Saturday, July 13, 2019

21

1) या पोस्ट मध्ये मी माझ्याबद्दल थोडक्यात लिहिणार आहे, या लिखाणाचा उद्देश केवळ एवढंच आहे; या चॅनेल चा लेखक नेमका कोण आहे, त्याचा अनुभव काय आहे, हे आपणास समजावं.
2) पोस्ट क्रं 1 मध्ये मी आत्मप्रौढी बाबत लिहिलं होतं, इथं कदाचित ते होईल असं वाटत; काही अंशी ते अपरिहार्य आहे असं मला वाटतं. स्वतः बद्दल सांगणं, स्वतःची ओळख करून देणं यात काही गैर आहे, असही काही नाही, बहुतेक जणं हे विधान मान्य करतील.
3) आपण नेहमी तञ् किंवा अनुभवी लोकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, नव्हे तसा तो आवर्जून करणे हे आपल्याच हिताचे असते.
4) मी कृषी शाखेचा पदवीधर आहे (BSc. Horticulture). 2008 ते 2014 पर्यंत मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थेत कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होतो. kvkbaramati. com नावाच्या वेबसाइटवर आपण या कृषी विज्ञान केंद्राची माहिती पाहू शकता. हे पद सर्वात कनिष्ठ तांत्रिक पद होते. माझ्याकडे 2008 ते 2012 पर्यंत टोमॅटो उत्पादन वाढी संबंधी एक केंद्र शासनाचा प्रकल्प होता, त्यानंतर पुन्हा 2011 ते 2014 पर्यंत आणखी एक दुष्काळ निवरणासंबंधी करावयाच्या उपाय योजनांचा प्रकल्प होता. हि माझी तिथली प्रमुख कामे. या व्यतिरिक्त मी तेथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, kvk च्या उत्पादनांचे प्रदर्शन लावणे, संस्थेच्या अंतर्गत रिपोर्टींग व डॉक्युमेंटेशन करणे, स्वयंचलित खते व सिंचन देणारी यंत्रणा चालवणे इ कामे करत असे. यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे मार्फत तेथे कृषी पदवीचा कोर्स चालवला जातो, यात मला मुलांना भाजीपाला हा विषय शिकवावा लागे. दर शनिवारी व रविवारी याच्या तासिका असायच्या. आम्ही एक इटली या देशातून टोमॅटो रोपे लागवड यंत्र आणले होते, त्याचा काही उपगो होत नव्हता. मी त्यात थोडीशी अड्जस्टमेंट करून ते यंत्र ऊस रोपे लावण्याकरिता तयार केले व त्याची यशस्वी चाचणी देखील घेतली. या संबंधीचा व्हिडिओ आपणास kvk च्या वेबसाइटवर किंवा यु ट्युब वर पाहायला मिळेल. Kvk च्या नवीन इमारतीचे उदघाटन करण्याकरिता महामहिम राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी kvk त आले होते, या कार्यक्रमात kvk च्या वीस वर्षाच्या कामाचा आढावा घेणारे एक पुस्तक प्रकाशित झाले होते, त्या पुस्तकाचा कच्चा मसुदा मी व माझ्या सहकार्यांनी तयार केला होता. हा मसुदा तयार करण्यासाठी आम्हाला साधारण वीस दिवस लागले. या कमी आम्ही kvk चे सर्व जुने दप्तर चाळून काढले, एक प्रकारचे ते संशोधन होते.  दुष्काळ निवारण संदर्भातल्या उपाय योजना बाबत मी एक पुस्तक तयार केले होते, ते संपादनाची अंतिम टप्प्यात आले होते परंतु नोकरी सोडल्यामुळे ते काम पूर्ण झालं नाही. माझे ऍग्रोवोंन मधून बरेच लेख प्रकाशित झाले आहेत.Kvk मध्ये एक किऑस्क किंवा टच स्क्रीन संगणक आहे, त्यावर एक ppt बेस प्रोग्रॅम मी बनविला होता, अर्थात मी नोकरी सोडल्यामुळे तो अपुर्ण राहिला आहे. तसेच एक LED टीव्ही आहे त्यावर kvk च्या उत्पादनांची माहिती दाखवली जाते. ती माहिती मी बनविली होती. शेतकरीयांच्या ऑनलाइन विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं काम मी एक वर्ष केलं होतं, आता ती वेबसाईट कधी बंद असते तर कधी चालू. (Aaqua.org). मी काम करत असलेल्या दुसऱ्या प्रोजेक्ट ची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात अली, kvk च्या वतीने माझा व गावाच्या वतीने एक शेतकरी श्री पांडुरंग वाबळे यांचा सत्कार आयसीआर चे त्यावेळी चे उपमहासंचालक श्री एस अय्यपन यांचे हस्ते झाला. त्यावेळला आम्हाला विमान प्रवासाचा योग्य व दिल्ली फिरून पाहण्याचा योग्य देखील kvk मुळे मिळाला.
Kvk ला अनेक पुरस्कार मिळालेत, त्यापैकी दोन पुरस्कारांसाठी मी प्रपोझल्स बनविली होती. Fao यांचे एक पिकांना पाणी देण्यासंबंधीचे CROPWAT नावाचे सॉफ्टवेअर ऑनलाइन मोफत मिळते, याचा मी अभ्यास करून स्वयंचलीत प्रणालीवर पाणी मोजून देण्याचे प्रयोग केले होते. Kvk तील कामाबाबत आणखी बरेच लिहिता येईल. तेथील माझ्या गुरू व kvk च्या प्रमुख डॉ कादरभाई या होत्या. खरं तर मी जे काही तेथे काम केलं ते केवळ त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला करता आलं. त्या नसत्या तर कदाचित मी तेथे एक वर्ष देखील नोकरी करू शकलो नसतो. एखाद्या संस्थेचा प्रमुख कसा असावा, मॅनेजमेंट कसं असावं, नियोजन आणि ध्येय धोरण कशी आखावी आणि राबवावेत, प्रेझेन्टेशन कशी करावीत हे सर्व आणि आणखी कितीतरी बाबींचे आदर्शवत उदाहरण म्हणजे डॉ कादरभाई या होत. या कार्यकाळात अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणे घेण झालं. बराच भारताचा बराच भाग फिरायला मिळाला. मी kvk चा व डॉ कादरभाई यांचा सतत ऋणी आहे.
5) शेळ्या व मेंढ्या सांभाळणे हा आमच्या फॅमिलीचा पारंपरिक व पूर्वापार व्यवसाय आहे. माझ्याकडे सध्या 200 मेंढरं आहेत आणि ती सतत फिरतीवर असतात. पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील बराचसा भाग मी मेंढरमागे सुट्टीच्या (दिवाळी, उन्हाळा इ) फिरून काढला आहे. अनेक जणांच्या शिव्या खाल्या, काही ठिकाणी मार देखील खाल्ला आहे

. सध्या मेंढरमागे माझी आई, मावशी मावसभाव असतात. मी इकडे  शेळी पालन व शेती सांभाळून त्यांना मदत करत असतो. आर्थिक स्थिती बेताची असल्याने माझं शेळी पालन मंद गतीने पुढे जात आहे.
6) 2014 मध्ये नोकरी सोडल्यावर काही ठिकाणावरून नोकरी साठी बोलावणे आले होते, पण शेळी पालन करायचं हा निश्चय करून मी आमच्या कोरडवाहू शेतीत आलो. अजूनही येथेच शेळी पालनात करियर करायचं या निर्णयावर मी ठाम आहे. (उद्या कदाचित हा निश्चय बदलू शकतो.).

धन्यवाद.

No comments:

Post a Comment