Saturday, July 13, 2019

10

१) चारा व्यवस्थापन कसे करावे या विषयी अनेक सल्ले मिळतात, परंतु ठोस असे दिशादर्शन मिळत नाही. या पोस्ट मध्ये मी माझी या विषयी काही ठोस मते मांडणार आहे.
२) चाऱ्याच्या बाबतीत शेळी या प्राण्यास लक्षात घेता काही विशिष्ट गृहीतके किंवा नियम आहेत; ती वेगवेगळ्या ठिकाणी पहावयास ऐकावयास मिळतात व बंदिस्त शेळी पालनाकरिता सुचवली जातात त्यातील काही खालील प्रमाणे-
- शेळी 70 टक्के चारा (झाडावरील) ओरबाडून (browsing) खाते तर 30 टक्के जमिनीलगत (grooming) चरते.
- शेळीच्या खाद्यात किंवा चाऱ्यात सतत बदल करायला हवा कारण शेळी वेगवेगळा चारा खाणे जास्त पसंत करते.
- शेळी साठी झाडपाला मिळेल असा चारा लागवड करावी. ज्या मध्ये सुबाभूळ, शेवगा, शेवरी, हादगा, अंजन, ग्लिरिसिडिया, तुती इ अनेक झाडांची नावांची यादी दिली जाते.
- त्या बरोबर मका, मेथी घास, दशरथ घास, मारवेल, बरसीम, कडवळ, हत्ती घास इ चा चाऱ्यात नियमित वापर असावा असं ठासून सांगितलं जातं.
- जनावरांसाठी (शेळी धरून सर्वांसाठी) आहारात 70 टक्के एकदल वर्गीय व 30 टक्के द्विदल वर्गीय चारा द्यावा.
- शेळीला 3 ते 5 किलो हिरवा चारा व 0.5 ते 2 किलो सुका चारा द्यावा.
- पारंपरिक चार्यव्यतिरिक्त शेळीला ऍझोला, हैड्रोपोनिक मका, फळांच्या साली, यूरिया प्रक्रिया केलेल गव्हाचे काड, मुरघास इ द्यावे.
- कहर म्हणजे काही ठिकाणी घरातील ऊष्ठे, भाजीचे देठ इ चा शेळीच्या आहारात उपयोग करावा असं आवर्जून सांगितलं जातं. (या आहाराने किती शेळ्यांच किती पोट भरेल...?)
- शेळीचं दूध आयुर्वेदिक असतं त्याचे कारण म्हणजे ती वेगवेगळ्या झाडांचा पाला व विविध प्रकारचा चारा खाते.
-  चाऱ्या व्यतिरिक्त शेळीला 300 ते 500 ग्रॅम खुराक द्यावा.
- शेळीला 15 ते 20 ग्राम मिनरल मिकश्चर द्यावे.
- शेळीला भरपूर व थंड पाणी 24 तास उपलब्ध करून द्यावे. काहींच्या मते पाण्यात पोटॅशियम परमंगनेट तर काहींच्या मते थोडे मीठ तर काहींच्या मते गूळ टाकावा.
- इ.इ.इ.....
हि यादी खूप मोठी होईल.
३) वरील मुद्दा क्रमांक 2 मध्ये सांगितलेल्या बाबींशी मी व्यक्तिशः सहमत आहे. सांगितल्या प्रमाणे सर्व बाबी करता येत असतील तर अवश्य कराव्यात.
४) बंदिस्त शेळी पालन व मटनाकरिता करडे विकायची असतील, व्यवसाय फायदेशीर करायचा असेल तर माझ्या मते मुद्दा क्रं 2 मधील बाबींचा बारकाईने विचार करायला हवा.
५) चाऱ्याचे नियोजन करताना माझ्या मते 3 बाबीं पहाव्यात
- चाऱ्याची पौष्टीकता व मुबलकता
- चाऱ्याची किंमत
- चारा कापून शेळ्यांना खाऊ घालण्यात लागणारा वेळ.
६) मी सुरवातीला सांगितल्या प्रमाणे कोणीही चाऱ्याचे निश्चित असे नियोजन सांगत नाहीत; कि बाबा अमुक तमुक चारा लावल्यावर शेळ्या तब्यतीने चांगल्या राहतील. आर्थिक हिशोब बिघडणार नाही वैगरे. माझ्या मते खालील पद्धतीने चाऱ्याचे नियोजन केल्यास ते सर्व दृष्टीने फायद्याचे ठरते-
७) चार्यामध्ये प्रमुख तीन गोष्टी असाव्यात
- मका
- मेथी घास
- कोणताही एक झाडपाला (जसे सुबाभूळ, शेवरी )
या बरोबर 22 टक्के पेक्षा जास्त प्रथिने असलेला पुरेसा (पुरेसा याचा अर्थ भरपूर या अर्थाने) खुराक शेळीला दिला पाहिजे.
८) वरील पद्धतीने नियोजन केलं तर शेळ्याची तब्येत 100 टक्के चांगली राहते. चारा आणून घालण्यातलं वेळ वाचतो. वर्षभर हा चारा घेता येतो. यातील मका हि नेहमी चिकात आलेली असावी तर मेथीघस 30 टक्के पर्यंत फुलोऱ्यात आलेला असावा. सुबाभूळ किंवा शेवरी एकूण चाऱ्याच्या 20 ते 30 टक्के द्यावी.
९) वरील नियोजनात (८) सीझन नुसार थोडा फार बदल करता येईल. उदा स्वतःच्या शेतातील उपलब्धतेनुसार सोयाबीन, तूर, भूईमुग, कांदा पट इ शेळ्यांना देता येईल.
१०) चर्या बाबतीत माझी मते खालील प्रमाणे आहेत-
- उगीच महागडी बियाने आणून चाऱ्याची लागवड करू नये.
- चार्यावरचा एकूण खर्च दर दिवशी दर शेळी मागे हा 10 रु पेक्षा जास्त होता कामा नये या कडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.
- कडवळ व हत्ती घास हा चारा अगदीच नाविलाज असेल तरच शेळ्यांना द्यावा.
- मेथी घास, दशरथ घास, मारवेल या पैकी कोणताही एकच लावावा कारण या चाऱ्याची कापणी करण्यास बराच वेळ लागतो. शक्यतो मेथी घास लावावा. दर वर्षी नवीन रानात किंवा आलटून पालटून लावावा.
- मेथी घासवर मावा येतो, अश्या वेळेला मावा असलेला चारा खाऊ घालू नये, शेळ्या भुळकांडतात. त्यासाठी किनोलफॉस किंवा इमिडाक्लोप्रिड किंवा निंबोळी तेल किंवा स्पिनोसॅड इ पैकी एका औषधाची 8 दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. फवारणी केल्यानंतर दोन दिवस मेथी घास शेळ्यांना घालू नये. (निंबोळी तेल किंवा स्पिनोसॅड वापरल्यास घालू शकता)
- मका, मेथी घास व सुबाभूळ या सर्वांची कुट्टी करून शेळ्यांना द्यावा. सुबाभूळ अंगठ्याच्या आकारापेक्षा लहान किंवा तेवढी असावे.
- एकदल व द्विदल चाऱ्याचे प्रमाण 60:40 किंवा 50:50 या प्रमाणे ठेवावे.
- दररोज मिनरल मिकश्चर चा उपयोग करावा. माझ्या मते 10 ग्राम पेक्षा जास्त मिनरल मिकश्चर देण्याची आवश्यकता नसते.
- योग्य गुणवत्तेचा हिरवा चारा असल्यास सुका किंवा वाळलेला चारा किंवा वैरण अजिबात दिली नाही तरी काही फरक पडत नाही.
- गरज असेल तरच मुरघास बनवावा. मूरघासात मूळ मुक्यातील 2 टक्के प्रोटीन कमी होते.
- मुरघास बनवणे शक्य नसेल तर चिकातील मका उभीच सुकू द्यावी, नंतर कापावी व वाळवून साठवावी. अशी वाळलेली मका खाऊ घालणार असेल तर 30:70 असे प्रमाण मका व मेथी घासचे ठेवावे व ADE व K हे जीवनसत्व असलेले मिनरल मिकश्चर (जसे कि ऍग्रिमीन फोर्ट) द्यावे.
- माझ्या मते चारा व खुराक यांची शेळीच्या वजन वाढीतील व तब्येत सुधारण्यात 60:40 अशी भूमिका असावी. तेंव्हा चारा व खुराक यांचे उत्तम व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.
- स्थानिक जातीच्या शेळ्यांकरिता (उस्मानाबादी इ.) उगाचच विकतचा तूर भुसा, हरी पत्ती इ महागडा चारा खरेदी करू नये.
- उत्तम प्रकारचा खुराक हेच खरं शेळ्यांसाठी टॉनिक आहे. उगीचच अमुक तमुक टॉनिक पाजत बसू नये. कोणत्याही टॉनिक दररोज पाजल्याशिवाय वजनात फरक पडत नाही, व जो पडतो तो फार किरकोळ असतो. तसेच बरेच घरगुती उपचार सांगितले जातात जसे कि ताक पाजणे वैगरे. याची काही गरज नसते असे माझे स्पस्ट मत आहे.
११) मला माहित आहे कि मी सांगितलेलं चारा नियोजन बहुतेक शेळीपालकाना रुचनार नाही, आवडणार नाही. मला जे उमगलं तेच मी येथे लिहिलं आहे, बाकी ज्याची त्याची मर्जी..!
१२) वर नमूद सर्व विवेचन हे स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी व करडांची मटणासाठी विक्री करण्याकरिता पालन करणाऱ्या शेळ्यांसाठी आहे. या नियोजनाने आपणास एका वर्ष्याच्या आत 70ते 80 किलोचा बोकड बनवणे किंवा त्या पद्धतीच्या शेळ्या तयार करणे शक्य नाही. आपणास असे करावयाचे असल्यास आपण त्या क्षेत्रातील तज्ज्ञ शेळी पालकाचा सल्ला घ्यावा हे उत्तम.
१३) पैदासी करिता किंवा ईद करिता जे शेळीपालन करतात त्यांसाठी मी सांगितलेलं चारा व खुराक नियोजन अपुरं ठरेल.

