Sunday, February 24, 2019

शेळयांमधील क्रॉस ब्रिडिंग - तोटे व फायदे




भाग 1

क्रॉस ब्रीडिंग ची दुसरी बाजू:-

1) क्रॉस ब्रीडिंग करून जगातील सर्वात जास्त मांस उत्पादन देणाऱ्या बोअर जातीपेक्षा जास्त मांस उत्पादन देणाऱ्या शेळ्या तयार करणे लगेच शक्य नाही. 
2) दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे क्रॉस ब्रीड मुळे मिळणारे मांस उत्पदन हे थेट बोअर पासून मिळणाऱ्या मांस उत्पादनापेक्षा कमीच असते.
3) अन्न धान्यांचे व भाजीपाल्याचे उत्पादन वाढवणे गरजेचे होते कारण वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्न उपलब्ध होणे आवश्यक आहे. अन्न धान्य व भाजीपाला या जीवनावश्यक वस्तू आहेत. म्हणून धान्यांचे व भाजीपाल्याचे संकरीकरण करून उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करणे योग्य आहे.
4) धान्य व भाजीपाला पिकात संकरीकरण करून शेतकऱ्यांचा किती फायदा झाला?
5) मग फायदा कोणाला झाला? तर उत्पादन वाढीचा फायदा हा नेहमी ग्राहकाला होतो हा आज पर्यंतचा इतिहास आहे. ग्राहकाला जे आज स्वस्तात धान्य मिळते ती किमया उत्पादन वाढीची आहे. काही उदाहरणे पाहू
6) 20 ते 25 वर्षांपूर्वी टोमॅटो व वांगी पिकात शेतकरी सुधारित व पारंपरिक बियाणे वापरत होते. तेंव्हा टोमॅटोचे साधारण एकरी 10 टनापर्यंत उत्पादन मिळायचे आज हेच उत्पादन संकरिकरणामुळे सरासरी 30 ते 40 टनापर्यंत पोहचले आहे. सरासरी विचार केला तर टोमॅटो पिकातून शेतकऱ्यांचा म्हणावा तसा फायदा झाला का. असेच आपणास कापूस, ऊस वैगरे पिकामध्ये पहावयास मिळेल.
8) कोंबड्या पासून मिळणाऱ्या मांस उत्पादनाचे उदाहरण अतिशय समर्पक आहे. जास्त मांस उत्पादनासाठी आज मोठ्या प्रमाणात ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन केले जाते. देशी कोंबड्यांचे मांस उत्पादन आज नसल्यात जमा झाले आहे. दर पाहता ब्रॉयलर च्या दुप्पट दर देशी कोंबड्याना मिळतो. देशी कोंबड्यांची मागणी आज खूपच कमी झाली आहे. जे चोखंदळ ग्राहक आहेत तेच फक्त देशी कोंबडीचा आग्रह धरतात. 
9) क्रॉस ब्रीडिंग करून आपण hf व जर्सी गाईंचा वाढीव दूध उत्पादनासाठी स्वीकार केला, दूध उत्पादन देशी गाईंच्या तुलनेत दुपटीने वाढले. परंतु झाले काय! आज क्रॉस ब्रीड गाईचे दूध असल्याने दर देशी गाईच्या दुधापेक्षा निम्याने कमी मिळतो. दूध उत्पादन वाढल्यामुळे ग्राहकांना स्वस्तात दूध पुरवठा करणे शक्य झाले परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांचा किती फायदा झाला.
10) तिसरे उदाहरण हे डुक्कर मासा म्हणजे चिलाबीचे घेऊ. हा काही संकरित मासा वगैरे नाही परंतु तो बाहेरील देशातून आयात केला आहे. आज 70 ते 80 टक्के ग्राहक हे चिलाबी या माशाचे आहेत. कारण तो भारतीय इतर मस्यांपेक्षा निम्याने स्वस्त आहे.
11) भारतीय लोकांची मानसिकता हीच आहे कि जेंव्हा एखाद्या उत्पादनाला स्वस्त पर्याय मिळतो तेंव्हा 70 ते 80 टक्के लोक तिकडे वळतात.
12) शेळ्यांमध्ये क्रॉस ब्रीडिंग करून समजा आता आहे त्या पेक्षा 40 टक्के मांस उत्पादनात जरी वाढ झाली तरी शेळीच्या मटणाचे दर वाढण्याऐवजी खाली येतील. आणि स्थानिक शेळ्यांच्या मटणाची मागणी कमी होईल त्या मुळे अत्ता आहे त्या पेक्षा स्थानिक शेळ्यांना दर वाढणार नाहीत.
13) शेळ्यांचे मांस उत्पादन वाढविण्यापेक्षा मटणाचे दर वाढू द्यावेत. जे अत्ता नैसर्गिक रित्या वाढत आहेत. दर वाढण्यात आपला फायदा आहे, मांस उत्पादन वाढण्यात नाही. उदाहरण पाहू-
आज क्रॉस ब्रीड शेळ्यांच्या मांस उत्पादनातील वाटा 0 टक्के आहे. आणि मटणाचे दर 400 रु किलो आहेत. 100 किलो विकल्यानंतर 40000 रु मिळतील. क्रॉस ब्रीड शेळ्यांचे मांस उत्पदन जर 40 टक्के ने वाढले तर काय होईल...!
आपणास एकूण 140 किलो मांस विकावे लागेल. त्या पैकी 100 किलो गावरान शेळीचे आहे त्याचे 40000 रु होतात आणि उरलेले 40 किलो संकरित शेळीचे आहे ज्याला निम्मा म्हणजे रु 200 दर मिळतो. तेंव्हा त्याचे रु 8000 होतील. म्हणजे 140 किलो मांस विकून आपणास 48000 रु मिळतील. 
आता दुसरी बाजू पाहू. क्रॉस ब्रीडिंग न करता आहे हे 100 किलोच मांस उत्पादन ठेवले परंतु त्याची गुणवत्ता सुधारली. वाढत्या मागणी मुळे व गुणवत्तेत सुधारणा केल्यामुळे मटणाचे दर 500 रु प्रति किलो असे झाले. आता आपणास 100 किलो मांस विकून 50000 हजार मिळतात. तेंव्हा कमी मांस उत्पादन करून आपणास जास्त पैसे हे आपोआप पुढे दर वाढल्यामुळे मिळणार आहेत. 
14) मांस हे काही जीवन आवश्यक वस्तू नाही. तेंव्हा दर वाढल्याने समाज्यात काही विपरीत होण्याची शक्यता नाही.
15) दुसरी एक हाकाटी आहे कि उच्च दर्जाची प्रथिने मिळविणे व कुपोषण टाळण्यासाठी मांस उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. हे विधान सरासर खोटे आहे. कारण 'मी तुम्हाला उच्च दर्जाची प्रथिने देतो....घ्या रुपये 400 प्रति किलो दराने'. ज्यांच्याकडे कुपोषण होते त्यांना असे सांगणे म्हणजे नाठाळ पणा नव्हे काय?

तेंव्हा क्रॉस ब्रीडिंग करून शेळ्यांचे मांस उत्पादन वाढविणे योग्य आहे काय? एकूण शेळी पालन व्यवसायाला अधोगतीचे दिवस त्यामुळे येतील. आजच्या एवढेच पैसे मिळविण्यासाठी आपणास दुप्पट तिप्पट मांस उत्पादन करावे लागेल आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा का हाणून घ्यावा?

