Friday, April 12, 2013

टोमॅटो लागवड- माझी मते-


१.       टोमॅटोची रोपे नर्सरीतून विकत आणण्याएवजी घरी तयार करावीत. रोपे तयार करताना १०२ कप असलेला प्रो ट्रे (सिडलींग ट्रे) वापरावा. यामध्ये कोकोपीट व गांडूळ खत वापरून रोपे तयार करावीत. रोपांचे रस शोषण करणा-या किडीपासून चांगले संरक्षण करावे. म्हणजे पुढे येणारे विषाणूजन्य रोगांचे प्रमाण कमी होईल.
२.      लागवड गादीवाफ्यावर करावी. ५ फूट अंतरावर गादीवाफे काढावेत. यानंतर गादिवाफ्याच्यामध्ये फक्त सेंद्रिय खते उदा. शेणखत, कोंबडी खत, गांडूळखत, लेंडी खत इ. चळी घेऊन टाकावे व मातीने बुजवून घ्यावे. साधारणपणे एकरी ५ टन सेंद्रिय खाते टाकावीत.
३.      गादिवाफ्ये तयार करताना कोणत्याही रासायनिक खतांचे बेसल डोस देऊ नयेत.
४.     यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक सिंचनाची उपनळी गादीवाफ्यावर अंथरावी. हलक्या व मध्यम जमिनीसाठी ४० सेमी अंतरावर ड्रीपर असलेल्या दोन उपनळ्या टाकाव्यात. हलक्या व मध्यम जमिनीसाठी ड्रीपरचा डिश्चार्ज २ लिटर प्रती तास असावा. भारी जमिनीकरिता प्रत्येक बेडवर एक उपनळी तसेच ४० सेमी अंतरावरील तासी ४ लिटर क्षमतेचा ड्रीपर पुरेसे ठरते.
५.     हंगामानुसार व जमिनीनुसार लागवड अंतर ठेवावे. हलक्या व मध्यम जमिनीत जोड ओळ पद्धतीने लागवड करावी. जोडओळ पद्धतीने लागवड करावयाची असल्यास रोपारोपातील अंतर उन्हाळी हंगामात १.६ ते २ फूट ठेवावे, पावसाळी व रब्बी हंगामात २ ते २.६ फूट ठेवावे. एकाच ओळीत लागवड करावयाची असल्यास रोपारोपातील अंतर उन्हाळी हंगामात १ ते १.३ फूट ठेवावे, पावसाळी व रब्बी हंगामात १.६ ते २ फूट ठेवावे. भारी जमिनीत उन्हाळी हंगामात एक ओळ पद्धतीने लागवड करावयाची असल्यास रोपारोपातील अंतर १.६ फूट तर रब्बी हंगामात २ फूट ठेवावे. भारी जमिनीत जोडओळ पद्धतीने लागवड करावयाची असल्यास उन्हाळी हंगामात २ ते २.६ फूट तर रब्बी हंगामात २.६ फुटापेक्षा जास्त ठेवावे.
६.      भारी जमिनीत पावसाळी हंगामात टोमॅटोची लागवड करू नये.
७.     लागवड करण्यापूर्वी गादीवाफा ठिबक सिंचनाने चांगला भिजवून ओला करावा. या वेळेस ठिबक सिंचनातून ट्रायकोडर्मा एकरी ३ लिटर सोडावे. जर परिसरामध्ये किंवा लागवडीच्या शेतात जीवाणूजन्य मर येत असेल तर सुडोमोनास एकरी ३ लिटर सोडावे.
८.      रोपे लागवड करताना रोपांच्या रूट बॉलला धक्का लावू नये. रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.
९.      लागवड केल्यानंतर गादीवाफा पुन्हा चांगला ओला करावा.
१०.   लागवडीनंतर पाण्याचे योग्य नियोजन करावे. हलक्या व मध्यम जमिनीकरिता उन्हाळी हंगामात लागवडीनंतर सुरवातीचे १५ ते २० दिवस २ लिटर क्षमतेचा ड्रीपर असलेली ठिबक सिंचन संच साधारणपणे २० मिनिटे, त्यानंतर फुले येयीपर्यंत ३० ते ४० मिनिटे, त्यानंतर फळ धारणा होताना ४० ते ५० मिनिटे व त्यानंतर ५० ते ६० मिनिटे याप्रमाणे दररोज चालवावा.