लेखक- बाळू मोटे बारामती
9

१) आपण 10 - 12 लाखाची 4 चाकी गाडी घेतो तेंव्हा आपण तिच्यासाठी एक शेड बांधून गाडी त्या शेड मध्ये लावतो. गाडीने शेड ची मागणी केलेली नसते. गाडी शेड मध्ये लावल्याने तिचं आयुष्य वाढत, गाडी टापटीप राहते व मेंटेनन्स चा खर्च कमी येतो.
२) शेळ्यांसाठी गोठा नेमका अश्याच प्रकारचा उद्देश ठेऊन आपण बांधत असतो. जरी शेळ्यांनी आपणास गोठा बांधायला सांगितलं नाही तरी बंदिस्त शेळी पालनासाठी गोठा बांधणे हि जरुरी बाब आहे.
३) गोठ्यामुळे शेळ्यांपासून मिळणारे उत्पादन हे अप्रत्यक्ष रित्या वाढते असे समजायला हरकत नाही. म्हणूनच गोठ्यावर जास्त खर्च करू नये असे जेथे तेथे वाचावयास, ऐकावयास मिळते.
४) शेळ्यांसाठी चांगला गोठा असावा ज्या मध्ये मजूर खर्चात बचत होईल व शेळ्यांना तीनही मोसमात आरामदायक राहता येईल.
५) मी माझ्या गोठ्याची काही चित्रे सोबत दिली आहेत. गोठ्या बाबतीत माझी काही विशिष्ट व आग्रही मते आहेत. सुरवातीचे दीड वर्ष मी शेळ्या साध्या गोठ्यात व साध्या गव्हाणीत ठेवत व चारत होतो. तेथे ज्या अडचणी येत होत्या त्या मी आता पक्क्या गोठ्यात सोडवण्यात यशस्वी झालो आहे असं मला ठाम पणे सांगता येईल.
६) गोठा एक पाखी असावा. त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश आत मध्ये येतो. दोन पाखीत अडचण येते.
७) गोठ्याची लांबी दक्षिण उत्तर अशी असावी. त्यामुळे सुर्यप्रकाश गरजेपुरता आत येतो व दुपारच्या वेळेला सावली मिळते. गोठ्यात वारा वाहत ठेवता येतो व त्याचेवर नियंत्रण ठेवता येते.
८) गोठ्याला दक्षिण उत्तर व पश्चिम बाजूने भिंती घालून घ्याव्यात व त्यात 4 बाय3 चाय मोठा खिडक्या ठेवाव्यात. या खिडक्यावर पुढे टॉयलेट ला असतात तश्या उघडझाप करता येणाऱ्या व पाहिजे तेवढा वारा आत सोडता येणाऱ्या काचा बसवून घ्याव्यात. ९) गोठ्यात कोबा करू नये व मुरूम भरून 6 इंच उत्तर द्यावा.
१०) गोठ्यातील गव्हाण सलग असावी, तुकड्या तुकड्यात नसावी. मी कडप वापरून गव्हाणी तयार केल्या आहेत. या गव्हाणीत लेंड्या पडत नाहीत, मुतारी उडत नाही, गव्हाण 5 मिनिटात स्वच होते. पाणी साचून राहत नाही. भिंतीच्या बाहेरच्या बाजूने व गव्हाणीच्या खालून बोगदे ठेवलेत ज्यातून उष्ठा चारा दुसऱ्या दिवशी सहज बाहेर काढता येतो. सलग 76 फूट लांबीची व वरच्या बाजूला 2 फूट रुंदीची 1 फूट खोलीची हि गव्हाण असून ती बनवण्यासाठी लोखंडी ट्युब, कडप, सिमेंट पोल, मजुरी इ सर्व मिळून 22 हजार रु खर्च आला आहे.
११) गोठ्याचे काम अजून बाकी आहे. आत्तापर्यंत सुमारे 2 लाख रु गोठ्याला खर्च आला आहे. यात नुसत्या शेळ्या ठेवल्यास 50 बसतील तर करडे व शेळ्या ठेवायच्या असल्यास 30 बसतील. गोठा 60 फूट लांबीचा व 15 फूट रुंदीचा आहे.
१२) गोठ्यात हवा खेळती राहावी असं न म्हणता गोठ्यात हवा वाहती राहावी असं मी म्हणेन. हवेच वाहन आपणास नियंत्रित कराता यायला हवे म्हणजे उकाडा,धूळ, डास, माश्या इ वर नियंत्रण मिळवता येते.
१३) बारीक सारीक बाबींचा विचार करून हा गोठा मी बांधला आहे. काही समस्या पूर्णतः सोडवता आल्या आहेत तर काही बाबतीत मध्यम मार्ग काढला आहे.
१४) चारा टाकताना गव्हाणीतूनच चालत जायचं आहे त्यामुळे सावलीखालची जागा जी चालण्यासाठी आपण सोडतो ती येथे वाचवली आहे.





लेखक- बाळू मोटे बारामती. 
8

१) एखादा प्रकल्प सुरु केला कि त्यातील पहिली 2-3 वर्ष हि learning and capacity building ची असतात. या वर्षात जो डेटा तयार होतो किंवा जो आर्थिक हिशोब तयार होतो त्यात फार मोठे चढ उतार असण्याची शक्यता असते. म्हणून शेळी पालनामध्ये पहिल्या 2-3 वर्षाचा कोणताच डेटा प्रमाण मानू नये असे मला वाटते. एकदा का व्यवसाय सुरळीत सुरु झाला कि जो डेटा तयार होईल त्यातून जे निष्कर्ष निघतील ते प्रमाण मानायला हरकत नाही.
२) माझ्या मते बंदिस्त शेळी पालनामध्ये जर आपण स्थानिक बाजारात मटणासाठी बोकड शेळ्या विकणार असू तर 1:2 असे खर्च व उत्पन्नाचे गुणोत्तर आहे. याचा अर्थ असा कि आपण 1 रुपया शेळ्यांमध्ये गुंतवणूक केल्यास आपणास 2 रुपये उत्पन्न मिळते. म्हणजे या 2 रुपयात 1 रु मुद्दल व 1 रु नफा असतो.
३) जो 1 रु नफा आहे त्याचा ब्रेकअप (विभागणी) कसा असेल या बाबत माझ्या मनात मोठा प्रश्न आहे. या संदर्भात मी आत्तापर्यंत जे चिंतन केले त्यातून मी कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही. कदाचित अजून 2-3 वर्षानंतर याबाबत अकडेवारीनिशी काही सांगता येईल असे वाटते.
४) शेळ्यांपासून होणारी अर्थ प्राप्ती हि वास्तविक चारा व खुराक यांच्यापासून होणारी अर्थ प्राप्ती आहे. तसे पाहू गेल्यास चारा व खुराक थेट विक्री केल्यास व तोच शेळ्यांना खाऊ घालून त्याचे मांसात रूपांतर करून विक्री केल्यास दोहोंपैकी दुसऱ्या पर्यायातून जास्त अर्थप्राप्ती होते असे आपण मानतो.
५) हि जास्तीची अर्थ प्राप्ती नेमकी किती व तिचा त्या 1 रु वाटा किती हे समजणे मोठे कठीण वाटते. याची उकल करण्यासाठी बराचसा डेटा व आकडेमोड करण्याची आवश्यकता आहे.
६) आज रोजी मी माझ्या मनात काही ढोबळ आकडेवारी गृहीत धरली आहे. माझं आजचं या विषयीचे मत उद्या कदाचित बदलू शकतं. आकडेवारी पाहण्यापूर्वी काही बाबींचा येथे उलगडा करणे क्रमप्राप्त आहे.
७) या व्यवसायात चारा, खुराक, शेळ्या व त्यांचे आरोग्य व्यवस्थापन या गोष्टी प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी असतात, त्यांचे शिवाय मांस उत्पादन प्रक्रिया होणार नाही. तेंव्हा फक्त या बाबींवर होणारा खर्च हाच शेळी पालनातील खरा खर्च समजायला हवा. आपण जो गोठ्यावर, मजुरीवर व इतर भांडवली गुंतवणुकीत खर्च करतो तो उत्पादन खर्चात धरायला नाही पाहिजे.
८) अस मानल्यास माझ्या मते जो 1 रु नफा मिळतो त्यात पुढील प्रमाणे प्रत्येकाचा वाटा असेल-
:-चारा -- 50 पैसे
:- खुराक -- 25 पैसे
:- शेळ्या-- 25 पैसे.
९) भांडवली खर्चावर शेळी पालनात आपणास नफा मिळणार नाही. भांडवली खर्च उदा गोठा वगैरे हि शेळी पालकाची गरज आहे, शेळ्यांची नाही. शेळ्यांनी कधीच म्हटलं नाही कि त्यांना आलिशान गोठ्यात राहायचं आहे. आपण तो त्यांच्यासाठी बांधतो. शेळ्या फिरत्या पद्धतीनं जेवढं मांस उत्पादन देतात तेवढंच बंदिस्त पद्धतीत देतात. त्यामुळे आपण केलेल्या भांडवली खर्चाची जबाबदारी शेळ्यांवर टाकून चालणार नाही. तसंच शेळ्या राखण्यासाठी गडी (लेबर) ठेवा असं शेळ्या सांगत नाहीत, ते आपण त्यांचे साठी करतो ज्याचा उत्पादन प्रक्रियेत थेट संबंध नसतो.
१०) मुद्दा क्र ८ मध्ये सांगितल्या प्रमाणे आपणास शेळ्यांपासून 25 पैसे नफा मिळेल, चार्यापासून 50 पैसे तर खुरकपासून 25 पैसे मिळतील. या माहितीचा उपयोग कसा करायचा या वर वाचकांनी चिंतन मनन करावे, तसेच जाणकार शेळीपालकांनी मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
११) समजा आपण स्वतःच्या शेतात चारा पिकवतो त्याची किंमत 1 रु आहे. त्यावर आपणास 50 पैसे नफा मिळेल. म्हणजे खर्च उत्पन्न गुणोत्तर 1:1.50 असे येईल (चर्या पुरते). आता हा चारा आपण विकत घेऊन घालत असू व त्याची किंमत 1.25 असेल तर आपणास मिळणाऱ्या 50 पैसे नफ्यातुन 25 पैसे वजा होतील, तेंव्हा गुणोत्तर 1:1.25 असे येईल. जर चाऱ्याची किंमत 1.50 पैसे असेल तर आपणास चार्यापासून कोणताच नफा शिल्लक राहणार नाही व शेळी पालन व्यवसायाचे गुणोत्तर 1:1.50 असे येईल कारण चार्यावर अतिरिक्त केलेला 50 पैसे खर्च नफ्यातून वजा होईल. असेच खुराक व शेळ्या या बाबतीत म्हणता येईल.
१२) तेंव्हा नवीन व नवख्या शेळी पालकाने माझ्या मते स्वतःशी असे ठरवून घ्यावे कि मी अमुक अमुक किमतीपेक्षा जास्त किमतीचा चारा खाऊ घालणार नाही, अमुक तमुक किमतीचा खुरकच खाऊ घालीन व अमुक तमुक उत्पादन क्षमतेच्या व भांडवली गुंतवणूक कमी असणाऱ्या शेळ्यांच खरेदी करिन.

