्भार काळ जास्त दिवसाचा असतो.
४) जास्त पिल्लं देणारे प्राणी आकारमानाने व वजनाने लहान लहान होत जातात तर कमी पिल्लं देणारे प्राणी आकारमानाने व वजनाने मोठे मोठे होत जातात.
५) जितका प्राणी लहान तितका माणसाच्या खाण्याच्या दृष्टीने चवीला छान तर जितका प्राणी मोठा तितकं त्याची चव कमी होत जात. (या विधानस खूप मर्यादा आहेत)
६) वरील 5 विधाने हि निसर्ग नियम आहेत असे माझे वैक्तिक मत आहेत, अर्थात त्यास काही मर्यादा देखील असतील.
७) शेळीच्या बाबतीत या 5 विधानांचा प्रकर्षाने विचार व्हावा असे मला वाटते.
८) जगभरात शेळी हा एकच प्राणी आहे, वेगवेगळ्या जातीनुसार त्यांची fecundity वेगवेगळी आहे हे आपण पाहतो.
९) जितकी शेळीची जात आकारमानाने मोठी, वजनाने मोठी तितकी तिचे जुळे देण्याचे प्रमाण कमी असते असे मला वाटते. या उलट आकारमानाने लहान असणाऱ्या शेळ्यांच्या जातीत जुळे देण्याचे प्रमाण जास्त असते.
१०) सिरोही या आकाराने मोठ्या जातीच्या शेळी मध्ये जुळे देण्याचे प्रमाण 9 ते 12 टक्के आहे. तर ब्लॅक बंगाल या आकाराने व वजनाने लहान असणाऱ्या शेळीच्या जातीत जुळे देण्याचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे.
११) शेळीची जात कोणतीही असो तिचे आकारमान व वजन जास्त असेल तर तिची fecundity कमी असणार हे निश्चित समजायला हवे.
१२) अश्या मोठ्या शेळ्यांमध्ये जुळे देण्याचे प्रमाण चांगले आहार व्यवस्थापन व आरोग्य व्यवस्थापन करून एका मर्यादे पर्यंत वाढविता येउ शकते. पण त्याला बांधीत मध्ये खूप मर्यादा पडतात असे मला वाटते.
१३) या पोस्ट संदर्भात आपली मते कळवावेत.
11

१) करडाचे जन्मतः वजन जास्त मिळावे या साठी काही विशेष प्रयत्न करायला सांगितले जातात. त्यातले दोन खालील प्रमाणे-
- शेवटच्या 6 आठवड्यात शेळीला जास्तीचा खुराक देणे
- जातिवंत बोकड लागवडीस वापरणे
२) करडाचे जन्मतः वजन जास्तीत जास्त मिळावे हि चांगलीच गोष्ट आहे; पण याला काही मर्यादा नाहीत का?
३) मला वाटते नैसर्गिक रित्या जे काही करडाचे जन्मतः वजन मिळेल ते चांगले. असे वजन हे साधारण 1.5 किलो ते 4 किलो पर्यंत मिळू शकते.
४) करडाचे जन्मतः वजन हे शेळीच्या आकारमनावर व कॅपॅसिटीवर अवलंबून आहे. एखादी शेळी आकारमानाने, उंचीने छातीच्या घेराने लहान असेल तर तिला काय 3.5 किलो वाजनाचे करडू व्हावे का? आपणस तर 2 करडे हवी असतात, मग तिला 3.5 चे 2 व्हावीत का? शक्यच नाही. तिच्या आकारमानानुसार तिला 1.5 किलोची 2 किंवा 2 ते 2.5 किलोचे एक किंवा फार फार तर 2 किलोची 2 होतील.
५) जन्मतः चे वजन वाढविण्यात लागवडीच्या बोकडाचा काही संबंध नसतो असे मला वाटते कारण शेळी करडाला जन्माला घालणार असते, बोकड नाही. जन्म झाल्यानंतर बोकडाच्या अनुवंशिकतेनुसार करडाचे वजन किती वाढायचे ते ठरेल.
६) शास्त्रा प्रमाणे शेवटच्या 6 आठवड्यात पोटातील पिल्लांची 70 टक्के वाढ होते याचा अर्थ त्या अगोदर फक्त 30 टक्के वाढ होते.
७) समजा एका शेळीला एकच 3 किलो वाजनाचे करडू झाले. म्हणजे त्या करडाचे लागवडीपासून 5 महिन्यात फक्त 3 किलो वजन झाले. करडू जन्मल्यानंतर दर महिन्याला 4 ते 5 किलोने वाढते.
८) याचा अर्थ असा कि शेळी गाभण असताना ती स्वतःचे वजन वाढवते व करडाचे वजन तिच्या आकारमानानुसार वाढवते जेणे करून तिला प्रसुती मध्ये करडास जन्म देणे सोईस्कर होईल.
९) याचा पुढील अर्थ असा कि शेवटचा 6 आठवड्यात जरी जास्तीचा खुराक दिला तरी करडाचे फार वजन वाढणार नाही.
प्रथम शेळीचे वजन वाढेल, त्यानंतरचा जास्तीचा खुराक वय जाईल.
१०) उदा पाहू. एका शेळीचं जास्तीत जास्त वजन समजा 50 किलो आहे. आधीच्या वितात तिचं वजन घटून समज 45 किलो झालं. आता या शेळीची लागवड केल्यानंतर तीच वजन वाढायला सुरवात होईल. दर महिन्याला समजा 4 किलो वजन वाढ धरली तर 40 दिवसात तिचं वजन पुन्हा 50 किलो होईल. उरलेल्या सुमार 4 महिण्यात 2 करडाचे वजन जास्तीत जास्त 8 किलो होईल. म्हणजे आहे त्या खुराकात शेळीचं भागून करडांचे वजन देखील व्यवस्थित होईल.
११) जर शेळीच्या वजन घटीच्या काळात तिचं वजन घटू दिलं नाही तर वजन वाढीच्या काळात जास्तीचा खुराक देण्याची वेळ येणार नाही.
१२) माझा हा विचार आपणस पटत नसेल तर कृपया सोदाहरण स्पस्ट करून कळवावे हि विनंती.