११.   हलक्या व मध्यम जमिनीकरिता पावसाळी व रब्बी हंगामात लागवडीनंतर सुरवातीचे १५ ते २० दिवस २ लिटर क्षमतेचा ड्रीपर असलेली ठिबक सिंचन संच साधारणपणे १० ते १५ मिनिटे, त्यानंतर फुले येयीपर्यंत २० ते ३० मिनिटे, त्यानंतर फळ धारणा होताना ३० ते ४० मिनिटे व त्यानंतर ४० ते ५० मिनिटे याप्रमाणे दररोज चालवावा.
१२.  भारी जमिनीकरिता उन्हाळी व रब्बी हंगामात लागवडीनंतर सुरवातीचे १५ ते २० दिवस ४ लिटर क्षमतेचा ड्रीपर असलेली ठिबक सिंचन संच साधारणपणे १० ते १५ मिनिटे, त्यानंतर फुले येयीपर्यंत २० ते ३० मिनिटे, त्यानंतर फळ धारणा होताना ३० ते ४० मिनिटे व त्यानंतर ४० ते ५० मिनिटे याप्रमाणे दररोज चालवावा.
१३.  सर्व रासायनिक खते ही पाण्यात विरघळणाऱ्या ग्रेडद्वारे द्यावी. लागवडीनंतर सुरवातीचे १५ ते २० दिवस १२:६१:०० या किंवा १९:१९:१९ या ग्रेडचा वापर करावा, त्यानंतर फुले येयीपर्यंत १३:४०:१३ किंवा १२:६१:००, त्यानंतर फळ धारणा होताना ००:५२:३४ व त्यानंतर. ००:५२:३४ अधिक १३:४०:१३ अधिक ००:००:५० या ग्रेडच्या खतांचा तज्ञांच्या सल्ल्याने उपयोग करावा.
१४.  सूक्ष्म अन्नद्रव्ये देताना सुट्टे किंवा प्रत्येक घटक वेगवेगळे असलेले अन्नद्रव्ये द्यावीत किंवा चीलेटेड सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा.
१५. टोमॅटोची बांधणी करताना झाडाच्या प्रत्येक फांदीला स्वतंत्रपणे सूर्यप्रकाश मिळेल हे पाहावे. या साठी एका बेडवर दोन तारा ओढाव्यात.
१६.   कीड व रोग नियंत्रणासाठी दररोज शेताची सकाळी व संध्याकाळी पाहणी करावी. किडींचा व रोगांचा अभ्यास करावा. एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाच्या पद्धतींचा अवलंब करणे फायद्याचे वाटते.
१७. सर्वसाधारणपणे टोमॅटो पिकावर दर आठवड्याला कमीतकमी एक फवारणी घ्यावी लागते.

कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे टोमॅटो या पिकावर सतत ४ वर्षे पुणे जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक २५ गावांमध्ये टोमॅटोचे उत्पादकता वाढीकरिता अनेक प्रयत्न करण्यात आले. हे प्रयत्न करताना शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. त्यानुसार विविध तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचविन्याचा प्रयत्न करण्यात आला.


या ब्लॉगवरील सर्व माहिती शास्त्रीय ज्ञानावर आधारित असून प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या माहितीची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतकऱ्यांनी या ब्लॉगवरील माहितीचा उपयोग स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामाकरिता लेखक जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क-
श्री. बाळू मोटे- ९४२२५१२६८०

No comments:

Post a Comment