लेखक- बाळू मोटे बारामती
7

१) संकरीकरण (हैब्रिडायझेशन किंवा क्रॉस ब्रीडिंग) म्हणजे भरमसाठ उत्पादन वाढ असं आपण समजतो, किंवा तसं आपल्यावर बिंबवल जातं, किंवा आपण सगळीकडे अशी संकरित उत्पादनांची भरपूर उदाहरणे पाहतो.
२) उत्पादन वाढी साठी बंदिस्त शेळ्यांच्या बाबतीत बोअर, बिटल, सिरोही, कोटा वगैरे शेळ्यांशी संकर करण्याचा सल्ला हमखास दिला जातो. संकरीकरण केल्याने हायब्रीड व्हीगर तयार होते अस सांगितलं जातं.
३) तेंव्हा पुस्तके, प्रशिक्षणे, चर्चासत्रे वैगरे माध्यमातून संकरिकरणाचे फायदे व यशोगाथा पहावयास मिळतात.
४) संकरीकरण सगळीकडेच म्हणजे सर्वच वनस्पतीत व प्राण्यात तितकं यशस्वी होतं का किंवा तशी हायब्रीड व्हीगर मिळते का? असा प्रश्न आपल्या मनात कधी येत नाही. असं कोणी समजावत नाही किंवा त्यावर फारसं कोठे वाचावयास मिळत नाही.
५) या साठी सेल्फ स्टडी करावा लागेल तेंव्हाच संकरीकरनातलं इंगित समजेल. मी तसा तो केला आहे आणि या चॅनेल द्वारे वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा हा अभ्यास काही परिपूर्ण नाही परंतु, माझी विनंती अशी कि आपण या पुढचा अभ्यास स्वतः करावा. किंवा माझ्या म्हणण्यात काही त्रुटी असल्यास निदर्शनास आणून द्याव्यात.
६) संकरिकर्णकडे जाण्यापूर्वी काही उदाहरणे पाहू-
- खेचर (घोडा व गाढवाचा संकर)
- जिप (शेळी व मेंढीचा संकर)
- वणराजा, गिरीराज कोंबड्या (देशी व विदेशी कोंबड्यांच्या जातीचा संकर)
- टोमॅटोचे संकरित वाण ( झुडुपवर्गीय व वेलवर्गीय जातींचा संकर)
- संकरित hf गायी ( देशी गाई व विदेशी hf गाईचा संकर)
- मका पिकाचे संकरित वाण ( मक्याच्या निवड पद्धतीने तयार केलेल्या विविध वाणांचे व प्रकारांचे संकर)
- आंबा, पेरू, डाळिंब, सीताफळ इ संकरित वाण
- भेंडी, गवार, काकडी इ संकरित वाण
- सानेंन शेळी - उदाहरणे पुष्कळ आहेत, चर्चेसाठी एवढी पुरतील.
७) घोडा व गाढव या दोन स्वतंत्र प्रजातींचा संकर करून खेचर तयार झाले. खऱ्या अर्थाने हि हायब्रीड व्हीगर आहे कारण यात घोड्याच्या व गाढवाच्या गुणांचा सुयोग्य संगम आढळतो. जी कामे घोडा व गाढव करू शकत नाही ती कामे खेचर करते. मात्र खेचरला मूल बाळ होत नाही अशी माहिती नेट वर वाचायला मिळते.
८) जीप हा देखील खेचाराप्रमाणे शेळी व मेंढीचा अंतरप्रजातीय संकर आहे परंतु, ती यशस्वी होत नाही. थोडक्यात हायब्रीड व्हीगर सोडाच, तयार झालेली संकरित जात पुढे जगत नाही. अशी माहिती नेटवर आहे.
वरील दोन उदाहरणातून हे दिसून येते कि हायब्रीड व्हीगर सर्वच प्राण्यांच्या व वनस्पतींच्या दोन जातीच्या किंवा अंतरप्रजातीच्या संकरातून मिळतेच असे नाही.
९) वणराजा व गिरीराज या कोंबड्या विकसित करताना परदेशातील अपल्यापेक्ष कितीतरी जास्त अंडी व मांस उत्पादन देणाऱ्या कोंबड्यांच्या जातीशी संकर केलेला आहे. त्या परदेशातील जाती आपल्याकडे वाढवणे शक्य नसते कारण आपले हवामान त्यांना मानवत नाही, म्हणून आपण त्यांचे 50 टक्के रक्त असलेले संकर करून हायब्रीद व्हीगर मिळवतो, ज्यांचे उत्पादन स्थानिक कोंबड्यांपेक्षा कितीतरी जास्त मिळते.
बरोबर असंच संकरित hf गाईंच्या बाबतीत झाले आहे. मूळ hf गाय हि थंड हवामानात वाढणारी असून ती तिकडे प्रति दिन प्रति गाय 25 लिटर सरासरी दूध देते. मूळ hf गाय आपल्याकडे सांभाळणे शक्य नाही, आपले हवामान तिला अजिबात मानवणार नाही. तसेच देशी गायीचे व hf गाईचे कुळ वेगवेगळे असल्याने आपल्याकडील संकरित hf गाई ह्या अंतरप्रजातीय संकर होत. मूळ hf गाईचे 50 टक्के रक्त संकरित hf गायी मध्ये येत असल्याने आपणास हायब्रीड व्हीगर मिळते व दूध उत्पादनात देशी गाईनपेक्षा सरासरी 4 ते 6 लिटर ची वाढ मिळते.
१०) टोमॅटोचे वेगवेगळे 5 प्रकार आहेत. त्यांचं वर्गीकरण मुख्यतः दोन प्रकारात करतात. एक म्हणजे झुडुपवर्गीय (determinate) आणि दुसरं वेलवर्गीय ( indeterminate). येथे ज्या हवामानात झुडुपवर्गीय येते त्याच हवामानात वेलवर्गीय देखील येते. या उदाहरणात आपणास हायब्रीड व्हीगर चा अर्थ लक्षात येईल, त्यासाठी हे उदाहरण सांख्यिकीय पद्धतीने पाहू-
- समजा वेलवर्गीय टोमॅटोच्या झाडाला 200 फळे प्रत्येकी 40ग्राम ची लागतात. तेंव्हा एकूण उत्पादन 8000ग्राम मिळते.
- झुडुपवर्गीय टोमॅटोला 50 फळ प्रत्येकी 150ग्राम वाजनाची लागतात. तेंव्हा एकूण उत्पादन 7500ग्राम उत्पादन मिळते.
- झुडुपवर्गीय व वेल वर्गीय जातींचा जेंव्हा संकर केला जातो (semi indeterminate) तेंव्हा संकरित जाती (f1 हायब्रीड) मध्ये दोघांच्या अनुवांशिक गुणधर्माची सरासरी येते.
- येथे फळाच्या संख्येची सरासरी येईल २००+50/2= 125 फळ.
- फळाच्या वजनाची सरासरी येईल ४०+१५०/२=९५ ग्राम.
- या हिशोबाने तयार होणाऱ्या f1 संकरित जातीचे उत्पादन  125x95 बरोबर 11875 ग्राम येईल.
- याला म्हणतात हायब्रीड व्हीगर कारण यात दोन्ही माता पित्याच्या उत्पादनपेक्षा कितीतरी जास्त उत्पादन मिळालं.
- पूर्वी टोमॅटो चे उत्पादन एकरी 4 ते 8 टन मिळायचे आता ते एकरी 40,60 अगदी 90 टनापर्यंत मिळते ते केवळ
हायब्रीड व्हीगर (संकरित जोम) मुळे.
११) अफघाणीस्थानी घोडे (पूर्वी युद्धात वापरायचे आता लग्नात नावरदेवसाठी वापरतात ते) व मेंडपालांकडे बिर्हाड वाहण्यासाठी असणारे घोडे हे असेच टोमॅटो सारखे एकाच जातीचे दोन प्रकार आहेत. या दोघांचा संकर करून हायब्रीड व्हीगर असलेली नवीन जात निर्माण केल्याच वाचनात, ऐकण्यात नाही, किंबहुना ते शक्य नसावं.
१२) मका पिकामध्ये देखील टोमॅटो सारखे 3 प्रकार माझ्या माहिती प्रमाणे आहेत. त्यातले दोन म्हणजे पिवळी व पांढरी मका. मुळात मका पिकात इतर कोणत्याही पिकात झाले नसेल एवढे संशोधन झाले आहे. मका पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन देणारे सरळ वाण निवड पद्धतीने तयार करून त्यांचे पुन्हा संकरीकरण करून हायब्रीड व्हीगर मिळवतात. बऱ्याच वेळा दोन संकरित वाणांचा पुन्हा संकर करून डबल हायब्रीड मिळवतात. यांचं उत्पादन सरळ वानांपेक्षा कितीतरी पटीने जास्त मिळतं.
१३) आता संकरीकरण करून हायब्रीड व्हीगर कोठे मिळाली नाही ते पाहायला हवं. हापूस, केशर या आंब्याच्या निवड पद्धतीने तयार केलेल्या जाती आहेत तर नीलम, रत्ना या संकरित जाती आहेत. या दोन्ही संकरित जाती फार प्रसिद्ध झाल्या नाहीत कारण संकरीकरण करून त्यात उत्पादन वाढलं नाही किंवा चवही वाढली नाही. सरदार हि पेरूची निवड पद्धतीनं तयार केलेली जात आहे तर तिचाच वापर करून संकरित पेरूची ललित हि गरास गुलाबी रंग असलेली जात निर्माण केली आहे. ललित चे उत्पादन सरदार पेक्षा जास्त नाही. डाळिंबामध्ये आरक्ता व मृदुला या संकरित जाती आहेत, पण उत्पादनात विशेष वाढ नाही.
१४) टोमॅटो सोडून इतर भाजीपाल्यात संकरिकरणातून उत्पादानत भारीव वाढ झाली अशी उदाहरणने फारच कमी आहेत. उदा कांदा लसूण, गवार भेंडी, वेलवर्गीय भाजीपाला इ मध्ये संकरित जातींचे उत्पादन जेमतेम आहे.
१५) डाळ वर्गीय व तेलवर्गीय पिकात संकरिकरणातून उत्पादन वृद्धी होईल अश्या संकरित जाती का निर्माण झाल्या नाहीत. कारण भारत या पिकांचा मोठा आयातदार देश आहे. या पिकांत हायब्रीड व्हीगर मिळत नसावी.
१६) सानेंन शेळी व फुले त्रिवेणी गाय यांचा विचार करू. सानेंन हि दूध उत्पादन वाढीसाठी संकरित शेळी ची जात विकसित केली आहे. आता ती संकरित नसून स्वतंत्र जात आहे. फुले त्रिवेणी गाई मध्ये गीर 25 टक्के hf 50 टक्के व जर्सी 25 टक्के असा रक्ताचा संगम किंवा अनुवांशिक गुणधर्माचा संगम आहे. ती आता एक स्वतंत्र गायींची जात आहे.
१७) माझ्या माहितीत असं एकही उदाहरण नाही कि दोन भारतीय देशी गाईंचा संकर करून जास्त दूध उत्पादन देणारी हायब्रीड व्हीगर गाय तयार केली आहे. कारण दोन देशी गाईच्या संकरातून हायब्रीड व्हीगर मिळणे सध्या तरी शक्य नाही. दोन देशी जातीच्या कोंबड्यांच्या संकर करून त्यांच्या पेक्षा जास्त उत्पादन देणारी संकरित जात विकसित केली आहे काय? जाफराबादी व किंवा मुऱ्हा म्हशींचा पंढरपुरी म्हशी सोबत संकर करून त्यांचे पेक्षा जास्त उत्पादन देणारी म्हशीची जात विकसित केली आहे काय?
१८) शेळ्यांमध्ये दोन देशी जातीचा संकर करून हायब्रीड व्हीगर मिळवता येणार नाही हे एव्हाना स्पस्ट झाले असावे. थंड प्रदेशातील शेळीच्या जातीचा उष्ण प्रदेशातील जातींशी केलेला संकर यशस्वी होत नाही हे नेट वर वाचावयास मिळते. परदेशातील जास्त मांस व दूध उत्पादन देणाऱ्या शेळ्यांच्या जातींशी भारतीय शेळ्यांच संकर केला असता जे गुणधर्म संकरित जातीत येतात ते एकतर कायमस्वरूपी टिकत नाहीत किंवा त्यांच्यात सत्यतता नसते.
१९) आता प्रश्न आहे तो बोअर जातीच्या शेळीच्या संकराबाबतचा. बोअर या शेळीचा इतिहास पहिला तर ती मुळातच वेगवेगळ्या शेळ्यांच्या जातीपासून तयार झालेली एक संकरित जात आहे. आता ती स्वतंत्र जात जरी असली तरी. बोअर शेळी मध्ये आणि भारतीय उत्पादनामध्य किंवा त्यांच्या अनुवांशिक गुणधर्मामधे फार मोठा फरक नाही. जर तो तसा असता तर आपणास ती पासून नक्कीच हायब्रीड व्हीगर मिळाली असती. उदा. बोअर चे जुळे देण्याचे प्रमाण भारतीय शेळ्यांपेक्षा फार जास्त नाही, बोअर चे आकारमान देशी शेळ्यांपेक्षा फार जास्त नाही. बोअर चा संकर करून मांस उत्पादन माता पित्याच्या सरासरी इतके जरूर वाढेल पण ते केंव्हाही बोअर बोअर पेक्षा जास्त वाढणार नाही. म्हणजेच हायब्रीड व्हीगर मिळणार नाही.
२०) तेंव्हा मला असं वाटतं कि शेळ्यांमध्ये संकरीकरण करण्यापेक्षा निवड पद्धतीचा अवलंब करावा. तोच एकमेव उत्पादन वाढीचा मार्ग आहे. या चॅनेल वर सुरवातीपासून हेच सांगत आलो आहे.
चॅनेल वरील लोकांना हि माहिती वाचावयास मिळाली परंतु जे अशिक्षित शेळी पालक आहेत ज्यांच्या मनात बोअर व इतर शेळ्यांच संकर करण्याचा विचार आहे अश्या लोकांपर्यंत हि माहिती पोचविण्याचे जबाबदारी या चॅनेल वरील वाचकांची आहे अस मी समजतो व माझी अपना सर्वाना तशी विनंती आहे. अश्या लोकनसाठी समाजसेवेच्या भूमिकेतून आपण सर्वांनी हे करावं कारण-
" चांद भी है, सुरज भी
मगर आप रास्ते का दिया बन जाईये।"