लेखक- बाळू मोटे.
10

१) चारा व्यवस्थापन कसे करावे या विषयी अनेक सल्ले मिळतात, परंतु ठोस असे दिशादर्शन मिळत नाही. या पोस्ट मध्ये मी माझी या विषयी काही ठोस मते मांडणार आहे.
२) चाऱ्याच्या बाबतीत शेळी या प्राण्यास लक्षात घेता काही विशिष्ट गृहीतके किंवा नियम आहेत; ती वेगवेगळ्या ठिकाणी पहावयास ऐकावयास मिळतात व बंदिस्त शेळी पालनाकरिता सुचवली जातात त्यातील काही खालील प्रमाणे-
- शेळी 70 टक्के चारा (झाडावरील) ओरबाडून (browsing) खाते तर 30 टक्के जमिनीलगत (grooming) चरते.
- शेळीच्या खाद्यात किंवा चाऱ्यात सतत बदल करायला हवा कारण शेळी वेगवेगळा चारा खाणे जास्त पसंत करते.
- शेळी साठी झाडपाला मिळेल असा चारा लागवड करावी. ज्या मध्ये सुबाभूळ, शेवगा, शेवरी, हादगा, अंजन, ग्लिरिसिडिया, तुती इ अनेक झाडांची नावांची यादी दिली जाते.
- त्या बरोबर मका, मेथी घास, दशरथ घास, मारवेल, बरसीम, कडवळ, हत्ती घास इ चा चाऱ्यात नियमित वापर असावा असं ठासून सांगितलं जातं.
- जनावरांसाठी (शेळी धरून सर्वांसाठी) आहारात 70 टक्के एकदल वर्गीय व 30 टक्के द्विदल वर्गीय चारा द्यावा.
- शेळीला 3 ते 5 किलो हिरवा चारा व 0.5 ते 2 किलो सुका चारा द्यावा.
- पारंपरिक चार्यव्यतिरिक्त शेळीला ऍझोला, हैड्रोपोनिक मका, फळांच्या साली, यूरिया प्रक्रिया केलेल गव्हाचे काड, मुरघास इ द्यावे.
- कहर म्हणजे काही ठिकाणी घरातील ऊष्ठे, भाजीचे देठ इ चा शेळीच्या आहारात उपयोग करावा असं आवर्जून सांगितलं जातं. (या आहाराने किती शेळ्यांच किती पोट भरेल...?)
- शेळीचं दूध आयुर्वेदिक असतं त्याचे कारण म्हणजे ती वेगवेगळ्या झाडांचा पाला व विविध प्रकारचा चारा खाते.
-  चाऱ्या व्यतिरिक्त शेळीला 300 ते 500 ग्रॅम खुराक द्यावा.
- शेळीला 15 ते 20 ग्राम मिनरल मिकश्चर द्यावे.
- शेळीला भरपूर व थंड पाणी 24 तास उपलब्ध करून द्यावे. काहींच्या मते पाण्यात पोटॅशियम परमंगनेट तर काहींच्या मते थोडे मीठ तर काहींच्या मते गूळ टाकावा.
- इ.इ.इ.....
हि यादी खूप मोठी होईल.
३) वरील मुद्दा क्रमांक 2 मध्ये सांगितलेल्या बाबींशी मी व्यक्तिशः सहमत आहे. सांगितल्या प्रमाणे सर्व बाबी करता येत असतील तर अवश्य कराव्यात.
४) बंदिस्त शेळी पालन व मटनाकरिता करडे विकायची असतील, व्यवसाय फायदेशीर करायचा असेल तर माझ्या मते मुद्दा क्रं 2 मधील बाबींचा बारकाईने विचार करायला हवा.
५) चाऱ्याचे नियोजन करताना माझ्या मते 3 बाबीं पहाव्यात
- चाऱ्याची पौष्टीकता व मुबलकता
- चाऱ्याची किंमत
- चारा कापून शेळ्यांना खाऊ घालण्यात लागणारा वेळ.
६) मी सुरवातीला सांगितल्या प्रमाणे कोणीही चाऱ्याचे निश्चित असे नियोजन सांगत नाहीत; कि बाबा अमुक तमुक चारा लावल्यावर शेळ्या तब्यतीने चांगल्या राहतील. आर्थिक हिशोब बिघडणार नाही वैगरे. माझ्या मते खालील पद्धतीने चाऱ्याचे नियोजन केल्यास ते सर्व दृष्टीने फायद्याचे ठरते-
७) चार्यामध्ये प्रमुख तीन गोष्टी असाव्यात
- मका
- मेथी घास
- कोणताही एक झाडपाला (जसे सुबाभूळ, शेवरी )
या बरोबर 22 टक्के पेक्षा जास्त प्रथिने असलेला पुरेसा (पुरेसा याचा अर्थ भरपूर या अर्थाने) खुराक शेळीला दिला पाहिजे.
८) वरील पद्धतीने नियोजन केलं तर शेळ्याची तब्येत 100 टक्के चांगली राहते. चारा आणून घालण्यातलं वेळ वाचतो. वर्षभर हा चारा घेता येतो. यातील मका हि नेहमी चिकात आलेली असावी तर मेथीघस 30 टक्के पर्यंत फुलोऱ्यात आलेला असावा. सुबाभूळ किंवा शेवरी एकूण चाऱ्याच्या 20 ते 30 टक्के द्यावी.
९) वरील नियोजनात (८) सीझन नुसार थोडा फार बदल करता येईल. उदा स्वतःच्या शेतातील उपलब्धतेनुसार सोयाबीन, तूर, भूईमुग, कांदा पट इ शेळ्यांना देता येईल.
१०) चर्या बाबतीत माझी मते खालील प्रमाणे आहेत-
- उगीच महागडी बियाने आणून चाऱ्याची लागवड करू नये.
- चार्यावरचा एकूण खर्च दर दिवशी दर शेळी मागे हा 10 रु पेक्षा जास्त होता कामा नये या कडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.
- कडवळ व हत्ती घास हा चारा अगदीच नाविलाज असेल तरच शेळ्यांना द्यावा.