भाग 2
"सावध ऐका पुढल्या हाका":-

१) देशातील एकूण मांस उत्पादनातील वाटा खालील प्रमाणे आहे
मासेमारी (40 ते 50 %)
कुकुटपालन (30 ते 40 %)
शेळी व मेंढी (10 % पर्यंत)
इतर (1 ते 2%)
२) वरील प्रत्येक प्रकारच्या मांसास मिळणारा दर खालील प्रमाणे
मासे (सरासरी 100 रु किलो)
कोंबडी ( सरासरी 200 रु किलो)
शेळी व मेंढी ( 400 रु किलो)
३) खाऱ्या व गोड्या पाण्यातील मासेमारी, कुकुटपालन उद्योग व पारंपरिक शेळी पालन व्यवसाय आज रोजी चांगलेच स्थिरस्थावर झालेले आहेत. बंदिस्त शेळीपालन हा व्यवसाय अजून सेटल व्हायचा आहे.
४) बंदिस्त पद्धतीच्या शेळी पालन व्यवसायात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जो पर्यंत बंदीस्त पद्धतीत स्थानिक देशी जातींचे संगोपन केले जाईल तो पर्यंत या व्यवसायाला चांगले दिवस राहतील. परंतु क्रॉस ब्रीडिंग करून कृत्रिम मांस उत्पादन वाढवून बंदिस्त शेळी पालन जेंव्हा व्यावसायिक तत्वावर सुरु होईल तेंव्हा अश्या शेळी पालनातून पुरेसा आर्थिक परतावा मिळणार नाही; का नाही त्याची कारणमीमांसा खाली केली आहे.
५) मुद्दा क्रं १ मध्ये आपण प्रत्येक प्राण्याचे मांस उत्पादनातील वाटा पहिला. आज रोजी यातील कोणत्याही प्राण्याची मांस उत्पादन व विक्री या साठी दुसऱ्या कोणत्याच प्राण्याबरोबर स्पर्धा नाही. मागणी व पुरवठा यांच्या नियमानुसार सर्वांचे उत्पादन सुरु आहे.
६) आज एकूण मांस उत्पादनातील शेळी मेंढीचं वाटा 10 टक्के पर्यंत आहे. क्रॉस ब्रीडिंग करून जास्त मांस उत्पादन देणाऱ्या शेळ्या पाळल्यानंतर हा 20 टक्के झाल्यावर काय होईल? मासे मारी व कुकुटपालन या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण ते चांगलेच सेटल झालेले व्यवसाय आहेत. 20 टक्के पैकी 10 टक्के वाढीव मांस उत्पादनाची स्पर्धा कुकुटपालन व्यवसायातून मिळणाऱ्या मांस उत्पादनाशी
होईल. कारण मटन व चिकन हे जवळपास सारखेच आहेत त्या मानाने मासे हा पदार्थ वेगळा पडतो. आता मुळातच कोंबडीच्या मांसाचे दर हे 200 रु किलो आहेत. तेंव्हा शेळ्यांच्या 10 टक्के वाढीव मांस उत्पादन हे 200 रु किलो या दराचा विचार करून विकावे लागेल. म्हणजेच 200 रु पेक्षा कमी दराने विकले तर ते कोंबडीला मिळणाऱ्या दराशी स्पर्धा करू शकेल.
७) तेंव्हा शेळ्यांच्या वाढीव मांस उत्पादनाची पहिली स्पर्धा हि कुकूटपालनाशी होईल व दुसरी स्पर्धा हि मासेमारी या व्यवसायाशी होईल.
८) तेंव्हा शेळी मेंढीचा एकूण मांस उत्पादनातील वाटा हा 10 टकेच्या आत कसा राहील हे पहिले पाहिजे जेणे करून रिटेल बाजारातील मांसास 400 रु पेक्षा जास्त दर मिळेल. रिटेल ला 400 मिळाले तर शेळीपालकला 200 ते 250 दर मिळतो, रिटेल ला 600 मिळाल्यास शेळी पालकाला 300 ते 350 दर सहज मिळेल.
९) शेळीच्या मांसास दर जास्त मिळविण्यासाठी काहीही करावे लागणार नाही परंतु क्रॉस ब्रीडिंग करून जास्त पैसे मिळविण्याकरिता या व्यवसायात ढोर मेहनत करावी लागेल. क्रॉस ब्रीड Hf गाई आल्यापासून दूध उत्पादन वाढले परंतु बाजार कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना ढोर मेहनत करून हातावर फक्त शेण शिल्लक राहते हा अनुभव इथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

भाग 3


क्रॉस ब्रीडिंग ची दुसरी बाजू:-

1) महाराष्ट्रामध्ये अनेक खाजगी संस्था, उद्योजक, निमसरकारी संस्था, धर्मादाय संस्था कृषी क्षेत्राशी निगडित आहेत. या बऱ्याच संस्थांमध्ये शेळी पालनाचे प्रशिक्षण दिले जाते. 
2) कित्येक दूरदर्शी राजकारणी व उद्योगपती आहेत व त्यांची खाजगी कंपन्या आहेत. 
3) शेळीच्या मटणाला परदेशात मागणी आहे. म्हणून वरील पैकी कोणीही क्रॉस ब्रीड शेळ्या सांभाळून मोठ्या प्रमाणात मांस निर्मिती करून निर्यात केल्याचे उदाहरण माझ्या ऐकिवात नाही. (कोणाला माहित असल्यास कृपया कळवावे, कमीत कमी माझे अज्ञान तरी दूर होईल)
4) आपण बरेच वर्ष क्रॉस ब्रीड hf गाईंचे दूध सेवन केले. आणि आता सांगितले जाते कि हे दूध भारतीय गाईंच्या दुधापेक्षा कमी प्रतीचे आहे. A1 व A2 हे दुधाचे प्रकार आता माहित झाले. कोणास ठाऊक उद्या भविष्यात क्रॉस ब्रीड शेळ्यांच्या मटणाच्या बाबतीत असेच संशोधन होऊन हे मटण आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही असा निष्कर्ष निघायचा!
5) अन्नाचे मांसात रूपांतर करण्याच्या क्षतेला fcr असे म्हणतात. कमीत कमी अन्न खाऊन जास्त मांस उत्पादन किंवा दूध उत्पादन देणारे प्राणी शेतकर्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. शेळ्यांमध्ये जास्त मांस उत्पादन देणाऱ्या किंवा क्रॉस ब्रीड शेळ्या या कमी अन्न खाऊन किंवा स्थानिक जातींच्या शेळ्यांऐवढे अन्न खाऊन जास्त मांस उत्पादन देतात असा कोणताही शास्त्रीय निष्कर्ष वाचनात आला नाही.