लेखक- बाळू मोटे बारामती. ९४२२५१२६८०

Friday, March 1, 2019


6


१) आमच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय मेंढी व शेळी पालन हा आहे. माझ्या बहुतांश नातेवाईकांचा देखील मुख्य व्यवसाय हाच आहे. त्यातील काही लोकांनी मागील 10 वर्षात शेळ्या मेंढ्या विकून थोडीफार शेती खरेदी केली किंवा कर्ज काढून डोझर असलेले मोठे ट्रॅक्टर खरेदी करून कोकणात व्यवसायासाठी गेले. काही वर्षांपूर्वी या ट्रॅक्टर च्या व्यवसायात चांगले पैसे मिळत होते परंतु आता मात्र ट्रेकटर विकून मेंढर खरेदी करण्याचं प्रमाण लक्षणीय वाढलेलं आहे.
२) माझे नातेवाईक व सामाजातील बरीच लोकं माझा बंदिस्त शेळी पालन प्रकल्प पाहायला येतात व मला काही मोलाचे सल्ले देतात. आपण अडाणी समजतो अश्या लोकांनी मला सुरवातीला सांगितलं होत कि ' पहिले दीड -दोन वर्ष तुला अवघड जातील, एकदा का शेळ्यांनी रान घेतलं कि मग तू सुटलास'. जे जे अशिक्षित होते त्यांनी मला बंदिस्त शेळी पालन करण्यास विरोध केला नाही, परंतु जे शिकलेले आहेत व कोठे तरी नोकरी करतात अश्या बहुतांश जणांनी हा व्यवसाय बंद करून कोठेतरी नोकरी करण्याचा सल्ला दिला.
३) धनगर मेंडपाळांचे काही अनुभव मी येथे देत आहे-
:- 12 महिने फिरत्या मेंढ्या जर आपण घरी मूळ गावी ठेवल्या व मोकाट पद्धतीने जरी चारल्या तरी त्यांच्या 1 ते 2 वितात उत्पादनात घट येते.
:- फिरत्या मेंढ्याना व शेळ्यांना दररोज वेगवेगळ्या शेतात रात्री बसण्याची सवय असते. पावसाळ्यात अश्या शेतात मेंढरे बसवण्यास मर्यादा येतात, तेंव्हा अश्या वेळेस उंच ठिकाणी कायमचा 1 ते 4 महिण्याकरिता तळ ठोकतात, त्यास आम्ही मरड असे म्हणतो. जेंव्हा शेळ्या व मेंढ्या मरडीवर बसवतात त्या कालावधीत त्या खराब होतात व उत्पदनात थोडी घट येते.
:- फिरत्या मेंढ्याना काही गावातील चारा मानवतो तर काही गावातील मानवत नाही. ज्या गावातला चारा मानवत नाही
त्यास आम्ही 'बसक चांगली नाही' असे म्हणतो. ज्या गावाची बसक चांगली नाही त्या गावास गेल्यास दरवर्षी मेंढ्या खराब होतात असा अनुभव येतो. उलटपक्षी त्याच गावातील स्थायिक मेंढ्या व शेळ्या मात्र तब्यतीने चांगल्या दिसून येतात. याचाच अर्थ असा, कि ती बसक स्थानिक शेळ्या मेंढ्याना मानवत असते.
:- काही गावाचं वैशिष्ट्य असं आहे कि त्या गावात व परिसरात मेंढर गेली कि त्यांना विशिष्ट आजार उदा. माळीण होतो. माळीण महणजे नाकातून रक्त किंवा रक्त मिश्रित शेम्बुड येणे. परंतु स्थानिक जनावरांना हा त्रास होतोच असे नाही.
:- आमची मेंढरे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही भागात वर्षभर फिरत असतात, त्यामुळे वेगवेगळ्या गावातील, परिसरातील वेगवेगळा अनुभव येत असतो.
४) अश्या प्रकारे स्थानिक शेळ्या व मेंढ्या विविध वातावरणास व वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीस वेगवेगळा प्रतिसाद देतात.
५) व्हाट्स ऍप सारख्या माध्यमातून बंदिस्त शेळी पालनासाठी सिरोही, बिटल, सोजत, बार्बेरि वगैरे जातींची शिफारस व जाहिरात केली जाते. त्यात प्रामुख्याने असा दावा असतो कि उदा राजस्थानातील सिरोही हि शेळी तेथून आणून महाराष्ट्रातील वातावरणात एक महिना ठेऊन सेट केली जाते व आपल्याला विक्रीस उपलब्ध असते. 
असं कोणतं तंत्रज्ञान आहे कि ज्याचा वापर करताच कित्येक मैल अंतरावरील, विषम भौगोलिक व वातावरणातील सिरोही शेळी आपल्याकडे एका महिन्यात तीनही मोसमाकरिता सेट होते.
६) माझ्या मेंढरांतील माझ्या माहितीतल्या शेळ्या बंदिस्त केलंयानंतर सेट व्हायला मला किमान दीड वर्ष लागले. 
७) सिरोही शेळी किंवा इतर तत्सम देशी व विदेशी शेळ्या महाराष्ट्राच्या वातावरणात एका महिन्यात सेट होत असेल तर ते आक्रीतच म्हणावं लागेल. कोणी या विषयाचं प्रशिक्षण देत असेल तर कृपाय कळवावे.
८) शेळी हा समूह प्रिय प्राणी आहे, आणि त्याबाबतीत तो खूप संवेदनशील आहे. म्हणजे असं कि तुमचा समजा 20 शेळ्यांच बंदिस्त फार्म आहे आणि त्यात तुम्ही त्याच जातीची दुसऱ्या कळपातील शेळी आणून ठेवली तर तिला कित्येक महिने करमत नाही. तिची तब्येत सुधारत नाही. 
शेळी हा प्राणी समूहाप्रिय असून समूहात भांडणं करायला तिला आवडतं. त्या शक्यतो स्वतःच्या रक्ताच्या नात्यातील शेळ्यांसोबत राहायला, खेळायला, चरायला पसंत करतात.
९) असं असताना वेगवेगळ्या ठिकाणच्या शेळ्या गोळा करून त्या आपल्याला महागड्या किमतीने दिल्या जातात, आणि आपणही त्या घेतो. त्यांनी एकत्र कसं राहावं, कसं खावं, प्यावं, खेळावं.
एका महिन्यात कसं सेट व्हावं...!