- मेथी घास, दशरथ घास, मारवेल या पैकी कोणताही एकच लावावा कारण या चाऱ्याची कापणी करण्यास बराच वेळ लागतो. शक्यतो मेथी घास लावावा. दर वर्षी नवीन रानात किंवा आलटून पालटून लावावा.
- मेथी घासवर मावा येतो, अश्या वेळेला मावा असलेला चारा खाऊ घालू नये, शेळ्या भुळकांडतात. त्यासाठी किनोलफॉस किंवा इमिडाक्लोप्रिड किंवा निंबोळी तेल किंवा स्पिनोसॅड इ पैकी एका औषधाची 8 दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. फवारणी केल्यानंतर दोन दिवस मेथी घास शेळ्यांना घालू नये. (निंबोळी तेल किंवा स्पिनोसॅड वापरल्यास घालू शकता)
- मका, मेथी घास व सुबाभूळ या सर्वांची कुट्टी करून शेळ्यांना द्यावा. सुबाभूळ अंगठ्याच्या आकारापेक्षा लहान किंवा तेवढी असावे.
- एकदल व द्विदल चाऱ्याचे प्रमाण 60:40 किंवा 50:50 या प्रमाणे ठेवावे.
- दररोज मिनरल मिकश्चर चा उपयोग करावा. माझ्या मते 10 ग्राम पेक्षा जास्त मिनरल मिकश्चर देण्याची आवश्यकता नसते.
- योग्य गुणवत्तेचा हिरवा चारा असल्यास सुका किंवा वाळलेला चारा किंवा वैरण अजिबात दिली नाही तरी काही फरक पडत नाही.
- गरज असेल तरच मुरघास बनवावा. मूरघासात मूळ मुक्यातील 2 टक्के प्रोटीन कमी होते.
- मुरघास बनवणे शक्य नसेल तर चिकातील मका उभीच सुकू द्यावी, नंतर कापावी व वाळवून साठवावी. अशी वाळलेली मका खाऊ घालणार असेल तर 30:70 असे प्रमाण मका व मेथी घासचे ठेवावे व ADE व K हे जीवनसत्व असलेले मिनरल मिकश्चर (जसे कि ऍग्रिमीन फोर्ट) द्यावे.
- माझ्या मते चारा व खुराक यांची शेळीच्या वजन वाढीतील व तब्येत सुधारण्यात 60:40 अशी भूमिका असावी. तेंव्हा चारा व खुराक यांचे उत्तम व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.
- स्थानिक जातीच्या शेळ्यांकरिता (उस्मानाबादी इ.) उगाचच विकतचा तूर भुसा, हरी पत्ती इ महागडा चारा खरेदी करू नये.
- उत्तम प्रकारचा खुराक हेच खरं शेळ्यांसाठी टॉनिक आहे. उगीचच अमुक तमुक टॉनिक पाजत बसू नये. कोणत्याही टॉनिक दररोज पाजल्याशिवाय वजनात फरक पडत नाही, व जो पडतो तो फार किरकोळ असतो. तसेच बरेच घरगुती उपचार सांगितले जातात जसे कि ताक पाजणे वैगरे. याची काही गरज नसते असे माझे स्पस्ट मत आहे.
११) मला माहित आहे कि मी सांगितलेलं चारा नियोजन बहुतेक शेळीपालकाना रुचनार नाही, आवडणार नाही. मला जे उमगलं तेच मी येथे लिहिलं आहे, बाकी ज्याची त्याची मर्जी..!
१२) वर नमूद सर्व विवेचन हे स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी व करडांची मटणासाठी विक्री करण्याकरिता पालन करणाऱ्या शेळ्यांसाठी आहे. या नियोजनाने आपणास एका वर्ष्याच्या आत 70ते 80 किलोचा बोकड बनवणे किंवा त्या पद्धतीच्या शेळ्या तयार करणे शक्य नाही. आपणास असे करावयाचे असल्यास आपण त्या क्षेत्रातील तज्ज्ञ शेळी पालकाचा सल्ला घ्यावा हे उत्तम.
१३) पैदासी करिता किंवा ईद करिता जे शेळीपालन करतात त्यांसाठी मी सांगितलेलं चारा व खुराक नियोजन अपुरं ठरेल.

लेखक- बाळू मोटे बारामती
9

१) आपण 10 - 12 लाखाची 4 चाकी गाडी घेतो तेंव्हा आपण तिच्यासाठी एक शेड बांधून गाडी त्या शेड मध्ये लावतो. गाडीने शेड ची मागणी केलेली नसते. गाडी शेड मध्ये लावल्याने तिचं आयुष्य वाढत, गाडी टापटीप राहते व मेंटेनन्स चा खर्च कमी येतो.
२) शेळ्यांसाठी गोठा नेमका अश्याच प्रकारचा उद्देश ठेऊन आपण बांधत असतो. जरी शेळ्यांनी आपणास गोठा बांधायला सांगितलं नाही तरी बंदिस्त शेळी पालनासाठी गोठा बांधणे हि जरुरी बाब आहे.
३) गोठ्यामुळे शेळ्यांपासून मिळणारे उत्पादन हे अप्रत्यक्ष रित्या वाढते असे समजायला हरकत नाही. म्हणूनच गोठ्यावर जास्त खर्च करू नये असे जेथे तेथे वाचावयास, ऐकावयास मिळते.
४) शेळ्यांसाठी चांगला गोठा असावा ज्या मध्ये मजूर खर्चात बचत होईल व शेळ्यांना तीनही मोसमात आरामदायक राहता येईल.
५) मी माझ्या गोठ्याची काही चित्रे सोबत दिली आहेत. गोठ्या बाबतीत माझी काही विशिष्ट व आग्रही मते आहेत. सुरवातीचे दीड वर्ष मी शेळ्या साध्या गोठ्यात व साध्या गव्हाणीत ठेवत व चारत होतो. तेथे ज्या अडचणी येत होत्या त्या मी आता पक्क्या गोठ्यात सोडवण्यात यशस्वी झालो आहे असं मला ठाम पणे सांगता येईल.
६) गोठा एक पाखी असावा. त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश आत मध्ये येतो. दोन पाखीत अडचण येते.