भाग 4

क्रॉस ब्रीडिंग फायद्याचे, पण केंव्हा:-

१) आज पर्यंत (भाग 1ते3) मी क्रॉस ब्रीडिंग ची निगेटिव्ह बाजू मांडण्याचा प्रयत्न केला परंतु क्रॉस ब्रीडिंग फायद्याचे देखील आहे. कसे ते आपण समजून घेऊ.
२) शेतकरी हित हे ध्येय ठेवून क्रॉस ब्रीडिंग केल्यास फायद्याचे ठरेल. उदाहरणार्थ क्रॉस ब्रीडिंग केल्याने जे उत्पादन तयार होईल त्याला जास्त दर मिळाल्यास फायदा होईल.
३) ललित जातीचा पेरू चे उदाहरण घेता येईल. हि संकरित जात आहे. तिचे उत्पादनात वाढ न करता पेरूच्या गुणवत्तेत बदल केला आहे. या पेरूच्या आतील गर हा गुलाबी रंगाचा असतो. त्यामुळे त्यास इतर पेरू पेक्षा जास्त दर मिळतो. त्यात शेतकऱ्याचा फायदा आहे.
४) cswri यांचे शेतकरी हित समोर ठेऊन केलेले संशोधन महत्वाचे आहे. त्यांच्या वेबसाइटवर माहिती मिळते. त्यांनी तिहेरी संकर असलेली स्वदेशी मेंढीची जात विकसित केली आहे. या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे उच्च प्रतीची लोकर आणि मटण देण्याचा गुण त्या मेंढीचा आहे. साध्या मेंढीची लोकर कमी प्रतीची असल्याने बऱ्याच वेळा फेकून द्यावी लागते किंवा कमी भावाने विकावी लागते. या तिहेरी संकरामध्ये मेंढी पालकाला लोकरीचे व मांसाचे उत्पादन मिळते व त्यात शेतकऱ्याचा फायदा आहे.
५) संकरीकरण करून शेळ्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे संशोधन झाले तर त्यात शेळी पालकांनचा फायदा आहे.
६) संकरीकरण करून fcr मध्ये सुधारणा करण्याकरिता संशोधन केल्यास शेळी पालकांच्या फायद्याचे ठरेल. म्हणजे कमी अन्न (चारा व खुराक) खाऊन आजच्या इतकेच मांस उत्पादन देणारी शेळीची संकरित जात विकसित करणे होय. कमी चारा व खुराक लागत असल्याने उत्पादन खर्चात बचत होईल, व शेळी पालकाचा फायदा होईल. 
७) ईद च्या मार्केट साठी देखणे व रुबाबदार बोकड देणाऱ्या शेळीच्या संकरित जात विकसित केल्यास शेळी पालकाचा फायदा आहे.
८) आजचा संकरीकरण करण्याचा हेतू हा फक्त मांस उत्पादन वाढ हाच दिसतो. वास्तविक वर उल्लेख केल्या प्रमाणे अनेक बाबी आहेत ज्यात संकरीकरण केल्याने शेळी पालकांचा फायदा होऊ शकतो.

या माहितीचा शेवट येथेच करतो.

टीप:- भाग 1 ते 4 सर्व वैक्तिक (बाळू मोटे) मते आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या विचार सरणीनुसार हि माहिती योग्य किंवा अयोग्य ठरू शकते. कोना उद्योग पतीचे, संशोधन संस्थांचे ,शासनाचे, शेतकर्याचे या माहितीने अहित व्हावे असा अजिबात हेतू नाही हे मी प्रामाणिक पणे नमूद करतो.

---बाळू मोटे बारामती. (9422512680)

Friday, February 22, 2019

                                                                             Chitra-3


पोस्ट 3

ब्रीडिंग साठी सर्वोत्कृष्ट शेळी कशी निवडायची?

1) पोस्ट 1 व 2 मध्ये आपण शेळ्यांच्या वजनाच्या विश्लेनावरून व जुळे देण्याचे प्रमाण तसेच एकूण मांस उत्पादनातील त्या शेळीचा वाटा या वरून त्यांची क्रमवारी ठरवली होती.
2) चित्र 3 मध्ये आत्तापर्यंत केलेल्या क्रमवारी त्यांच्या आहे त्या क्रमाने एकाखाली एक मांडून त्यांना गुण दिले आहेत. चढत्या क्रमाने शेळ्याची मांडणी असेल तर गुणही चढत्या क्रमाने दिले आहेत. शेळ्याची मांडणी जर उतरत्या क्रमाने असेल तर गुणही उतरत्या क्रमाने दिले आहेत.
3) चित्र क्रं 3 मध्ये दाखवल्या प्रमाणे सर्व गुणांची बेरीज करून तळाशी मांडली आहे. आलेल्या बेरजेवरून गुणानुक्रम काढण्यासाठी उतरत्या क्रमाने मांडणी केली आहे. या पद्धतीने C,A,D,B,E असा गुणानुक्रम मिळतो. 
4) या अंतिम गुणानुक्रमा प्रमाणे C शेळी हि कळपातील सर्वोत्कृष्ट शेळी आहे. तसेच A व D या देखील चांगल्या शेळ्या आहेत परंतु B व E या शेळ्या कळपातून काढून टाकणे श्रेयस्कर होईल.
5) C शेळीच्या पाठी ठेवणे चांगले तसेच तिच्या पासून जन्मलेला बोकड लागवडीसाठी सांभाळणे योग्य राहील.
6) कळपाच्या एकूण संख्येच्या 20 टक्के शेळ्या निवडताना या गुणानुक्रमाचा विचार करून चांगल्या गुणवान शेळ्या निवडाव्यात.
7) आपल्या कळपातील शेळ्यांची तुलना दुसऱ्या कळपातील शेळ्यांशी करता येत नाही.
8) शेळ्यांच्या नोंदी वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. त्याप्रमाणे डेटा प्रोसेस करण्याच्या पद्धती बदलत असतात.

टीप:- स्थानिक जातीच्या शेळ्यांचे पालन करणाऱ्या शेळीपालकांनी या उदहरणांचा जरूर विचार करावा. काही अडचण वाटत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. माझी काही मदत लागल्यास आपण टेलिग्राम व व्हाट्स ऍप वर संपर्क साधू शकता. शेळी पालनासंबंधी या स्वरूपाचा डेटा प्रोसेस करण्यासंदर्भात माझी काही मदत हवी असल्यास संपर्क साधावा. 

या माहितीचा येथेच शेवट करतो. या विषयी आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. 
धन्यवाद.
                                                                         Chitra-2


पोस्ट क्रं 2

करडांची वजने व विश्लेषण:-

1) पोस्ट 1 मध्ये मुद्दा क्रं 1 व 2 मध्ये जी गृहीतके आहेत व ज्या शेळ्या उदा. साठी घेतल्या आहेत तेच येथे विश्लेषणासाठी घेऊ. या उदा मध्ये करडांची मरतुक गृहीत धरली नाही.
2) चित्र क्रं 2 मध्ये त्या 5 शेळ्यांची 5 वर्षातील एकूण 7 वितांची व त्यांच्या 3 महिने वयाच्या करडांची वजने दिली आहेत. प्रत्येक करडाचे वजन वेगळे मांडले आहे.
3) स्तंभ 8 मध्ये प्रत्येक शेळीच्या एकूण 7 वितातील सर्व करडांच्या वजनाची बेरीज मांडली आहे. तसेच स्तंभ 9 मध्ये प्रत्येक शेळीचे एकूण 7 वेतात जुळे करडे देण्याची टक्केवारी मांडली आहे. 
4) स्तंभ 8 मधील सर्व संख्यांची बेरीज 501 हि तळाला मांडली आहे व तिचा उपयोग स्तंभ 10 मध्ये केला आहे.
5) स्तंभ 10 मध्ये प्रत्येक शेळीचा एकूण मांस उत्पादनातील वाटा टक्केवारी मध्ये मांडला आहे. 
6) सर्वोत्कृष्ट शेळीची निवड करण्यासाठी येथे आपणास 2 मुद्दे विचारात घ्यावे लागतील. पहिला म्हणजे जुळे देण्याची टक्के वारी तर दुसरा म्हणजे एकूण मांस उत्पादनातील त्या शेळीचा वाटा.
7) स्तंभ 9 प्रमाणे शेळ्यांची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास आपणास C,A,D,B,E असा क्रम मिळतो यात C शेळी सर्वोत्कृष्ट आहे. स्तंभ 10 प्रमाणे शेळ्यांची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास आपणास C,B,A,D,E असा क्रम मिळतो. यात आपणास C शेळी उत्कृष्ट आहे असे समजते. 
8) सर्वोत्कृष्ट शेळी ठरविण्यासाठी आपणास शेळीची वंशावळ तसेच पोस्ट 1 व 2 मधील विश्लेषण उपयोगी पडणार आहे. या उदाहरणात आपण शेळ्या विकत आणल्या मुळे त्यांची वंशावळ आपणास माहित नाही, तेंव्हा तूर्तास वंशावळ हा भाग बाजूला ठेऊन उत्कृष्ट शेळी कशी निवडायची ते आपण ठरवायला हवे. पोस्ट 1 मध्ये उत्कृष्ट शेळी D हि होती मात्र या पोस्ट मध्ये उत्कृष्ट शेळी C हि आहे. तेंव्हा उत्कृष्ट शेळी ठरविण्यासाठी या माहितीचा कसा उपयोग करायचा?