balu mote

5


१) स्मॉल रूमीनंट म्हणजे शेळी मेंढी इ सारखे प्राणी जे रवंथ करतात. यांची पचनसंस्था कशी काम करते हे समजून घेणे खरोखरच हितावह आहे. 4 कप्या पैकी पहिला कप्पा म्हणजे रुमेन. यात असंख्य बॅक्टेरिया, प्रोटोझोवा व फंगस असतात. तुलनेने बॅक्टेरियांची म्हणजे जिवाणूंची संख्या जास्त असते. जिवाणू द्वारे अन्नाचे पचन येथे चालू असते.
२) येथील जिवाणू व काही अन्नाचा भाग पुढच्या कप्प्यात जाऊन वेगवेगळ्या विकाराद्वारे पचवले जातात. याचा अर्थ असा कि रवंथ करणारे प्राणी स्वतःच्या पोटात वाढवलेले जिवाणू खातात, म्हणजेच हे प्राणी मांसाहारी आहेत..!
३) शेळीच्या शरीर वाढीसाठी वनस्पती जन्य प्रथिनांची आवश्यकता असते, ते आपण द्विदल वर्गीय चारा, मका, गहू व खुरकातून देतो. या सर्व वनस्पती जन्य प्रथिनांचं जीवनुमार्फत विघटन केलं जातं व पुढे ते पचवलं जातं.
४) प्रथिनांमध्ये एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे नायट्रोजेन N. हा नायट्रोजेन युरिया मधून शेळीला पुरवता येतो तेंव्हा त्याला नॉन प्रोटीन नायट्रोजेन NPN असे म्हणतात.
५) निकृष्ट दर्जाच्या चार्यामध्ये उदा गव्हाचे काड, सरमड, भाताचा पेंढा वगैरे. या मध्ये वनस्पती जन्य प्रथिने फार कमी असतात. त्यात नायट्रोजेन चे प्रमाण कार्बनच्या तुलनेत फारच कमी असते. परिणामी जीवणूद्वारे असे पदार्थ पचावण्यास उशीर लागतो. किंवा ते पचत नाहीत. परंतु अश्या पदार्थांची ऊर्जा पुरवण्याची क्षमता जास्त असते, परंतु प्रथिनांच्या अभावी त्याचा उपयोग होण्यात अडचणी येतात. शास्त्रीय भाषेत सांगायचं झाल्यास गव्हाचे काड व उसाचे पाचट यांचा कर्ब:नत्र गुणोत्तर 110:1 च्या आसपास आहे. याचा अर्थ असा कि कार्बनचे 110 अनु तेंव्हा नायट्रोजन चा 1 अनु. कर्ब:नत्र गुणोत्तर जर 10:1 असे असेल तर असे पदार्थ जिवाणू मार्फत लवकर कुजवले किंवा पचवले जाऊ शकतात.
६) गव्हाच्या काडावर युरियाची प्रक्रिया करून त्यातील नत्राचे प्रमाण कृत्रिम रित्या वाढविता येते परिणामी असा निकृष्ट चारा लवकर पचतो व त्यातील व जीवणूद्वारे प्रथिनांची निर्मिती होते.
७) युरियाची प्रक्रिया केलेला चारा शेळीनं खल्यांनातर तिच्या पोटातील जिवाणू युरियातील नत्राचा उपयोग स्वतःच्या शरीरासाठी आवश्यक प्रथिने निर्मितीसाठी करतात. जसं मातीमध्ये आजटोबॅक्टर, रायझोबियम हवेतील नत्र व जमिनीतील सेंद्रिय पदार्थ घेऊन, ते मेल्यानंतर जमिनीत नत्र स्थिरीकरण करतात तसे पोटातील जिवाणू युरियातील नायट्रोजन चा उपयोग प्रथिने निर्मितीसाठी करतात. असे जिवाणू पुढच्या आतड्यात जाऊन पचवले जातात. अश्या तर्हेने शेळीला NPN द्वारे प्रथिने मिळतात व निकृष्ट चारा देऊनही शेळ्यांची तब्येत चांगली राहते.
८) गेल्या वर्षी चारा टंचाईमुळे मी करडांसाठी युरिया वापरायचे ठरवले. परंतु चार्यावर प्रक्रिया न करता सोप्यात सोपी पद्धत वापरायचे ठरविले. या साठी मी पिण्याच्या पाण्यात युरिया विरघळवून ते पाणी पिण्यास ठेवले.
९) ८ कर्डांचा विचार करून द्रावण तयार केले होते परंतु 8 पैकी फक्त 3 कर्डानीच ते पाणी पिले.
१०) परिणामी त्यांना युरियाची विषबाधा होऊन ती तीनही करडे अर्ध्या तासाच्या आत मृत्युमुखी पडली.
११) आता या सर्व प्रकारास तुम्ही मला वेडे ठरवाल, पण माझ्याकडून ती चूक झाली हे खरेच. माझं एवढंच सांगण आहे कि माझ्यासारखा अघोरी प्रयोग कोणी करू नये.
१२) युरियाचं पाणी पिल्यानंतर 5-10 मिनिटात करडांचे अंग थरथर कापायला लागले, त्यांना उठता येईना, बसता येईना, श्वास घेता येईना. थोड्या वेळाने तोंडाला फेस सुटला. सुमारे अर्ध्या तासात उपचार चालू असताना तीनही करडे मरून पडली. माझ्या डोळ्यादेखत मेली. जनावरांचे डाक्टर देखील होते. पोट फुगले होते, बहुदा गॅस तयार झाला असावा.
१३) युरिया पाण्यात टाकल्यानंतर किंवा जनावराने युरिया खाल्ल्यानंतर तो पोटातील पाण्यात मिसळतो व त्यातून अमोनिया गॅस तयार होतो. या प्रक्रियेस युरियाचं हैड्रोलिसिस असे म्हणतात. हा अमोनिया गॅस अतड्याद्वारे रक्तात शोषला जातो. इथेच तर खरी अडचण असते. एकदा रक्तात अमोनिया गेला कि विषबाधा होते.
१४) किती प्रमाणात विषबाधा झाली या वर पुढचा सर्व खेळ अवलंबून असतो. पण जनावर वाचण्याची शक्यता फार कमी असते.
१५) पोटातील अमोनियला थांबवण्यासाठी असेटिक ऍसिड किंवा त्याला व्हिनेगर म्हणतात ते पाजयचे असते. पण आपल्या गावात ते मिळत नाही. दुसरा उपाय म्हणजे सलाईन लावायची व रक्त डायलूट करायचं. इतर विषबाधेवर चालणारं ऍट्रोपीन सल्फेट इथे उपयोगाला येत नाही.
१६) असो. माझं किमान 12 हजाराचे नुकसान झाले. प्रयोग खूपच महागात पडला.