७) गोठ्याची लांबी दक्षिण उत्तर अशी असावी. त्यामुळे सुर्यप्रकाश गरजेपुरता आत येतो व दुपारच्या वेळेला सावली मिळते. गोठ्यात वारा वाहत ठेवता येतो व त्याचेवर नियंत्रण ठेवता येते.
८) गोठ्याला दक्षिण उत्तर व पश्चिम बाजूने भिंती घालून घ्याव्यात व त्यात 4 बाय3 चाय मोठा खिडक्या ठेवाव्यात. या खिडक्यावर पुढे टॉयलेट ला असतात तश्या उघडझाप करता येणाऱ्या व पाहिजे तेवढा वारा आत सोडता येणाऱ्या काचा बसवून घ्याव्यात. ९) गोठ्यात कोबा करू नये व मुरूम भरून 6 इंच उत्तर द्यावा.
१०) गोठ्यातील गव्हाण सलग असावी, तुकड्या तुकड्यात नसावी. मी कडप वापरून गव्हाणी तयार केल्या आहेत. या गव्हाणीत लेंड्या पडत नाहीत, मुतारी उडत नाही, गव्हाण 5 मिनिटात स्वच होते. पाणी साचून राहत नाही. भिंतीच्या बाहेरच्या बाजूने व गव्हाणीच्या खालून बोगदे ठेवलेत ज्यातून उष्ठा चारा दुसऱ्या दिवशी सहज बाहेर काढता येतो. सलग 76 फूट लांबीची व वरच्या बाजूला 2 फूट रुंदीची 1 फूट खोलीची हि गव्हाण असून ती बनवण्यासाठी लोखंडी ट्युब, कडप, सिमेंट पोल, मजुरी इ सर्व मिळून 22 हजार रु खर्च आला आहे.
११) गोठ्याचे काम अजून बाकी आहे. आत्तापर्यंत सुमारे 2 लाख रु गोठ्याला खर्च आला आहे. यात नुसत्या शेळ्या ठेवल्यास 50 बसतील तर करडे व शेळ्या ठेवायच्या असल्यास 30 बसतील. गोठा 60 फूट लांबीचा व 15 फूट रुंदीचा आहे.
१२) गोठ्यात हवा खेळती राहावी असं न म्हणता गोठ्यात हवा वाहती राहावी असं मी म्हणेन. हवेच वाहन आपणास नियंत्रित कराता यायला हवे म्हणजे उकाडा,धूळ, डास, माश्या इ वर नियंत्रण मिळवता येते.
१३) बारीक सारीक बाबींचा विचार करून हा गोठा मी बांधला आहे. काही समस्या पूर्णतः सोडवता आल्या आहेत तर काही बाबतीत मध्यम मार्ग काढला आहे.
१४) चारा टाकताना गव्हाणीतूनच चालत जायचं आहे त्यामुळे सावलीखालची जागा जी चालण्यासाठी आपण सोडतो ती येथे वाचवली आहे.





लेखक- बाळू मोटे बारामती. 
8

१) एखादा प्रकल्प सुरु केला कि त्यातील पहिली 2-3 वर्ष हि learning and capacity building ची असतात. या वर्षात जो डेटा तयार होतो किंवा जो आर्थिक हिशोब तयार होतो त्यात फार मोठे चढ उतार असण्याची शक्यता असते. म्हणून शेळी पालनामध्ये पहिल्या 2-3 वर्षाचा कोणताच डेटा प्रमाण मानू नये असे मला वाटते. एकदा का व्यवसाय सुरळीत सुरु झाला कि जो डेटा तयार होईल त्यातून जे निष्कर्ष निघतील ते प्रमाण मानायला हरकत नाही.
२) माझ्या मते बंदिस्त शेळी पालनामध्ये जर आपण स्थानिक बाजारात मटणासाठी बोकड शेळ्या विकणार असू तर 1:2 असे खर्च व उत्पन्नाचे गुणोत्तर आहे. याचा अर्थ असा कि आपण 1 रुपया शेळ्यांमध्ये गुंतवणूक केल्यास आपणास 2 रुपये उत्पन्न मिळते. म्हणजे या 2 रुपयात 1 रु मुद्दल व 1 रु नफा असतो.
३) जो 1 रु नफा आहे त्याचा ब्रेकअप (विभागणी) कसा असेल या बाबत माझ्या मनात मोठा प्रश्न आहे. या संदर्भात मी आत्तापर्यंत जे चिंतन केले त्यातून मी कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही. कदाचित अजून 2-3 वर्षानंतर याबाबत अकडेवारीनिशी काही सांगता येईल असे वाटते.
४) शेळ्यांपासून होणारी अर्थ प्राप्ती हि वास्तविक चारा व खुराक यांच्यापासून होणारी अर्थ प्राप्ती आहे. तसे पाहू गेल्यास चारा व खुराक थेट विक्री केल्यास व तोच शेळ्यांना खाऊ घालून त्याचे मांसात रूपांतर करून विक्री केल्यास दोहोंपैकी दुसऱ्या पर्यायातून जास्त अर्थप्राप्ती होते असे आपण मानतो.
५) हि जास्तीची अर्थ प्राप्ती नेमकी किती व तिचा त्या 1 रु वाटा किती हे समजणे मोठे कठीण वाटते. याची उकल करण्यासाठी बराचसा डेटा व आकडेमोड करण्याची आवश्यकता आहे.
६) आज रोजी मी माझ्या मनात काही ढोबळ आकडेवारी गृहीत धरली आहे. माझं आजचं या विषयीचे मत उद्या कदाचित बदलू शकतं. आकडेवारी पाहण्यापूर्वी काही बाबींचा येथे उलगडा करणे क्रमप्राप्त आहे.
७) या व्यवसायात चारा, खुराक, शेळ्या व त्यांचे आरोग्य व्यवस्थापन या गोष्टी प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी असतात, त्यांचे शिवाय मांस उत्पादन प्रक्रिया होणार नाही. तेंव्हा फक्त या बाबींवर होणारा खर्च हाच शेळी पालनातील खरा खर्च समजायला हवा. आपण जो गोठ्यावर, मजुरीवर व इतर भांडवली गुंतवणुकीत खर्च करतो तो उत्पादन खर्चात धरायला नाही पाहिजे.