टीप:- हि पद्धत कोणत्याही शास्त्रीय पद्धतीवर आधारित नाही, किंबहुना ती एक गणितीय पद्धत आहे. या पेक्षा वेगळ्या पद्धतीने सुद्धा हे विश्लेषण करता येऊ शकेल. स्थानिक जातीच्या शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी या उदा. चा जरूर विचार करावा.

                                                                        Chitra- 1

पोस्ट -1

शेळ्यांची वजने व विश्लेषण:-

१) उदा पाहू. 5 शेळ्या खरेदी केल्या व त्यांची दर वर्षी वजने घेतली 5 वर्षापर्यंत. गणितातील किचकट पणा टाळण्यासाठी असे गृहीत धरू कि सर्व शेळ्या एकाच वेळी लागतात व वितात.
२) पहिले 2 वर्षे शेळ्या सेट होण्यासाठी द्यावी लागतील, या कालावधीत त्यांची वजने कमी होतील. त्यानंतर मात्र वाढतील. तसेच दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडल्याने हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. 
३) चित्र क्र 1 मध्ये स्तंभ 1 ते 5 मध्ये A,B,C,D व E या नावाच्या शेळ्यांची वजने दिली आहेत. त्यांचे विश्लेषण पुढील स्तंभमध्ये केले आहे.
४) पाठीमागील पोस्ट मध्ये मी सांगितले होते कि सरासरी काढल्यावर बऱ्याच वेळा दिशाभूल होऊ शकते. कसे ते आपण पाहू. स्तंभ 6 मध्ये प्रत्येक शेळीची 5 वर्षे मधील वजनाची सरासरी दिली आहे. या सरासरीवरून जर शेळ्यांची उतरत्या क्रमाने मांडणी केली तर E,C,D,B,A अशी क्रमवारी मिळेल. यात E हि शेळी सर्वोत्कृष्ट आहे असे समजावे लागेल.
५) स्तंभ क्रं 7 मध्ये त्या 5 वर्षातील शेळीचे जास्तीत जास्त वजन किती होते तसेच स्तंभ 8 मध्ये कमीत कमी वजन किती होते हे मांडले आहे. या दोघांची म्हणजे 7 व 8 ची वजाबाकी स्तंभ 9 मध्ये मांडली आहे. स्तंभ 9 हा शेळ्यांच्या वजनात झालेली घट दर्शवितो म्हणून कमीत कमी वजन घट झालेली शेळी हि चांगली म्हणावी लागेल. स्तंभ 9 मधील फरकावरुन शेळ्यांची चढत्या क्रमाने मांडणी करू, ती अशी - C,D,A,B,E. यात C हि शेळी सरवोत्कृष्ट आहे असे समजावे लागेल. 
६) पुढील स्तंभ 10 ते 13 मध्ये शेळ्यांचे वजनाची वजाबाकी केली आहे. म्हणजे दुसऱ्या वर्षीच्या वाजनातून पहिल्या वर्षाचे वजन वजा केले. आपणास माहित आहे कि पहिल्या वर्षी शेळ्या विकत घेतल्याने त्यांची वजने जास्त होती तसेच दुसऱ्या वर्षी दुष्काळ होता. म्हणून स्तंभ 10 व 11 मध्ये ऋण संख्या अली आहे, याउलट स्तंभ 12 व 13 मध्ये धन संख्या अली आहे, ज्याचा अर्थ आहे कि शेळ्यांच्या वजनात वाढ झाली. आता एकूण ऋण संख्यांची बेरीज स्तंभ 14 मध्ये तर धन संख्यांची बेरीज स्तंभ 15 मध्ये आहे. स्तंभ 14 शेळीची 5 वर्षातील वाजनातील एकूण घट दर्शवितो तर स्तंभ 15 वाजनातील वाढ दर्शवितो. आता वाजनातील एकूण वाढीतून वाजनातील एकूण घट वजा केल्यास शेळीची वजन वाढीची, अन्नाचे मांसात रूपांतर करण्याची व वाईट परिस्थिती तग धरण्याची क्षमता दिसून येईल. स्तंभ 16 तील धन संख्या एकूण निव्वळ वाजनातील वाढ दर्शविते. स्तंभ 16 वरून शेळ्यांची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास आपणास D,A,C,B,E असा क्रम मिळतो. याप्रमाणे D शेळी सर्वोत्कृष्ट ठरते. 
७) रकाना क्र 4-14,1-14 व 3-14 वरून हे लक्षात येईल कि वाईट परिस्थिती अली तरी D शेळीचे फार वजन कमी झाले नाही. A शेळीचे C पेक्षा जास्त कमी झाले परंतु तिच्या वाजनातील वाढ हि C पेक्षा जास्त आहे. 
८) रकाना 1-12, 2-12, 3-12, 4-12 वरून हे लक्षात येते कि योग्य परिस्थिती मिळताच शेळ्यांची वजन वाढ एकाच वेगाने प्रत्येकीच्या निश्चित वजन वाढीच्या सीमेपर्यंत झाली त्यानंतर वजन वाढ हळू झाली. 
९) रकाना 2-16 व 5-16 वरून लक्षात येते कि शेळी B व E ने बंदिस्त पद्धतीत स्वतःला जुळवून घेतले नाही, त्यामुळे त्यांच वजने वाढली नाहीत. 
१०) मुद्दा क्र 4 मध्ये E शेळी तर मुद्दा 5 मध्ये C शेळी सर्वोत्कृष्ट दाखवली होती, जे कि दिशाभूल करणारे आहे. 

टीप:- सर्वोत्कृष्ट शेळी ठरविण्यासाठी फक्त शेळीच्या वजनाची विश्लेषण पुरते नाही. हि पद्धत कोणत्याही शास्त्रीय पद्धतीवर आधारित नाही, किंबहुना ती एक गणितीय पद्धत आहे. या पेक्षा वेगळ्या पद्धतीने सुद्धा हे विश्लेषण करता येऊ शकेल. स्थानिक जातीच्या शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी या उदा चा जरूर विचार करावा.
शेळी पालकांची स्पर्धा कुणाशी?:-

1) द्राक्ष, डाळिंब बागायतदार एकमेकांशी स्पर्धा करतात?
2) ऊस बागायतदार एकमेकांशी स्पर्धा करतात?
3) दुग्ध व्यवसायिक एकमेकांशी स्पर्धा करतात?
4) स्पर्धा हि व्यवसायच्या निकोप वाढीसाठी आवश्यक असते परंतु ती उत्पादन वाढ व दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने असावी लागते.
5) शेळी पालनाचा बारकाव्याची चर्चा न करणे हे समस्त शेळी पालन व्यवसायाच्या दृष्टीने हानिकारक वाटते. 
6) नवीन शेळी पालक तेंव्हाच तयार होतील जेंव्हा खात्रीशीर सल्ला मिळेल व या व्यवसायातून उत्पन्न मिळेल. आणि तेंव्हाच ब्रीडिंग चा व्यवसाय करणाऱ्या शेळी पालकांना ग्राहक मिळेल.
७) काही गोठ्यावर जाण्यास व गोठा शेळ्या पाहण्यास प्रतिबंध असतो तर काही ठिकाणी प्रवेश फी 100 रुपयांपर्यंत घेतली जाते. हे फक्त बंदिस्त पद्धतीच्या शेळी पालनात दिसते. जे पारंपरिक व्यावसायिक आहेत ते कधीही कुणाशी स्पर्धा करत नाहीत व त्यांचे कडे असलेली माहिती विना मोबदला सांगतात. शिकलेल्या लोकांनी असे वागणे खचितच योग्य नाही. 
८) शेळी पालनाचे प्रशिक्षण वर्गाला एवढी फी? 
९) मला जेंव्हा व्यवसायात अडचण येते तेंव्हा मी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना विचारतो, मला समाधान कारक उत्तरे मिळतात. तेच माझे खरे प्रशिक्षक आहेत. 
१०) बंदिस्त शेळी पालनातील समस्या ह्या पारंपरिक व्यवसायापेक्षा वेगळ्या आहेत हे मात्र नक्की.