Balu Mote, Baramati.
4

१) चारा आणि खुराक यांचं नियोजन अतिशय महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा पोटभर चारा देऊन, खुराक देऊन देखील शेळ्यांची वजने वाढत नाहीत अशी तक्रार असते. माझ्या 2 वर्षाच्या अनुभवाच्या कालावधीत मला हि समस्या प्रकर्षाने जाणवली. त्यासंबंधी मी माझे चिंतन येथे मांडणार आहे. मी कोणताही निष्कर्ष येथे मांडणार नाही, किंबहुना हे विचार वाचकांनी लक्षात घ्यावेत व पुढील प्रयोग करून योग्य ते निःकर्ष काढावेत हि विनंती
२) प्रशिक्षणे, चर्चा सत्रे, पुस्तके या मध्ये शेळी च्या वजनाच्या 2 टक्के एवढा DM म्हणजे dry matter म्हणजेच शुष्क भाग देण्यास सांगितले जाते. जर या प्रमाणे 4 किलो ओला चारा व 1 किलो सुका चारा दिला तर हि 2 टक्के DM ची गरज पूर्ण होऊ शकते.
३) शेळीच्या वजन वाढीसाठी वेगवेगळ्या अन्नघटकांची वेगवेगळ्या प्रमाणात गरज असते. आपण येथे फक्त प्रथिने म्हणजेच प्रोटीन याचाच फक्त विचार करणार आहोत.
४) सोबतच्या चित्रात शेळीच्या वेगवेगळ्या अवस्थेत किती DM लागतो व त्यावर आधारित किती क्रूड प्रोटीन CP लागतो हे दिसते. हि माहिती बाहेरील देशातील असून आपल्याकडील शेळ्यांना जशीच्या तशी लागू होईल असे नाही. उदाहरण दाखल येथे घेतली आहे. या माहितीत DM ची व CP ची रेंज दाखवली आहे, त्याचे खालील 2 अर्थ निघू शकतात-
– त्या देशातील शेळीच्या वेगवेगळ्या जातींसाठी ती रेंज असू शकते.
– किंवा एकाच शेळीच्या जातीसाठी कमीत कमी व जास्तीत जास्त अशी रेंज असू शकते.
आपण येथे दुसरा मुद्दा विचारात घेणार आहोत, म्हणजेच दिलेली रेंज हि एकाच जातीच्या शेळी साठी कमीत कमी व जास्तीत जास्त असे मानू.
५) आजचे विवेचन हे पुढील वाक्य केंद्रीभूत ठेवून करणार आहे-
' शरीर वाढी साठी जे अन्नघटक जितक्या कमी प्रमाणात लागतात तितकेच ते त्यांच्या थोड्याश्या कमी जास्त प्रमाणामुळे शरीर वाढीवर विपरीत परिणाम करू शकतात'.
६) वरील स्टेटमेंट समजून घेण्याकरिता आपण एक हायपोथेटिकल उदाहरण पाहू-
समज एक व्यक्ती 3 चपात्या व वाटीभर भाजी असे 250 ग्राम चे जेवण जेवते. या 250 ग्राम जेवणात 1 ग्राम मीठ आहे. जेंव्हा 250 ग्राम जेवनामध्यए 1 ग्राम मीठ असते तेंव्हा जेवण चविष्ट असल्याने ती व्यक्ती ते जेवण आवडीने खाते. आता 1 ग्राम मिठाएवजी 0.750 ग्राम मीठ टाकू तेंव्हा तेच जेवण त्याच व्यक्तीला किंचित अळणी लागेल परंतु तो ते पूर्ण खाऊन टाकेल. हि झाली सहनशक्ती. आता त्याच जेवणात 0.500 ग्राम एवढेच मीठ टाकू. आता त्या व्यक्तीला तेच जेवण अळणी व बेचव लागेल म्हणून तो 3 चपात्यापैकी 2 नच खाईल. हि झाली कमतरता. आता आपण त्या जेवणात 0.250 ग्राम मीठ टाकू, या वेळेला ती व्यक्ती फक्त 1च चपाती खाऊ शकतो.
आपणास या उदाहरणात काय दिसते. 250 ग्राम जेवणात अतिशय कमी प्रामनात लागणाऱ्या मिठाच्या मात्रेत थोडा जरी बदल केला तरी त्याचे परिणाम मोठे दिसतात. आता हेच उदाहरण आपणास शेळी ला लागणाऱ्या प्रथिनांचा मात्रेबाबत अकडेवारींनीशी तपासून पाहायचे आहे.
७) सोबतच्या चित्रात विलेल्या व दूध देणाऱ्या (lactation) शेळीला तिच्या वजनाच्या 2.8 ते 4.6 टक्के एवढा DM तर त्या DM च्या 12 ते 17 टक्के CP लागेल असे मांडले आहे. यात 2.8 हि कमीत कमी तर 4.6 हि जास्तीत जास्त पातळी तसेच 12 व 17 हि कमीत कमी व जास्तीत जास्त पातळी अनुक्रमे DM व CP यांचे बाबतीत आहे असे मानू.
८) एक 40 किलो वजनाच्या शेळीला वरील आकडेवारी नुसार किती DM व CP लागेल ते काढू.
- (40X2.8)/100= 1.12 kg DM लागेल य DM मध्ये पुढील प्रमाणे CP असायला हवा
:(1.12X12)/100= 0.1344 kg CP. येथे 1.12 व 0.1344 हि DM ची व CP ची कमीत कमी गरज आहे हे लक्षात घावे.
-(40X4.6)/100= 1.84kg DM लागेल यात
:(1.84X17)/100=0.3128 kg CP असायला हवा. येथे 1.84 व 0.3128 हि अनुक्रमे DM व CP ची जास्तीत जास्त गरज आहे हे लक्षात घ्यावे.
९) वरील प्रमाणे शेळीच्या चांगल्या पोषणासाठी तिला जास्तीत जास्त 0.3128 kg प्रथिने (CP) किंवा व्यवस्थित वाढीसाठी किमान 0.1344kg प्रथिनांची आवश्यकता आहे. या पेक्षा कमी प्रथिने म्हणजेच CP मिळाले तर शेळीच्या उत्पादनावर व वजन वाढीवर परिणाम होईल. येथे आपण कमीत कमी पातळी विचारात घेऊ.
१०) आपण शेळीला फक्त ओला हिरवा मका व खुराक देत आहोत असे गृहीत धरू. मका चर्या बाबत खालील विधाने गृहीत धरू. (संदर्भासाठी मेज एक्सपर्ट सिस्टीम नावाच्या वेबसाईटवरुन हि माहिती घेतली आहे)
-मका दाण्यात 12 टक्के प्रोटीन असतात
- बी पेरल्यानंतर त्याला कणसे लागेपर्यंत 7 ते 10 टक्के प्रोटीन असते. व 85 ते 90 टक्के पाणी असते.
- चिकातील मका चाऱ्यात पुन्हा 12 टक्के प्रोटीन व 80 टक्के पाणी असते
- बी पक्व झाल्यावर प्रोटीन 12 टक्क्यांवरून कमी कमी होत जाऊन 8 टक्के पर्यंत खाली येते. पाणी 75 ते 70 टक्के एवढे असते.
-अश्या वेळेला मात्र फक्त दाणे काढून प्रोटीन काढल्यास ते 10 ते 12 टक्के भरते.

खुराक म्हणून आपण गोळी पेंड देणार आहोत ज्या मध्ये 22 टक्के प्रोटीन आहे.
११) 40 किलो वजनाच्या शेळीला 1.12 कलो DM लागतो हे आपण पहिले. तेवढा Dm देण्यासाठी किती मका व खुराक द्यावा लागेल व त्यात किती प्रोटीन मिळेल ते काढू. 
- 5 किलो चिकातील मका चाऱ्यात
(5x80)/100=4, 5-4=1kg. म्हणजेच 5किलो हिरवा चिकातील चाऱ्यात 1 किलो DM आहे.
- (1x12)/100= 0.12 kg CP मिळेल
- 0.150 kg गोळी पेंड दिल्यास
(0.150x10)/100=0.015, 0.150-0.015=0.135 kg DM मिळेल.(10% ओलावा)
- (0.135x22)/100= 0.0297 kg CP मिळेल
आता आपण वरील दोघांची DM व CP ची बेरीज करू-
DM=1+0.135=1.135kg
CP=0.12+0.0297=0.1497kg
40 केली वजनाच्या शेळीला जेवढा DM व CP लागतो त्यापेक्षा थोडा जास्त वरील आहारातून दिला जात आहे हे येथे लक्षात घ्यावे.
१२) दर वेळेला आपणास चिकात आलेली मकेचा हिरवा चारा म्हणून देणं शक्य होत नाही. बऱ्याच वेळेला आपण कणसे लागण्या अगोदर किंवा पक्व मका चारा म्हणून खाऊ घालतो. आता जर कणसे लागण्या अगोदर मका खाऊ घातल्यास म्हणजेच 85 टक्के पाणी व 9 टक्के CP असताना 5 किलो खाऊ घातल्यास त्याच शेळीला किती DM व CP मिळेल ते पाहू. येथे आपण खुरकामध्ये कोणताही बदल करणार नाही आहोत-
-(5X85)/100= 4.25, 5-4.25= 0.75 kg DM.
- (0.75x9)/100=0.0675 kg CP
आता
एकूण DM= 0.75+0.135=0.885 kg व
CP= 0.0675+0.0297= 0.0972
म्हणजेच जर आपण चार्यातील केवळ 5 टक्के पाण्याचं प्रमाण वाढवलं व प्रोटीन केवळ 3 टक्केनी कमी केलं तर त्या शेळीला
DM-0.235 kg व CP- 0.0372 kg एवढ तिला लागणाऱ्या DM च्या व CP च्या कामीत कमी पातळी पेक्षा कमी मिळेल.
१३) एकूणच शेळीच्या आहारातील अन्नघटक मोजून शेळीला खाद्य पुरवठा करणे सध्या तरी आपल्याकडे शक्य नाही. मग अश्या परिस्थितीत शेळीचे चांगले पोषण होईल असा आहार देण्याची कोणती सोपी पद्धत आहे?
१४) हे विश्लेषण पूर्णपणे थेरोटीकल आहे. हेच प्रॅक्टीकॅली करता येऊ शकणार नाही. केवळ मका चारा म्हणून घेतला आहे तो केवळ गणितातील किचकट पणा टाळण्यासाठी. वास्तविक संतुलित आहार देऊन सुद्धा असे गणित मांडता येईल.






3


१) व्यवसायात तोटा होण्याची अनेक करणे आहेत. त्यापैकी करडांचे मरतुक हे प्रमुख कारण आहे.
२) दोन वर्षात 3 विते न मिळणे हे दुसरे प्रमुख कारण आहे
३) शेळ्यांची व करडांची वजन वाढ व्यवस्थित न होणे हे आणखी एक महत्वाचे कारण आहे. गेली 2 वर्षे दुष्काळ असल्याने व चांगल्या चाऱ्याची उपलब्धता व कमी खुराक या कारणाने वजन वाढ हवी तशी मिळाली नाही. माझा नाविलाज होता.
४) 2 वर्षातील एकूण 41 विते मिळाली. त्यापैकी
- जुळे करडे 42
- एक करडू 18
- तिळे करडे 9
एकूण करडे- 69
पहिल्या तीन महिन्यात झालेली एकूण मरतुक-28
एकूण विक्री योग्य करडे 41
५) 2 वर्षात
- 4 वेळा विलेल्या शेळ्या- 1
- 3 वेळा विलेल्या शेळ्या-2
- 2 वेळा विलेल्या शेळ्या- 13
- 1 वेळ विलेल्या शेळ्या-5
- 0 वेळा विलेल्या शेळ्या-3
६) व्यावस्थापणातील त्रुटी तर कारणीभूत आहेतच परंतु फिरत्या शेळ्या एकदम बंदिस्त केल्यामुळे त्यांच्यावर जो ताण आला त्यामुळे करडांची मरतुक झाली तसेच 2 वर्षात 3 वेत मिळाले नाहीत अस म्हणायला मोठा वाव आहे.