८) अस मानल्यास माझ्या मते जो 1 रु नफा मिळतो त्यात पुढील प्रमाणे प्रत्येकाचा वाटा असेल-
:-चारा -- 50 पैसे
:- खुराक -- 25 पैसे
:- शेळ्या-- 25 पैसे.
९) भांडवली खर्चावर शेळी पालनात आपणास नफा मिळणार नाही. भांडवली खर्च उदा गोठा वगैरे हि शेळी पालकाची गरज आहे, शेळ्यांची नाही. शेळ्यांनी कधीच म्हटलं नाही कि त्यांना आलिशान गोठ्यात राहायचं आहे. आपण तो त्यांच्यासाठी बांधतो. शेळ्या फिरत्या पद्धतीनं जेवढं मांस उत्पादन देतात तेवढंच बंदिस्त पद्धतीत देतात. त्यामुळे आपण केलेल्या भांडवली खर्चाची जबाबदारी शेळ्यांवर टाकून चालणार नाही. तसंच शेळ्या राखण्यासाठी गडी (लेबर) ठेवा असं शेळ्या सांगत नाहीत, ते आपण त्यांचे साठी करतो ज्याचा उत्पादन प्रक्रियेत थेट संबंध नसतो.
१०) मुद्दा क्र ८ मध्ये सांगितल्या प्रमाणे आपणास शेळ्यांपासून 25 पैसे नफा मिळेल, चार्यापासून 50 पैसे तर खुरकपासून 25 पैसे मिळतील. या माहितीचा उपयोग कसा करायचा या वर वाचकांनी चिंतन मनन करावे, तसेच जाणकार शेळीपालकांनी मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
११) समजा आपण स्वतःच्या शेतात चारा पिकवतो त्याची किंमत 1 रु आहे. त्यावर आपणास 50 पैसे नफा मिळेल. म्हणजे खर्च उत्पन्न गुणोत्तर 1:1.50 असे येईल (चर्या पुरते). आता हा चारा आपण विकत घेऊन घालत असू व त्याची किंमत 1.25 असेल तर आपणास मिळणाऱ्या 50 पैसे नफ्यातुन 25 पैसे वजा होतील, तेंव्हा गुणोत्तर 1:1.25 असे येईल. जर चाऱ्याची किंमत 1.50 पैसे असेल तर आपणास चार्यापासून कोणताच नफा शिल्लक राहणार नाही व शेळी पालन व्यवसायाचे गुणोत्तर 1:1.50 असे येईल कारण चार्यावर अतिरिक्त केलेला 50 पैसे खर्च नफ्यातून वजा होईल. असेच खुराक व शेळ्या या बाबतीत म्हणता येईल.
१२) तेंव्हा नवीन व नवख्या शेळी पालकाने माझ्या मते स्वतःशी असे ठरवून घ्यावे कि मी अमुक अमुक किमतीपेक्षा जास्त किमतीचा चारा खाऊ घालणार नाही, अमुक तमुक किमतीचा खुरकच खाऊ घालीन व अमुक तमुक उत्पादन क्षमतेच्या व भांडवली गुंतवणूक कमी असणाऱ्या शेळ्यांच खरेदी करिन.

लेखक- बाळू मोटे बारामती
7

१) संकरीकरण (हैब्रिडायझेशन किंवा क्रॉस ब्रीडिंग) म्हणजे भरमसाठ उत्पादन वाढ असं आपण समजतो, किंवा तसं आपल्यावर बिंबवल जातं, किंवा आपण सगळीकडे अशी संकरित उत्पादनांची भरपूर उदाहरणे पाहतो.
२) उत्पादन वाढी साठी बंदिस्त शेळ्यांच्या बाबतीत बोअर, बिटल, सिरोही, कोटा वगैरे शेळ्यांशी संकर करण्याचा सल्ला हमखास दिला जातो. संकरीकरण केल्याने हायब्रीड व्हीगर तयार होते अस सांगितलं जातं.
३) तेंव्हा पुस्तके, प्रशिक्षणे, चर्चासत्रे वैगरे माध्यमातून संकरिकरणाचे फायदे व यशोगाथा पहावयास मिळतात.
४) संकरीकरण सगळीकडेच म्हणजे सर्वच वनस्पतीत व प्राण्यात तितकं यशस्वी होतं का किंवा तशी हायब्रीड व्हीगर मिळते का? असा प्रश्न आपल्या मनात कधी येत नाही. असं कोणी समजावत नाही किंवा त्यावर फारसं कोठे वाचावयास मिळत नाही.
५) या साठी सेल्फ स्टडी करावा लागेल तेंव्हाच संकरीकरनातलं इंगित समजेल. मी तसा तो केला आहे आणि या चॅनेल द्वारे वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा हा अभ्यास काही परिपूर्ण नाही परंतु, माझी विनंती अशी कि आपण या पुढचा अभ्यास स्वतः करावा. किंवा माझ्या म्हणण्यात काही त्रुटी असल्यास निदर्शनास आणून द्याव्यात.
६) संकरिकर्णकडे जाण्यापूर्वी काही उदाहरणे पाहू-
- खेचर (घोडा व गाढवाचा संकर)
- जिप (शेळी व मेंढीचा संकर)
- वणराजा, गिरीराज कोंबड्या (देशी व विदेशी कोंबड्यांच्या जातीचा संकर)
- टोमॅटोचे संकरित वाण ( झुडुपवर्गीय व वेलवर्गीय जातींचा संकर)
- संकरित hf गायी ( देशी गाई व विदेशी hf गाईचा संकर)
- मका पिकाचे संकरित वाण ( मक्याच्या निवड पद्धतीने तयार केलेल्या विविध वाणांचे व प्रकारांचे संकर)
- आंबा, पेरू, डाळिंब, सीताफळ इ संकरित वाण
- भेंडी, गवार, काकडी इ संकरित वाण
- सानेंन शेळी - उदाहरणे पुष्कळ आहेत, चर्चेसाठी एवढी पुरतील.