टीप:- माहिती आवडल्यास लाइक व आवडली नसल्यास डिसलाईक करावे हि विनंती. कारण सोशल मीडिया हा आभासी virtual आहे. ग्रुप मधील समजा बऱ्याच लोकांना माहिती आवडत नसेल आणि तरीही मी अशी माहिती वारंवार टाकणे हि माझी चूक होईल.
Dominent and recesive जिन:-

1) मराठीत प्रतिशब्द माहित नाही परंतु राजकारणातील दोन शब्द प्रतिशब्द म्हणून वापरण्याजोगे आहेत. डॉमिनेन्ट म्हणजे जहाल व रेसेसिव्ह म्हणजे मवाळ किंवा नेमस्त. 
2) कोणत्याही प्राण्याला DNA असतात, त्या DNA मध्ये गुणसूत्रांच्या साखळ्या असतात. गुणसूत्र म्हणजे जीन, हे जीन एक आईचा व एक बापाचा असे जोडीने त्या साखळीत असतात. गुणसुत्रात जी माहिती लिहिलेली असते तसे तो प्राणी घडतो. 
3) जीन च्या दोन जोडयापैकी एक डॉमिनेन्ट व दुसरा रेसेसिव्ह किंवा उलटे असू शकते. याचा अर्थ जो जीन डॉमिनेन्ट आहे मग तो आईकडून आलेला असो किंवा बापाकडून, त्याचेच गुणधर्म त्या अपत्यामध्ये दिसतात. दुसऱ्याचे गुणधर्म सुप्त अवस्तेत राहतात. 
४) माझ्या आईच्या आत्याचे उदाहरण मला जवळचे आहे. A हि महिला तब्यतीने जाड जुड आहे. A चे लग्न X आडनावाच्या व्यक्तीशी होते, त्यांना B हि मुलगी होते. ती देखील जाड जुड होते. B चे लग्न Y हे आडनाव असलेल्या व्यक्तीशी होते. त्यांना C हि जाड जुड मुलगी होते. C चे अजून लग्न झाले नाही. जाडीशी संबंधित जो कोणता जीन आहे तो असा दर वेळेला आईकडून मुलीकडे चालत आला. म्हणजे तो डॉमिनेन्ट आहे. दर वेळेला पित्याचा त्या संबंधीचा जीन रिसेसिव्ह राहिला. 
5) शेळ्यांमध्ये देखील डॉमिनेन्ट व रिसेसिव्ह जीन ओळखता येणे महत्वाचे असते. म्हणून त्यासाठी आपणास प्रोजेनी टेस्टिंग करणे आवश्यक ठरते. 
6) एखाद्या शेळी किंवा बोकडात वजन वाढीचा किंवा जास्त दूध देण्याचा जो जीन आहे तो पुढच्या पिढीत येईलच असे सांगता येत नाही. म्हणून शेळ्यांचे रेकॉर्ड महत्वाचे असतात, ज्याचेवरून आपण ठरवू शकतो कि कोणत्या शेळीचा किंवा बोकडाचा कोणता गुणधर्म किंवा जीन पुढे पुढे चालत आला आहे.
7) शेळ्यांच्या अनुवांशिक सुधारणे मध्ये हि बाब नजरेआड करून चालणार नाही.
8) उदा पाहू. A हि शेळी आहे. या शेळीचा दूध जास्त देण्याचा अनुवांशिक गुणधर्म आहे. याचा अर्थ जास्त दूध देण्यासंबंधीचा तिचा जीन किंवा अनुवांशिक गुणधर्म डॉमिनेन्ट आहे. A चा हा गुणधर्म तिच्या पासून जन्मलेल्या पाठिमध्ये येतो का हे पहावे लागेल. त्यासाठी तिची 5 विते आपण 5 वेळा 5 वेगवेगळ्या बोकडकडून भरवून करू. 5 वितामध्ये समजा 5 पाठी झाल्या. आता या 5 पाठी जेंव्हा दूध द्यायला सुरवात करतील व त्यांचा आईसारखे म्हणजे A सारखे दूध देतील तेंव्हा तो जास्त दूध देण्याचा जीन डॉमिनेन्ट आहे असं म्हणता येईल.
9) दुसरे उदा पाहू. A हा बोकड आहे. कमी खाद्य खाऊन जास्त वजन वाढ देण्याचा त्याचा गुणधर्म आहे. तर हा गुणधर्म पुढे टिकतो का म्हणजे त्या संबंधीचा जीन डॉमिनेन्ट आहे का या साठी प्रोजेनी टेस्टिंग करावी लागेल. समजा या बोकडकडून 10 शेळ्या एका वेळी भरवल्या. त्या 10 शेळ्यांना 20 करडे झाली. त्यात समज 10 बोकड झाले. या 10 बोकडाची वजने जर A च्या तुलनेत बरोबरची असतील तर A मधील तो जीन डॉमिनेन्ट आहे असे म्हणावे लागेल. 

टीप:- सर्व उदाहरणे मुद्दा समजण्यासाठी दिली आहेत. उदाहरणात शास्त्रीय पद्धतींचा समावेश केला नाही.

माहिती आवडल्यास लाइक तर आवडली नसल्यास डीसलाईक करावे हि विनंती.
रेकॉर्ड:-

१) शेळी पालनातील किंवा इतर जसे म्हैस, गाय, घोडे वगैरे रेकॉर्ड्स चे महत्व सर्वश्रुत आहे.
२) पीडिग्री रेकॉर्ड हे वंशावळीचे रेकॉर्ड असते. वजने, रंग, उंची, छातीचा घेर, लांबी, आजारपण इ बाबतीची माहिती लिहून ठेवणे हे उपयोगाचे असते.
३) डॉ. तेजस शेंडे यांनी लिहिलेले माझ्या शेळ्यांची नोंदवही हि नोंदवही या बाबतीत चांगले पुस्तक आहे. हे पुस्तक नसून वही आहे.
४) रेकॉर्ड कसे ठेवायचे एवढेच बऱ्याच वेळा सांगितले जाते परंतु त्या रेकॉर्ड्स चा उपयोग कसा करायचा त्याचे विश्लेषण कसे करायचे हे सांगितले जात नाही.
५) नेट वर किंवा इतर ठिकाणी याचे संदर्भ मिळत नाहीत असा माझा अनुभव आहे, कोणाला काही संदर्भ माहित असल्यास जरूर माहिती द्यावी.
६) रेकॉर्ड हि कच्ची माहिती आहे तिचे विश्लेषण किंवा अनालिसीस केल्याशिवाय व निष्कर्षाप्रत पोहचल्याशिवाय ती पक्की होत नाही.
७) शास्रञ् ज्या पद्धती वापरतात त्या सांख्यिकी म्हणजे स्टॅटेस्टिकल असतात, बऱ्याच वेळा सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या समजण्याच्या पलीकडच्या असतात. त्यामुळे त्याचा उपयोग होताना दिसत नाही.
उदा स्टॅण्डर्ड डेव्हियेशन, कॉइफिशण्ट ऑफ व्हरीयेशन वगैरे बाबींचा शेतकरी उपयोग करू शकत नाहीत व जरी त्याचा उपयोग करता आला तरी उत्तरांचा अर्थ लावता येत नाही. M S excel मध्ये सर्व सांख्यिकीय गणिते अगदी सहज करता येतात परंतु येणाऱ्या उत्तराचे अर्थ कसे लावायचे?
८) सांख्यिकीय पद्धतीपेक्षा गणितीय पद्धती शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतात. गणितीय पद्धतीमध्ये सरासरी काढणे हि आपल्या आवडीची पद्धत! परंतु सरासरी मुळे बऱ्याच वेळा दिशा भूल होऊ शकते. काही ठिकाणी तिचं उपयोग करता येत नाही.
९) बऱ्याच वेळा एखाद्या माहितीचा सेट हा एक किंवा दोन वेगवेगळे निकष लावून गाळून घ्यायचा असतो. तेंव्हा आपणास M S एक्सेल मधील sumif, sumifs, averageif, averageifs, countif, countifs, if, if व and इ फुंकशन चा प्रभावी उपयोग करता येतो. त्यासाठी M S एक्सेल येणे आवश्यक आहे.
१०) तेंव्हा विश्लेषण कसे करावे या संबंधी कोठे काही माहिती उपलब्ध असल्यास कळवावी.