Balu Mote, Baramati. 9422512680


2


१) 13 जून 15 रोजी मी आमच्या मेंढरातून 22 शेळ्या 3 पाठी अकोले तालुक्यातील पाडाळने या गावातून बारामती येथे आणल्या. यात एक बोकड होता.
२) 2015 साली अंदाजे साधारण 350- 400 mm एवढा पाऊस तर 2016 मी मॅन्युअल रेन गेज शेतावर बसवले व या वर्षी पाऊस 520 mm झाला. यातील एफ्फेक्टिव्ह रेनफॉल जर काढला तर हि दोन्ही वर्ष स्थानिक लोकेशनला भयंकर दुष्काळाची गेली.
३) 22 शेळ्यांपैकी 8 शेळ्या विकल्या, 3 शेळ्या एक बोकड व 3 मोठी करडे वेगवेगळ्या कारणाने मेली, जी सर्व विक्रीयोग्य होती.
४) सध्या 2 बोकड व 18 शेळ्या आहेत. तसेच 13 मोठी विक्री योग्य करडे आहेत.
५) 2 वर्षातील खर्च खालील प्रमाणे
- स्वतःच्या शेतातील चारा रु 56690.
- विकतचा चारा रु 30890.
- खुराक रु 42090.
- औषधे रु 17772.
-मजुरी 150X730 दिवस एकूण रु 109500.
- सध्या भांडवली खर्च यात धरत नाही.
६) 2 वर्षातील उत्पन्न खालील प्रमाणे
- लोकल मार्केट मध्ये करडे व बोकड विक्री रु 35400.
- मोठ्या शेळ्यांची विक्री रु 34000.
- लेंडी खत रु 30000
- सध्या विक्री योग्य माल रु 58050.
- विक्री योग्य मरतुक रु 35500. हि हिशोबात धरली नाही.
७) एकूण खर्च रु 256945.
एकूण उत्पन्न रु 157450.
एकूण तोटा रु 99495.
८) माझ्या दृष्टीने 2 वर्षात दुष्काळात हा व्यवसाय टिकवता आला हे समाधान आहे.
९) पहिल्या वर्षी कारडांची मरतुक झाली. दुसरं वेत मिळालं नाही. शेळ्यांची तब्येत फारच खालावली होती. या सर्वाचा परिणाम म्हणून तोटा झाला असं मी मानतो.
१०) सध्या शेळ्या चांगल्या आहेत. आणि येथून पुढे दुष्काळ पडला नाही तर तोटा होणार नाही व चांगले उत्पन्न मिळेल असे वाटत आहे.
११) मेंढरांतील फिरत्या शेळ्या असल्याने त्यांना बंदिस्त वातावरण सूट व्हायला सुमारे दीड वर्ष लागले अस मी मानतो.

Balu Mote, Baramati. 9422512680

Sunday, February 24, 2019


1

If u wright more and more personal, it becomes more and more universal. असे एक इंग्रजीत वाक्य आहे; व पु काळे यांच्या एका पुस्तकात ते दिलं होतं. इंग्रजीतच कशाला मराठीत देखील' जे पिंडी ते ब्रम्हांडी' असे आहेच कि. शेळी पालनातील असे पर्सनल अनुभव कोणी शेयर करत नाही त्या पाठीमागे अनेक कारणे असू शकतील. मी माझे 2 वर्षातील काही अनुभव येथे शेयर करण्याचा विचार केला आहे. जर मी असं म्हटलं कि मला पुरेसा अनुभव येऊदे, माझा व्यवसाय फायद्यात चालूदे आणि मग मी माझे अनुभव इतरांना सांगेन; तर तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल. तोपर्यंत माझे जसे नुकसान झाले तसे बऱ्याच जणांचे नुकसान झालेले असेल किंवा मी जसा एखाद्या समस्येवर उपाय केला तसं कोना एखाद्याला करायला तेवढाच वेळ व पैसा खर्च करावा लागेल.
चॅनेल वरील माहिती वाचून कोणी जसेच्या तसे प्रयोग करतं असं मी समजत नाही, परंतु येथील(सोसियाल मिडियावरील) माहितीमुळे निश्चित दिशा सापडायला मदत होते असं माझं मत आहे.
हे सर्व वैक्तिक अनुभव लिहित असताना बऱ्याच वेळा आत्मप्रौढीचा व आत्मवंचनेचा भाग माझ्याकडून लिहिला जाईल, त्या बद्दल मला होता होईल तेवढे माफ करावे. एखाद्या व्यक्तीची वैचारिक व तांत्रिक मर्यादा तो आत्तापर्यंत जगलेल्या जिंदगित दडलेली असते असं माझं मत आहे. एखादी गोष्ट घडली, ती का व कशी हे समजून घेण्याकरिता त्या व्यक्तीची वैक्तिक व व्यावसायिक पार्श्वभूमी समजून घेणे क्रमप्राप्त असते इथपर्यंत मी समजतो, ती गरज आहे.
एखादं पुस्तक लिहिताना त्या पुस्तकावर काम करणारे बरेच हात असतात, पैकी लेखक हि जितकी महत्वाची व्यक्ती असते तितकीच संपादक हि देखील महत्वाची असते. एखादं वैज्ञानिक पुस्तक लिहिताना त्या त्या विषयातील मार्गदर्शकाची किंवा तज्ज्ञांची मदत तो लेखक घेत असतो. येथे चॅनेल वर लिहिताना यातील काहीच घडत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा चॅनेल वरील माहिती हि सदोष असू शकते हे मी कबूल करतो. 
सोसियल मिडियावरील व या चॅनेल वरील अनेक सन्माननीय सदस्य मला नेहमी प्रोत्साहन देतात, लिहिण्यास उद्युक्त करतात, खरं तर येथील लेखनाचं अर्ध अधिक श्रेय त्यांचंच आहे. एखाद्या गोष्टीतून काही आर्थिक फायदा होत नाही अशी गोष्ट स्वतःचा वेळ खर्च करून नियमित करत राहणे हे भारतीय लोकांच्या बहुदा रक्तात नाही, मी तरी त्याला अपवाद कसा असेंन. म्हणून मी जे काही लिहितो त्याचे श्रेय वाचकांना जाते जे मला नेहमी प्रोत्साहित करतात.
चॅनेल सारखी वेगळी चूल मांडून मी लिहितो त्यात काही फायदे आहेत. येथे कोणाची दखलंदाजी नसते, लुडबुड नसते, जाहिरात नसते, कोणी लाइक केलं किंवा डिसलाईक केलं हे जाणून घेण्याची गरज नसते, सर्वात महत्वाचं म्हणजे लिहिलेली सर्व माहिती एका जागेवर सापडते. माहिती आवडली तर फॉरवर्ड करायला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही.
एक भीती आणि दुःख याचं आहे कि यातील काही अनुभव घेऊन जे मी शेळीपालकाना मोफत मिळावेत या साठी लिहिले, ते घेऊन प्रशिक्षणामध्ये सांगून त्यातून पैसे मिळवले जाऊ शकतात. अर्थात याची शक्यता जरी कमी असली तरी जी मुळात मोफत माहिती मिळाली ती तशीच पुढे मोफत जावी अशी अपेक्षा ठेवणे काही वावगे नाही.
एकूणच माझा उद्देश स्थानिक शेळ्यांच्या जातींचा कोणतीही भेसळ न होता विकास व्हावा एवढाच आहे. म्हणून हि सर्व माहिति फक्त स्थानिक जातींच्या शेळ्यांचे पालन करणाऱ्या शेळी पालकांनापर्यंत पोहचवी असं माझा प्रयत्न आहे.
--- बाळू मोटे, बारामती (9422512680)
3 ते 9 महिने वयाच्या करडांसाठी मी 2 वर्ष्याच्या अभ्यासाअंती अशी गव्हाण बनविली आहे.
यात करडांना सहज खाता येते
लेंड्या व मूत्र पडत नाही
स्वच्छता करणे सोपे आहे
एका वेळेला 8 ते 16 करडे खाऊ शकतात
झाडपाला, मका कुट्टी व खुराक खाऊ घालता येतो.
करडांना गव्हाणीत शिरता येत नाही.

कोणाला बनवून हवी असल्यास श्री महेंद्र मोरे हे फॅब्रिकेटर असून त्यांच्याशी 9970155605या क्रमांकावर संपर्क साधावा.



रेकॉर्ड ठेवण्याबाबत माझी मते:-
१) वजने घेताना शक्यतो सकाळी घ्यावीत.(अनुष्या पोटी)
२) जेवढ्या जास्त बाबींच्या नोंदी घेतल्या जातील तेवढे चांगलेच असते. परंतु सर्व नोंदी शेळी पालकास घेणे शक्य नसते म्हणून अनुवांशिक सुधारणेच्या कामी येणाऱ्या गरजेच्या नोंदी घेण्यावर जास्त भर द्यावा.
३) नोंदी एकाखाली एक या पद्धतीने घ्याव्यात व रजिस्टर मध्ये त्यासाठी तशी आखणी करावी म्हणजे अश्या नोंदी ms एक्सेल मध्ये भरणे व त्याचे विश्लेषण करणे सोईचे जाते.
४) रजिस्टर मध्ये फक्त नोंदी घ्याव्यात, त्यांचे विश्लेषण स्वतंत्र रित्या करावे. त्याच रजिस्टर मध्ये विश्लेषण करू नये.
५) अनुवांशिक नोंदणीसाठी स्वतंत्र रजिस्टर व इतर नोंदी जसे चारा, खुराक, खर्च, विक्री इ साठी वेगळे रजिस्टर ठेवावे.
६) शेळी क्रमांक ठरविताना स्वतःची वेगळी पद्धत अवलंबू शकता. उदा. 
- नुसते अनुक्रम नंबर जसे 1,2,3....
- बॅच/ वर्ष/ अनुक्रम. जसे A/2017/ 1.
- वंशावळ दिसून येईल असे, जसे
A1/AB1, A1/AB2, A1/AB3....
७) विश्लेषण करताना ठराविक पद्धत वापरावी असा काही नियम नाही, डेटा पाहून व वेगवेगळे निकष लावून विश्लेषण करता येते.
८) विलेल्या शेळीचे व तिच्या करडाचे वजन दुसऱ्या दिवशी सकाळी घ्यावे.
९) नुसत्या निरीक्षणावरून शेळीच्या अनुवांशिक गुणधर्माचा थांगपत्ता लागत नाही. वेगवेगळ्या पॅरॅमिटर च्या नोंदी असल्यास निर्णय घेणे सोपे जाते.
१०) वजने घेण्यापूर्वी दर वेळेला वजन काट्याची अचूकता तपासून घ्यावी.
--- बाळू मोटे, बारामती (9422512680)

गरज अनुवांशिक सुधारणेची:-


१) स्थानिक जातिवंत शेळ्या तसेच उस्मानाबादी या शेळ्यांच्या अनुवांशिक सुधारनेत मोठ्या संधी आहेत.