७) घोडा व गाढव या दोन स्वतंत्र प्रजातींचा संकर करून खेचर तयार झाले. खऱ्या अर्थाने हि हायब्रीड व्हीगर आहे कारण यात घोड्याच्या व गाढवाच्या गुणांचा सुयोग्य संगम आढळतो. जी कामे घोडा व गाढव करू शकत नाही ती कामे खेचर करते. मात्र खेचरला मूल बाळ होत नाही अशी माहिती नेट वर वाचायला मिळते.
८) जीप हा देखील खेचाराप्रमाणे शेळी व मेंढीचा अंतरप्रजातीय संकर आहे परंतु, ती यशस्वी होत नाही. थोडक्यात हायब्रीड व्हीगर सोडाच, तयार झालेली संकरित जात पुढे जगत नाही. अशी माहिती नेटवर आहे.
वरील दोन उदाहरणातून हे दिसून येते कि हायब्रीड व्हीगर सर्वच प्राण्यांच्या व वनस्पतींच्या दोन जातीच्या किंवा अंतरप्रजातीच्या संकरातून मिळतेच असे नाही.
९) वणराजा व गिरीराज या कोंबड्या विकसित करताना परदेशातील अपल्यापेक्ष कितीतरी जास्त अंडी व मांस उत्पादन देणाऱ्या कोंबड्यांच्या जातीशी संकर केलेला आहे. त्या परदेशातील जाती आपल्याकडे वाढवणे शक्य नसते कारण आपले हवामान त्यांना मानवत नाही, म्हणून आपण त्यांचे 50 टक्के रक्त असलेले संकर करून हायब्रीद व्हीगर मिळवतो, ज्यांचे उत्पादन स्थानिक कोंबड्यांपेक्षा कितीतरी जास्त मिळते.
बरोबर असंच संकरित hf गाईंच्या बाबतीत झाले आहे. मूळ hf गाय हि थंड हवामानात वाढणारी असून ती तिकडे प्रति दिन प्रति गाय 25 लिटर सरासरी दूध देते. मूळ hf गाय आपल्याकडे सांभाळणे शक्य नाही, आपले हवामान तिला अजिबात मानवणार नाही. तसेच देशी गायीचे व hf गाईचे कुळ वेगवेगळे असल्याने आपल्याकडील संकरित hf गाई ह्या अंतरप्रजातीय संकर होत. मूळ hf गाईचे 50 टक्के रक्त संकरित hf गायी मध्ये येत असल्याने आपणास हायब्रीड व्हीगर मिळते व दूध उत्पादनात देशी गाईनपेक्षा सरासरी 4 ते 6 लिटर ची वाढ मिळते.
१०) टोमॅटोचे वेगवेगळे 5 प्रकार आहेत. त्यांचं वर्गीकरण मुख्यतः दोन प्रकारात करतात. एक म्हणजे झुडुपवर्गीय (determinate) आणि दुसरं वेलवर्गीय ( indeterminate). येथे ज्या हवामानात झुडुपवर्गीय येते त्याच हवामानात वेलवर्गीय देखील येते. या उदाहरणात आपणास हायब्रीड व्हीगर चा अर्थ लक्षात येईल, त्यासाठी हे उदाहरण सांख्यिकीय पद्धतीने पाहू-
- समजा वेलवर्गीय टोमॅटोच्या झाडाला 200 फळे प्रत्येकी 40ग्राम ची लागतात. तेंव्हा एकूण उत्पादन 8000ग्राम मिळते.
- झुडुपवर्गीय टोमॅटोला 50 फळ प्रत्येकी 150ग्राम वाजनाची लागतात. तेंव्हा एकूण उत्पादन 7500ग्राम उत्पादन मिळते.
- झुडुपवर्गीय व वेल वर्गीय जातींचा जेंव्हा संकर केला जातो (semi indeterminate) तेंव्हा संकरित जाती (f1 हायब्रीड) मध्ये दोघांच्या अनुवांशिक गुणधर्माची सरासरी येते.
- येथे फळाच्या संख्येची सरासरी येईल २००+50/2= 125 फळ.
- फळाच्या वजनाची सरासरी येईल ४०+१५०/२=९५ ग्राम.
- या हिशोबाने तयार होणाऱ्या f1 संकरित जातीचे उत्पादन  125x95 बरोबर 11875 ग्राम येईल.
- याला म्हणतात हायब्रीड व्हीगर कारण यात दोन्ही माता पित्याच्या उत्पादनपेक्षा कितीतरी जास्त उत्पादन मिळालं.
- पूर्वी टोमॅटो चे उत्पादन एकरी 4 ते 8 टन मिळायचे आता ते एकरी 40,60 अगदी 90 टनापर्यंत मिळते ते केवळ
हायब्रीड व्हीगर (संकरित जोम) मुळे.
११) अफघाणीस्थानी घोडे (पूर्वी युद्धात वापरायचे आता लग्नात नावरदेवसाठी वापरतात ते) व मेंडपालांकडे बिर्हाड वाहण्यासाठी असणारे घोडे हे असेच टोमॅटो सारखे एकाच जातीचे दोन प्रकार आहेत. या दोघांचा संकर करून हायब्रीड व्हीगर असलेली नवीन जात निर्माण केल्याच वाचनात, ऐकण्यात नाही, किंबहुना ते शक्य नसावं.
१२) मका पिकामध्ये देखील टोमॅटो सारखे 3 प्रकार माझ्या माहिती प्रमाणे आहेत. त्यातले दोन म्हणजे पिवळी व पांढरी मका. मुळात मका पिकात इतर कोणत्याही पिकात झाले नसेल एवढे संशोधन झाले आहे. मका पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन देणारे सरळ वाण निवड पद्धतीने तयार करून त्यांचे पुन्हा संकरीकरण करून हायब्रीड व्हीगर मिळवतात. बऱ्याच वेळा दोन संकरित वाणांचा पुन्हा संकर करून डबल हायब्रीड मिळवतात. यांचं उत्पादन सरळ वानांपेक्षा कितीतरी पटीने जास्त मिळतं.