टीप:- आवडल्यास like किंवा नसल्यास dislike करावे हि विनंती.

वैक्तिक शेतकरी रेकॉर्ड ठेवतो तेंव्हा त्यात जास्त पैसे मिळविण्याच्या दृष्टीने घोटाळा केला जाऊ शकतो हे खरं आहे.

१) शेळी घेताना वजन करायचे, त्या वजनाचे मागच्या दोन वजनाशी तुलना करायची. शेळी विण्याच्या अगोदर तिचं वजन सर्वत जास्त असतं. करडं 2.5 ते 3 महिन्याची असताना तिचं वजन सर्वात कमी असतं. एका महीण्यात साधारण चार किलो वजन वाढते. या वरून आपण केलेल्या वजनाची तुलना करायची. यात साधारण 2 ते 9 किलो फरक असल्यास वजन बरोबर आहेत असे समजावे.
२) आपण केलेलं वजन व शेळीच्या छातीचा घेर मोजन आलेलं वजन याची तुलना करायची. त्यात किलो दोन किलोचा फरक निघाल्यास ठीक आहे.
३) करडू साधारण दररोज 60 ते 150 ग्राम एवढं वाढतं. सांगितलेली वजने हि झालंलेल्या वयाशी ताडून पहायची. 
४) आपण केलेलं वजन व त्यांनी केलेलं शेवटचं वजन यात किती तफावत आहे ते पाहायचं व हि तफावत किती दिवसात किती ग्राम ने येते ते पाहायचं, हे साधारण 60 ते 150 ग्राम प्रति दिवस असे येते. 
5) लिखावट, पेनची शाई, राऊंड फिगर, वजनाच्या तारखा, वहीचा कागद किती मलूल झाला इ वरून देखील त्यात काही लबाडी केली आहे का ते समजू शकत.
ब्रीडिंग प्रोग्रॅम:-

1) प्रजनन आराखडा असे मराठीत म्हणू शकू.
2) पाठीमागील पोस्ट मध्ये "स्थानिक शेळ्यांवर काम केले पाहिजे" असे मी म्हटलो होतो, तेंव्हा नक्की काय व कसे काम करायचे ते आपन या भागात पाहू.
3) हि पोस्ट केवळ स्थानिक शेळ्यांसाठी नसून सर्व प्रकाच्या शेळ्यांकरिता आहे.
4) प्रामुख्याने बंदिस्त शेळी पालनाचे तीन उद्देश सांगितले जातात-
ब्रीडिंग
ईद मार्केट
कटिंग
आपल्या कळपात नेमके कोणते गुणधर्म असावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेळ्यांच्या प्रजनणाची व कृत्रिम निवडीची पद्धतशीर आखणी करणे या कार्यक्रमाला ब्रीडिंग प्रोग्रॅम असे म्हणता येईल. 
5) ब्रीडिंग प्रोग्रॅम चे उदाहरण पाहू.
-20 शेळ्या A जातीच्या आहेत.
- सर्व शेळ्या हेट्रोजिनियस म्हणजे वेगवेगळ्या अनुवांशिक गुणधर्माच्या आहेत.
- दर वर्षी 20 टक्के शेळ्या बदलायच्या आहेत. पैकी 10 टक्के नवीन शेळ्या आपल्याच कळपातील ठेवायच्या तर 10 टक्के दुसऱ्या कळपातून विकत आणून ठेवायच्या.
- सर्व शेळ्यांचे रेकॉर्ड ठेवायचे
- दर वर्षी कळपातील सर्वोत्तम 10 टक्के शेळ्या निवडून त्यांचे पासून मिळणाऱ्या पाठी पुढे पाळण्यासाठी संभाळायच्या आहेत.
- कळपातील सर्वोत्तम शेळीचा बोकड दर वर्षी किंवा दर दीड वर्षांनी लागवडीसाठी राखायचा.
- नवीन बोकड लागवडीयोग्य झाल्यावर जुना बोकड विकायचा आहे.
6) वरील उदाहरणाचे विश्लेषण करू.
- दर वर्षी 10 टक्के शेळ्या या कळपातील सर्वोत्तम शेळ्यांच्या पाठी असतील तर 10 टक्के नवीन शेळ्या असतील म्हणजेच नवीन 10 टक्के जेनेटिक मटेरियल आपल्याला मिळेल.
- आपल्याच कळपातील सर्वोत्तम शेळीचा बोकड ठेवणार असल्याने त्याची प्रोजेनी टेस्टिंग करायची अवश्यकता नाही. 
- दर वर्षी सर्वोत्तम शेळ्या बदलू शकतात.
- सर्वोत्तम निवडलेल्या शेळी मध्ये कळपा बाहेरून आणलेल्या एखाद्या शेळीचे अनुवांशिक गुणधर्म कळपातील शेळ्या पेक्षा चांगले असल्यास ती निवडली जाईल. व ते अनुवांशिक गुणधर्म पुढे टिकवता येतील.
- कळपातील बोकड व शेळ्या ठेवल्याने अनुवांशिक गुणधर्मात हानी न होता योग्य व उत्पादन वाढीसाठी अनुरूप जनुके पूढच्या पिढीत हस्तांतरित होतील.
- हळू हळू कळपातील हलक्या प्रतीची जनुके नाहीशी होतील तसेच कमी उत्पादन देणाऱ्या शेळ्या देखील काढून टाकल्या जातील. 
- इन ब्रीडिंग ची टक्केवारी 70 टक्केच्या आसपास राहील. 
- या प्रोग्रॅम मध्ये 90 टक्के इन ब्रीडिंग व 10 टक्के आऊट क्रॉसिंग असे प्रमाण राहील.
- आपण नेहमी बोकड बाहेरून आणून आऊट क्रॉसिंग करतो परंतु इथे शेळ्या बाहेरून आणून आऊट क्रॉसिंग होईल.
- या प्रोग्रॅम मध्ये बोकडाला कमी महत्व असून शेळ्यांच्या निवडीला जास्त महत्व दिले आहे.
7) वरील ब्रीडिंग प्रोग्रॅम स्थानिक शेळ्यांच्या अनुवांशिक सुधारणे साठी उपयुक्त वाटतो. इतर जातींच्या शेळ्यांसाठी वेगळा प्रोग्रॅम वापरावा.
8) कोणत्याही ब्रीडिंग प्रोग्रॅम मध्ये इन ब्रीडिंग, आऊट क्रॉसिंग व क्रॉस ब्रीडिंग या पद्धतींचा गरजेनुसार प्रमाणबद्ध वापर केला जातो.
9) उद्देशानुसार एका शेळ्यांच्या कळपासाठी एक ब्रीडिंग प्रोग्रॅम आखावा.
10) गरजेनुसार व उद्देशानुसार असंख्य ब्रीडिंग प्रोग्रॅम तयार केले जाऊ शकतात.
11) योग्य ब्रीडिंग प्रोग्रॅम अमलात आणला नाही तर शेळ्यांची अनुवांशिक गुणांची हानी होऊ शकते.
12) शेळ्यांचे गुणधर्म जसे जुळे देण्याचे प्रमाण, वजन, रंग, बोकडाचा देखने पणा, दूध देण्याची क्षमता इ बाबी विचारात घेऊन शेळ्यांची निवड करावी. 