२) माझ्या तर्कांप्रमाणे विदेशी शेळ्या तसेच तत्सम इतर राज्यातील देशी शेळ्यांचे पुढील 7-8 वर्षानंतर ब्रीडिंग साठी मागणी कमी होईल व त्या वेळेला रुचकर मटणासाठी स्थानिक व उस्मानाबादी शेळीला आजच्या पेक्षा जास्त मागणी वाढेल. हि मागणी मटणासाठी तर वाढेलच परंतु ब्रीडिंग साठी सुद्धा वाढेल.
३) आज उस्मानाबादी शेळीचा ब्रीडिंग साठीचा दर रु 300 ते 350 रु किलो असल्याचे दिसते यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे वाटते.
४) आजच्या शुद्ध समजल्या जाणाऱ्या उस्मानाबादी शेळी मध्ये निवड करून उच्च गुणवत्तेची सुधारित शेळीची जात विकसित करण्याचे काम आपणास करावे लागेल. तसेच इतर स्थानिक शेळ्यांची अनुवांशिक सुधारणा घडवून आणणे क्रमप्राप्त आहे.
५) माझ्याकडील स्थानिक शेळ्यांच्या अनुवांशिक सुधारणेचा कार्यक्रम मी आखला आहे. येत्या 8-10 वर्षात मला चांगले परिणाम मिळतील असे वाटते. आज रोजी मी मटणासाठी बोकड विक्री करत आहे. परंतु 10 वर्षानंतर मी ब्रीडिंग साठी या शेळ्या विकण्याचे नियोजन करत आहे कारण त्या वेळेला माझ्याकडे चांगल्या गुणवत्तेचे ब्रीड तयार असेल व सर्व अनुवांशिक रेकॉर्ड उपलब्ध असेल.
६) काही हुशार व चाणाक्ष शेळी पालक अगोदर पासूनच या निवड प्रक्रियेत उतरले असण्याची शक्यता जास्त आहे. आज रोजी त्यातील काही जुन्या शेळी पालकना किमान 4 ते 8 वर्ष झाली असतील. म्हणजेच त्यांचे कडील सुधारित उस्मानाबादी किंवा इतर स्थानिक शेळ्याच्या जाती योग्य वेळेला मार्केट मध्ये विक्रीस उपलब्ध होतील. हि अतिशय चांगली बाब आहे. एकूणच हा सगळा कार्यक्रम गुलदस्त्यात असतो त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे सांगणे कठीण आहे.
७) जेंव्हा विदेशी व तत्सम इतर राज्यातील देशी शेळ्यांच्या ब्रीडिंग साठी विक्रीत मंदी येईल तेंव्हा या उस्मानाबदी/ स्थानिक शेळ्यांच्या सुधारित जाती विक्रीस उपलब्ध होतील असे माझे मत आहे. त्या वेळेला नवीन शेळी पालकास चढ्या दराने या शेळ्या पाळण्यासाठी खरेदी कराव्या लागतील. 
८) तेंव्हा सर्व स्थानिक व उस्मानाबादी शेळी पालन करणाऱ्या शेळी पालकांस माझे नम्र निवेदन आहे कि त्यांनी आतापासूनच योग्य ब्रीडिंग प्रोग्रॅम आखून अनुवांशिक सुधारणा कर्यक्रम आखावा व उच्च गुणवत्तेचे ब्रीड तयार करण्यास सुरवात करावी.
९) आत्तापासूनच शेळ्यांचे पद्धतशीर रेकॉर्ड ठेवावे.
१०) अनुवांशिक सुधारणा या विषयीच्या अधिक माहितीसाठी माझ्या चॅनेल ला जॉईन व्हावे. तसेच माझी काही मदत हवी असल्यास ग्रुप वर किंवा पर्सनल चॅट वर प्रश्न विचारावेत. मी कोणी मोठा तज्ञ नसून एक सर्वसामान्य शेळी पालक आहे. माझ्या पातळीवर व उपलब्ध ज्ञानाच्या आधारे एक सामाजिक जाणीव म्हणून मी आपल्या प्रश्नांना यथाशक्ती यथोचित उत्तर देण्याचा प्रयन्त करिन. धन्यवाद.

---बाळू मोटे, बारामती (9422512680)


                                                               मका चार्यातील अन्नद्रवायचे पृथक्करण


हैड्रोपोनिक मका चारा का परवडत नाही:-

१) कोणत्याही चाऱ्याचे प्रमाण ठरवताना DM म्हणजे ड्राय मॅटर अर्थात पाणी विरहित चारा गृहीत धरून तो चारा जनावरांना (शेळ्यांना) किती द्यायचा हे ठरवतात. उदा. चिकात आलेल्या ओल्या 20 किलो मका चाऱ्यात 15 किलो पाणी असते तर 5 किलो DM असतो.
२) शेळ्यांच्या वजनाच्या 2 टक्के DM त्यांना चारा म्हणून ओल्या व सुक्या चार्यातून दिला जातो. जर 4 किलो ओला चिकात आलेला मका चारा एका शेळीला दिला तर तो 1 किलो DM होईल.
३) मका बी ज्यात 9 ते 11 टक्के पाणी असते, DM काढल्यास 1 किलो मका बी मध्ये 900ग्राम निघेल (10% ओलावा गृहीत धरल्यास)
४) 1 किलो मका बी पासून सुमारे10 किलो हैड्रोपोनिक हिरवा चारा तयार होतो असे समजू. हैड्रोपोनिक चारा तयार होताना बियातील कार्बोदकांचा ऊर्जा स्रोत म्हणून उपयोग होत असल्याने अंतिम चाऱ्यात DM कमी होतो. हि घट तूर्तास बाजूला ठेऊ.10 किलो हिरव्या चाऱ्याचा DM हा 900 ग्राम येणार. (उगवनितील घट गृहीत धरल्यास D M कमी होईल). या हिरव्या चाऱ्याचा प्रति किलो DM 90 ग्राम एवढा येईल.
५) व्हाट्स ऍप टेलेग्राम ग्रुप वरील अनेक सदस्यांच्या मते 1 किलो मका बी पासून 10 किलो चारा तयार होतो. जर 5 किलो चारा धरला तर DM वाढेल.
६) चिकात आलेल्या शेतातील एक किलो ओल्या मका चाऱ्याची किंमत हि चालू बाजारभावाप्रमाणे 1.5 ते 2.5 रु आहे. आपण येथे 2 रु प्रति किलो हा दर गृहीत धरू.
७) 1 किलो हायड्रोपोनिक मका चारा तयार करण्यासाठी 3 रु प्रति किलो असा खर्च येतो. (संदर्भ:-तामिळनाडू कृषी विद्यापीठ तसेच icar चे गोवा येथील संशोधन केंद्र)
८) वरील चित्रात शेतातील ओला मका व हैड्रोपोनिक हिरवा मका चारा यांतील अन्नद्रव त्यांच्या DM च्या आधारावर दिले आहेत.
९) एका शेळीला 4 किलो शेतातील ओला मका चारा खाऊ घातल्यास वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे तिला अन्नद्रव्य मिळतील. 4 किलो हिरवा चारा म्हणजे 1किलो DM. या चाऱ्यात DM च्या 10.67 टक्के प्रोटीन असते म्हणजेच 1x10.67/100= 0.1067 किलो ( म्हणजेच 100 ग्राम) प्रोटीन शेळीला मिळेल. तसेच क्रूड फायबर चे आहे . 1x 25.92/100=0.2592 किलो क्रूड फायबर. क्रूड फायबर जितके जास्त तितकी शेळीला जास्त ऊर्जा मिळते.
10) 4 किलो शेतातील चिकात आलेल्या मका चाऱ्याची किंमत 4x2=8 रु होईल.
११) आता हेच विश्लेषण आपण हैड्रोपोनिक हिरव्या चाऱ्याचे करू. एका शेळीला 4 किलो हा चारा दिल्यास त्यात 90x4=360 ग्राम DM मिळेल. (1 किलो बी पासून 10 किलो चारा तयार होतो हे गृहीत धरले आहे). या 4 किलो चाऱ्यात 360x13.57/100= 48.85ग्राम प्रोटीन तर 360x14.07=50.65 ग्राम क्रूड फायबर मिळतील.
१२) 4 किलो हैड्रोपोनिक हिरव्या मका चाऱ्याची किंमत 3x4= 12 रु होईल.
१३) आता हे लक्षात येते कि 8 रु खर्च करून पारंपरिक पद्धतीत 4 किलो चार्यातून सुमारे 100 ग्राम प्रोटीन व 260 ग्राम क्रूड फायबर मिळतात तर 12 रु खर्च करून हैड्रोपोनिक पद्धतीत 4 किलो चार्यातून 48.85ग्राम प्रोटीन तर 50.65 ग्राम क्रूड फायबर मिळतात. 
१४) आता प्रश्न असा उरतो कि हैड्रोपोनिक मका चारा घातल्यानंतर दूध उत्पादनात किंवा शेळ्यांच्या वजनात वाढ कशी घडून येते? माझ्या मते यात प्रमुख दोन करणे आहेत.
एक म्हणजे हैड्रोपोनिक चारा घालून शेळ्यांना किंवा गाईंना नेहमी इतका खुराक तसेच पोटभर सुका चारा दिला जातो. दुसरे असे कि उत्पादन वाढ हि त्यात्या कालावधीत मोजली जाते. उदा. उन्हाळ्यामध्ये ज्या गाईन सुका चारा दिला जातो अश्या गाईंचे दूध उत्पादन समजा 7 लिटर प्रति दिवस आहे त्याच गाईंना जर हैड्रोपोनिक चारा दिला तर दूध उत्पादन 8 लिटर प्रति दिन होते. अशी तुलना केल्यामुळे फायदा दिसू शकतो. वास्तविक जेंव्हा गाईंना शेतातील ओली चिकतील मका खाऊ घालतात तेंव्हाची दूध उत्पादन व उन्हाळ्यातील फक्त हैदेओपोनिक चारा खाऊ घालून मिळणारे दूध उत्पादन यांची तुलना व्हायला हवी. अशी तुलना केल्यास दूध उत्पादनात वाढ दिसणार नाही. तसे असते तर पावसाळ्यात देखील हैड्रोपोनिक चारा खाऊ घातला असता लोकांनी. उन्हाळ्या पुरतीच त्याची उपयुक्तता मर्यादित राहिली नसती.

टीप:- वरील विश्लेषण पूर्ण पणे थेरोटीकल आहे. यातील विधाने तंतोतंत खरी ठरतील असा माझा कोणताही दावा नाही. संदर्भासाठी तामिळनाडू कृषी विद्यापीठ व गोवा येथील icar चे संशोधन केंद्रातील रिसर्च पेपर घेतले आहेत जे ओनलाईन उपलब्ध आहेत