१३) आता संकरीकरण करून हायब्रीड व्हीगर कोठे मिळाली नाही ते पाहायला हवं. हापूस, केशर या आंब्याच्या निवड पद्धतीने तयार केलेल्या जाती आहेत तर नीलम, रत्ना या संकरित जाती आहेत. या दोन्ही संकरित जाती फार प्रसिद्ध झाल्या नाहीत कारण संकरीकरण करून त्यात उत्पादन वाढलं नाही किंवा चवही वाढली नाही. सरदार हि पेरूची निवड पद्धतीनं तयार केलेली जात आहे तर तिचाच वापर करून संकरित पेरूची ललित हि गरास गुलाबी रंग असलेली जात निर्माण केली आहे. ललित चे उत्पादन सरदार पेक्षा जास्त नाही. डाळिंबामध्ये आरक्ता व मृदुला या संकरित जाती आहेत, पण उत्पादनात विशेष वाढ नाही.
१४) टोमॅटो सोडून इतर भाजीपाल्यात संकरिकरणातून उत्पादानत भारीव वाढ झाली अशी उदाहरणने फारच कमी आहेत. उदा कांदा लसूण, गवार भेंडी, वेलवर्गीय भाजीपाला इ मध्ये संकरित जातींचे उत्पादन जेमतेम आहे.
१५) डाळ वर्गीय व तेलवर्गीय पिकात संकरिकरणातून उत्पादन वृद्धी होईल अश्या संकरित जाती का निर्माण झाल्या नाहीत. कारण भारत या पिकांचा मोठा आयातदार देश आहे. या पिकांत हायब्रीड व्हीगर मिळत नसावी.
१६) सानेंन शेळी व फुले त्रिवेणी गाय यांचा विचार करू. सानेंन हि दूध उत्पादन वाढीसाठी संकरित शेळी ची जात विकसित केली आहे. आता ती संकरित नसून स्वतंत्र जात आहे. फुले त्रिवेणी गाई मध्ये गीर 25 टक्के hf 50 टक्के व जर्सी 25 टक्के असा रक्ताचा संगम किंवा अनुवांशिक गुणधर्माचा संगम आहे. ती आता एक स्वतंत्र गायींची जात आहे.
१७) माझ्या माहितीत असं एकही उदाहरण नाही कि दोन भारतीय देशी गाईंचा संकर करून जास्त दूध उत्पादन देणारी हायब्रीड व्हीगर गाय तयार केली आहे. कारण दोन देशी गाईच्या संकरातून हायब्रीड व्हीगर मिळणे सध्या तरी शक्य नाही. दोन देशी जातीच्या कोंबड्यांच्या संकर करून त्यांच्या पेक्षा जास्त उत्पादन देणारी संकरित जात विकसित केली आहे काय? जाफराबादी व किंवा मुऱ्हा म्हशींचा पंढरपुरी म्हशी सोबत संकर करून त्यांचे पेक्षा जास्त उत्पादन देणारी म्हशीची जात विकसित केली आहे काय?
१८) शेळ्यांमध्ये दोन देशी जातीचा संकर करून हायब्रीड व्हीगर मिळवता येणार नाही हे एव्हाना स्पस्ट झाले असावे. थंड प्रदेशातील शेळीच्या जातीचा उष्ण प्रदेशातील जातींशी केलेला संकर यशस्वी होत नाही हे नेट वर वाचावयास मिळते. परदेशातील जास्त मांस व दूध उत्पादन देणाऱ्या शेळ्यांच्या जातींशी भारतीय शेळ्यांच संकर केला असता जे गुणधर्म संकरित जातीत येतात ते एकतर कायमस्वरूपी टिकत नाहीत किंवा त्यांच्यात सत्यतता नसते.
१९) आता प्रश्न आहे तो बोअर जातीच्या शेळीच्या संकराबाबतचा. बोअर या शेळीचा इतिहास पहिला तर ती मुळातच वेगवेगळ्या शेळ्यांच्या जातीपासून तयार झालेली एक संकरित जात आहे. आता ती स्वतंत्र जात जरी असली तरी. बोअर शेळी मध्ये आणि भारतीय उत्पादनामध्य किंवा त्यांच्या अनुवांशिक गुणधर्मामधे फार मोठा फरक नाही. जर तो तसा असता तर आपणास ती पासून नक्कीच हायब्रीड व्हीगर मिळाली असती. उदा. बोअर चे जुळे देण्याचे प्रमाण भारतीय शेळ्यांपेक्षा फार जास्त नाही, बोअर चे आकारमान देशी शेळ्यांपेक्षा फार जास्त नाही. बोअर चा संकर करून मांस उत्पादन माता पित्याच्या सरासरी इतके जरूर वाढेल पण ते केंव्हाही बोअर बोअर पेक्षा जास्त वाढणार नाही. म्हणजेच हायब्रीड व्हीगर मिळणार नाही.
२०) तेंव्हा मला असं वाटतं कि शेळ्यांमध्ये संकरीकरण करण्यापेक्षा निवड पद्धतीचा अवलंब करावा. तोच एकमेव उत्पादन वाढीचा मार्ग आहे. या चॅनेल वर सुरवातीपासून हेच सांगत आलो आहे.
चॅनेल वरील लोकांना हि माहिती वाचावयास मिळाली परंतु जे अशिक्षित शेळी पालक आहेत ज्यांच्या मनात बोअर व इतर शेळ्यांच संकर करण्याचा विचार आहे अश्या लोकांपर्यंत हि माहिती पोचविण्याचे जबाबदारी या चॅनेल वरील वाचकांची आहे अस मी समजतो व माझी अपना सर्वाना तशी विनंती आहे. अश्या लोकनसाठी समाजसेवेच्या भूमिकेतून आपण सर्वांनी हे करावं कारण-
" चांद भी है, सुरज भी
मगर आप रास्ते का दिया बन जाईये।"

लेखक- बाळू मोटे बारामती. ९४२२५१२६८०

Friday, March 1, 2019


6


१) आमच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय मेंढी व शेळी पालन हा आहे. माझ्या बहुतांश नातेवाईकांचा देखील मुख्य व्यवसाय हाच आहे. त्यातील काही लोकांनी मागील 10 वर्षात शेळ्या मेंढ्या विकून थोडीफार शेती खरेदी केली किंवा कर्ज काढून डोझर असलेले मोठे ट्रॅक्टर खरेदी करून कोकणात व्यवसायासाठी गेले. काही वर्षांपूर्वी या ट्रॅक्टर च्या व्यवसायात चांगले पैसे मिळत होते परंतु आता मात्र ट्रेकटर विकून मेंढर खरेदी करण्याचं प्रमाण लक्षणीय वाढलेलं आहे.