चेतावणी- वरील माहिती चा प्रत्यक्ष वापर स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही नुकसानीस मी(बाळू मोटे) जबाबदार राहणार नाही.
आऊट क्रॉस out cross:-

1) सर्वसाधारण बंदिस्त शेळीपालनात आऊट क्रॉसिंग हि पद्धत वापरात आहे. दर 2 ते 3 वर्षांनी बोकड बदलणे, बोकड दुसऱ्या कळपातील वापरणे, नात्यातील शेळ्या त्या बोकडकडून न भरवने इ बाबी शेळी पालक सांभाळतात.
2) आपण एक थेरोटीकल उदाहरण घेऊ. A जातीचा शेळ्यांचा कळप आहे. आता हि A जात homogenous म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीने एकसारखी आहे असे समजू. याचा अर्थ या जातीतील शेळ्यांची वजने, रंग, उंची, तीन महिने वयाच्या करडांची वजने इ बाबतीत किमान साधर्म्य आहे. 20 शेळ्या गृहीत धरू. या 20 पैकी दर वर्षी 20टक्के शेळ्या बदलणार आहोत व त्या जागी नवीन पाठी ठेवणार आहोत. आउट क्रॉसिंग साठी आपणास A जातीचाच परंतु दुसऱ्या कळपातील चांगला देखणा वजनदार व जातीचे सर्व गुण दाखवणारा बोकड वापरायचा आहे. या सुरवातीच्या बोकडला आपण Ba असे नाव देऊ. Ba हा बोकड आपण दोन वर्षासाठी व 3 वितांसाठी वापरणार आहोत. Ba बोकडपासून तयार होणाऱ्या पाठींना आपण ABa असे नाव देऊ. 2 वर्षानंतर कळपातील शेळ्यांची संख्या खालील प्रमाणे होईल- 
A- 12
ABa-8
3 र्या व 4 थ्या वर्षासाठी आपण Ba1 हा सर्वगुण संपन्न व A या जातीचा परंतु दुसऱ्या कळपातील बोकड लागवडीसाठी घेतला. त्याच्यापासून मिळणाऱ्या पाठीची नावे अनुक्रमे ABa1व ABaBa1 अशी ठेऊ. आता आपली कळप संख्या खालील प्रमाणे असेल-
A-4
ABa-8
ABa1-4
ABaBa1-4
5व्या व 6व्या वर्षयासाठी आपण A जातीचा परंतु दुसर्या कळपातील सर्व गुणसंपन्न Ba2 हा बोकड आणला. त्याच्यापासून मिळणाऱ्या पाठींना आपण अनुक्रमे पुढील नावे देऊ- ABaBa2, ABa2, ABaBa1Ba2
कळप संख्या खालील प्रमाणे-
A-0
ABa-4
ABa1-4
ABaBa1-4
ABa2-4
ABaBa1Ba2-4
3) आता आपण वरील उदाहरणाचे विश्लेषण करू-
- होमोजिनियस म्हणजे उत्पादयातील साधरम्याच्या दृष्टीने किमान पातळीवर असणारा मुळचा कळप शेवटी हेट्रोजिनियस म्हणजे वेगवेगळ्या अनुवांशिक गुणधर्माची सरमिसळ असलेला झाला.
- वरील उदाहरणात आपण 3 बोकड वापरले, प्रत्येक बोकडचे अनुवांशिक गुणधर्म हे चांगले व वाईट असे दोन्हीही असतात तेंव्हा शेवटच्या टप्प्यातील कळप हा चांगल्या वाईट गुणांनी भरलेला असेल.
- शेवटी मूळ जात नष्ट झाली व हळू हळू तिचा जेनेटिक शेअर कमी होत गेला.
- मूळ जात नष्ट किंवा कमी होण्यास फारच कमी कालावधी लागला, त्यामानाने होमोजिनियस जात निर्माण करण्यासाठी बराच कालावधी लागतो.
- कितीही चांगला बोकड आणला तरी जेनेटिक कॉम्बिनेशन प्रत्येक शेळीनुसार वेगवेगळी होत असल्याने सरासरी मांस उत्पादन एका ठराविक लेव्हल पेक्षा जास्त वाढवता येणार नाही. कारण मांस उत्पादन वाढीसाठी आवश्यक जीन्स काही कालावधीनंतर नष्ट होतील व त्यांची जागा जास्त मांस उत्पादन करणारे व कमी मांस उत्पादन करणारे जीन्स घेतील. दोघांचा वाटा 50-50 टक्के असेल, त्यामुळे मांस उत्पादन एका ठराविक लेव्हल वर येऊन थांबेल.
4) आऊट क्रॉसिंग तेंव्हा फायद्याचे ठरेल जेंव्हा तुमच्याकडे असणाऱ्या शेळ्यांचे उत्पादन अतिशय सुमार असेल. काही कालावधीपुरते आऊट क्रॉसिंग करून पुन्हा इन ब्रीडिंग कडे वळणे श्रेयस्कर राहील.
5) इन ब्रीडिंग मूळे आपल्या कळपाची स्वतंत्र ओळख तयार होईल तर आऊट क्रॉसिंग मुले आपण इतर शेळीपालकांच्या समनुपती राहू.
6) आऊट क्रॉस करताना वापरावयाचा बोकड प्रोजेनी टेस्टिंग केलेला असणे आवश्यक आहे. तरच उत्पादन वाढीची खात्री देता येईल.
7) आऊट क्रॉसिंग मूळे जातीची शुद्धता टिकते परंतु अनुवांशिक गुणधर्मामधे मोठ्या प्रमाणात विविधता येते.
8) जनुकीय विविधतेमुळे आऊट क्रॉस केलेल्या शेळ्या एकाच वेळी एकाच रोगाला सर्व च्या सर्व बळी पडणार नाहीत. त्या रोगविरुद्ध काहींची प्रतिकार शक्ती चांगली असेल तर काहींची हलक्या प्रतीची असेल.
9) या पद्धतीत कोणत्याही अनुवांशिक गुणधर्मस मग तो चांगला असो किंवा वाईट पुढे पुढे जाता येत नाही. किंवा तो गुणधर्म पुढे टिकवून ठेवता येणार नाही. परंतु त्या जातीचे गुणधर्म मात्र टिकून राहतील. 
10) आऊट क्रॉसिंग व कारडांची मरतुक कमी जास्त होण्याचा काही संबंध नाही.
11) सर्वसाधारणपणे ब्रीडिंगच्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार पुढील प्रमाणे कालावधी लागेल- इन ब्रीडिंग सह कृत्रिम निवड (6 ते 14 वर्षे), आऊट क्रॉसिंग (6 ते 10 वर्षे), क्रॉस ब्रीडिंग ( 4 ते 6 वर्षे). अश्या पद्धतीने आऊट क्रॉसिंग हा उत्पादन वाढ मिळवण्यासाठीचा मध्यम मार्ग ठरतो.
12) समजा कळपातील शेळ्यांची 3 महिने वयाच्या करडांच्या वजनाची सरासरी हि 12 किलो अशी आहे तर बोकडाची प्रोजेनी टेस्टिंग मध्ये करडांच्या वजनाची सरासरी हि 12 किलो पेक्षा जास्त हवी तरच उत्पादन वाढीसाठी त्या बोकडाचा उपयोग होईल. दर वेळेला हि आकडेवारी तपासून बोकड निवडणे योग्य राहील.