२) माझे नातेवाईक व सामाजातील बरीच लोकं माझा बंदिस्त शेळी पालन प्रकल्प पाहायला येतात व मला काही मोलाचे सल्ले देतात. आपण अडाणी समजतो अश्या लोकांनी मला सुरवातीला सांगितलं होत कि ' पहिले दीड -दोन वर्ष तुला अवघड जातील, एकदा का शेळ्यांनी रान घेतलं कि मग तू सुटलास'. जे जे अशिक्षित होते त्यांनी मला बंदिस्त शेळी पालन करण्यास विरोध केला नाही, परंतु जे शिकलेले आहेत व कोठे तरी नोकरी करतात अश्या बहुतांश जणांनी हा व्यवसाय बंद करून कोठेतरी नोकरी करण्याचा सल्ला दिला.
३) धनगर मेंडपाळांचे काही अनुभव मी येथे देत आहे-
:- 12 महिने फिरत्या मेंढ्या जर आपण घरी मूळ गावी ठेवल्या व मोकाट पद्धतीने जरी चारल्या तरी त्यांच्या 1 ते 2 वितात उत्पादनात घट येते.
:- फिरत्या मेंढ्याना व शेळ्यांना दररोज वेगवेगळ्या शेतात रात्री बसण्याची सवय असते. पावसाळ्यात अश्या शेतात मेंढरे बसवण्यास मर्यादा येतात, तेंव्हा अश्या वेळेस उंच ठिकाणी कायमचा 1 ते 4 महिण्याकरिता तळ ठोकतात, त्यास आम्ही मरड असे म्हणतो. जेंव्हा शेळ्या व मेंढ्या मरडीवर बसवतात त्या कालावधीत त्या खराब होतात व उत्पदनात थोडी घट येते.
:- फिरत्या मेंढ्याना काही गावातील चारा मानवतो तर काही गावातील मानवत नाही. ज्या गावातला चारा मानवत नाही
त्यास आम्ही 'बसक चांगली नाही' असे म्हणतो. ज्या गावाची बसक चांगली नाही त्या गावास गेल्यास दरवर्षी मेंढ्या खराब होतात असा अनुभव येतो. उलटपक्षी त्याच गावातील स्थायिक मेंढ्या व शेळ्या मात्र तब्यतीने चांगल्या दिसून येतात. याचाच अर्थ असा, कि ती बसक स्थानिक शेळ्या मेंढ्याना मानवत असते.
:- काही गावाचं वैशिष्ट्य असं आहे कि त्या गावात व परिसरात मेंढर गेली कि त्यांना विशिष्ट आजार उदा. माळीण होतो. माळीण महणजे नाकातून रक्त किंवा रक्त मिश्रित शेम्बुड येणे. परंतु स्थानिक जनावरांना हा त्रास होतोच असे नाही.
:- आमची मेंढरे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही भागात वर्षभर फिरत असतात, त्यामुळे वेगवेगळ्या गावातील, परिसरातील वेगवेगळा अनुभव येत असतो.
४) अश्या प्रकारे स्थानिक शेळ्या व मेंढ्या विविध वातावरणास व वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीस वेगवेगळा प्रतिसाद देतात.
५) व्हाट्स ऍप सारख्या माध्यमातून बंदिस्त शेळी पालनासाठी सिरोही, बिटल, सोजत, बार्बेरि वगैरे जातींची शिफारस व जाहिरात केली जाते. त्यात प्रामुख्याने असा दावा असतो कि उदा राजस्थानातील सिरोही हि शेळी तेथून आणून महाराष्ट्रातील वातावरणात एक महिना ठेऊन सेट केली जाते व आपल्याला विक्रीस उपलब्ध असते. 
असं कोणतं तंत्रज्ञान आहे कि ज्याचा वापर करताच कित्येक मैल अंतरावरील, विषम भौगोलिक व वातावरणातील सिरोही शेळी आपल्याकडे एका महिन्यात तीनही मोसमाकरिता सेट होते.
६) माझ्या मेंढरांतील माझ्या माहितीतल्या शेळ्या बंदिस्त केलंयानंतर सेट व्हायला मला किमान दीड वर्ष लागले. 
७) सिरोही शेळी किंवा इतर तत्सम देशी व विदेशी शेळ्या महाराष्ट्राच्या वातावरणात एका महिन्यात सेट होत असेल तर ते आक्रीतच म्हणावं लागेल. कोणी या विषयाचं प्रशिक्षण देत असेल तर कृपाय कळवावे.
८) शेळी हा समूह प्रिय प्राणी आहे, आणि त्याबाबतीत तो खूप संवेदनशील आहे. म्हणजे असं कि तुमचा समजा 20 शेळ्यांच बंदिस्त फार्म आहे आणि त्यात तुम्ही त्याच जातीची दुसऱ्या कळपातील शेळी आणून ठेवली तर तिला कित्येक महिने करमत नाही. तिची तब्येत सुधारत नाही. 
शेळी हा प्राणी समूहाप्रिय असून समूहात भांडणं करायला तिला आवडतं. त्या शक्यतो स्वतःच्या रक्ताच्या नात्यातील शेळ्यांसोबत राहायला, खेळायला, चरायला पसंत करतात.
९) असं असताना वेगवेगळ्या ठिकाणच्या शेळ्या गोळा करून त्या आपल्याला महागड्या किमतीने दिल्या जातात, आणि आपणही त्या घेतो. त्यांनी एकत्र कसं राहावं, कसं खावं, प्यावं, खेळावं.
एका महिन्यात कसं सेट व्हावं...!

balu mote