सूचना:- वरील माहिती पुस्तकी ज्ञानावर आधारित असून प्रत्यक्ष उपयोग करतेवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानीस लेखक या अर्थाने मी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
शेळ्यांच्या उत्पादन वाढीचे गणित:-

शेळ्यांच्या उत्पादन वाढीमध्ये पशु अनुवंश शास्त्र म्हणजेच जेनेटिक शास्त्राचा किती वाटा आहे हे आपण पाहिलं पाहिजे.
Genetic factor+environmental factor=production
वरील गणितावरून हे लक्षात येते कि शेळ्यांच्या अनुवांशिक गुणधर्मना दुय्यम स्थान दिले तर उत्पादनामध्ये घट निश्चित येईल. आपण अनुवांशिक गुणधर्मस 50 genetic factor गुण तर व्यवस्थापन व वातावरण environmental factor याला 50 गुण दिले तर आपणास चांगले उत्पादन 100 मिळेल. गणितीय पद्धतीनुसार यातील कोणाचेही गुण कमी केल्यास आपणास तेवढ्या प्रमाणात उत्पादन कमी मिळेल. तुमच्याकडे चांगले व्यवस्थपन आहे ,चारा चांगला आहे एकूणच वातावरण चांगले आहे परंतु शेळ्यांचे अनुवांशिक गुणधर्म चांगले नसतील तर उत्पादन वाढ मिळणार नाही. याच्या विपरीत परिस्थिती vice versa असेल तरीही उत्पादन वाढ मिळणार नाही.
माझ्या मते चांगले उत्पादन देण्याचे अनुवांशिक गुणधर्म हे इतर कोणत्याही बाबीपेक्षा जरा जास्तच महत्वाचे आहेत. म्हणूनच आज आपणास बोअर शेळी 1600 ते 4000 रु किलो ने विकत घ्यावी लागते. व्यवस्थापन व वातावरण हा स्थिर दृश्य भाग आहे परंतु चांगले उत्पादन देण्याचे अनुवांशिक गुणधर्म हे अस्थिर व अदृश्य भाग आहे, आणि म्हणून शेळ्यांच्या अनुवांशिक गुणधर्माचा सखोल अभ्यास करणे हे शेळी पालकाचे प्रथम लक्ष असावे. चांगला ब्रीडिंग प्रोग्रॅम आखला व अमलबजावणी केली तर दर वर्षागणिक शेळ्यांची अनुवांशिक गुणधर्मात सुधारणा होऊन चांगले उत्पादन चढत्या क्रमाने मिळू शकते. या उलट चांगल्या अनुवांशिक गुणधर्माच्या शेळ्या खरेदी केल्या, सुरवातीला चांगले मांस उत्पादन मिळू लागले तरी जर सुधारणावादी ब्रीडिंग प्रोग्रॅम राखला नाही तर काही वर्षांनी तेच व्यवस्थापन व वातावरण असून देखील मांस उत्पादन खालावले जाईल यात शंका नाही.

बहुतांश प्रशिक्षणे, पुस्तके यातून शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे काय खायला घालावे, खुराक वैगरे बाबतीत माहिती दिली जाते परंतु शेळ्यांच्या उत्पादनाच्या दृष्टीने ज्याचा थोडा जास्तच वाटा आहे अश्या अनुवांशिक सुधारणा या विषयावर फार माहिती दिली जात नाही.
शेळी पालक म्हणून आपण हि माहिति मिळवायला हवी इतकच मी सांगेन.

टीप:- वरील माहितीचा स्वतःच्या जबाबदारीवर व तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा, कोणत्याही नूक्सनीस मी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी

शेळी पालनातील एक चुकीचा पायंडा (माझे वैक्तिक मत):-

१】शेळी पालन व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आपण प्रशिक्षणे घेतो, अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घेतो तसेच पुस्तके वाचून माहिती मिळवतो. या सर्वातून लागवडीच्या बोकडाबाबतीत एक समान माहिती मिळते.
२】बोकड हा नेहमी 2 ते 3 वर्षांनी बदलला पाहिजे. शक्यतो दुसऱ्या कळपातील बोकड असावा. आपल्या कळपातील बोकड ठेवल्यास कर्डांमध्ये विकृती निर्माण होऊ शकते. जवळच्या नात्यातील बोकडकडून शेळ्या भरवू नयेत. इ. इ. इ.
३】 मुद्दा क्रमांक दोन बद्दल मी सहमत नाही व माझा त्यात सांगितलेल्या पद्धतीवर आक्षेप आहे.
४】 माझ्या मते बोकड हा तुमच्याच कळपातील असावा, दुसऱ्या कळपातून बोकड आणू नये, त्याच्या वयाच्या सर्वोच्च किंमतीला जेंव्हा तो विकण्यायोग्य होईल तेंव्हा त्याला विकावे व तो पर्यन्त त्याचा प्रजननासाठी उपयोग करावा.
५】आपल्या कळपातील बोकडाची अनुवंशिकता आपल्याला माहित असते, प्रोजेनी टेस्टिंग एक वेळ नाही केली तरी चालू शकते. बोकड आपल्या स्वतः चा असतो त्यामुळे बोकड खरेदीचा खर्च वाचतो. आपल्या कळपात जे गुण आपल्याला आणावयाचे आहेत व जे अवगुण आपल्याला काढून टाकवायचे आहेत ते केवळ आपल्या कळपातील बोकड असल्यावरच शक्य होईल. बोकडाच्या नात्यातील शेळ्या भरवल्या गेल्यास f1 ते f4 पर्यंत कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण होण्याची शक्यता कमी असते कारण f4 पर्यंत इन ब्रीडिंग ची टक्केवारी हि साधारण 60 टाक्याच्या आसपास पोहचते. हि टक्केवारी शेळीच्या नात्यावर अवलंबून आहे, जितके जवळचे नाते तितकी टक्केवारी जास्त तर जितके दूरचे नाते तितकी टक्केवारी कमी असेल. 60 टक्के याचा अर्थ असा कि त्या बोकडपासून तयार झालेल्या करडाचे 60 टक्के गुणसूत्र (रक्त) हे बोकडकडून आलेली आहेत. आणि तसेही नॉर्मल परिस्थितीत 50 टक्के गुणसूत्रे हि बोकडकडून येतातच त्यात फक्त 10 ते 15 टक्क्यांची वाढ होते. त्याने प्रजनांनावर फारसा फरक पडणार नाही.
६】 आपल्याच कळपातील बोकड वापरल्यास इन ब्रीडिंग, लाईन ब्रीडिंग, बॅक क्रॉस इ प्रकारचे ब्रीडिंग चे प्रकार हे आपोआपच अमलात येतात. त्यांचे रेकॉर्ड ठेवणे मात्र गरजेचे असते. असं होत असल्यामुळे म्हणजे इन ब्रीडिंग होत असल्यामुळे बहुतांश तज्ज्ञ कळपातील बोकड वापरायला सांगत नाहीत.
७】 आपल्याच कळपातील बोकड वापरावा या माझ्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मी एक उदाहरण देईन. आपण थेट जंगलात जाऊ. कळप करून राहणारे वेगवेगळ्या प्राण्यांच्या जाती आपणास पहावयास मिळतील. यातील बहुतांश कळपात इन ब्रीडिंग चालते. हरीण हा प्राणी शेळ्यांशी साधर्म्य असलेला आहे. हरणांच्या कळपाचा प्रमुख नर हा कळपातील जवळपास सगळ्या माद्या भरवत असतो. त्यातील बऱ्याच त्याच्या जवळच्या नात्यातील तर काही लांबच्या नाट्यातील असतात. जो पर्यंत तो नर स्ट्रॉंग आहे प्रजननक्षम आहे तो पर्यंत त्याची जागा दुसरा कोणी घेत नाही, म्हणजे तोपर्यंत इन ब्रीडिंग चालते. भांडणामध्ये या नरास हरवून दुसरा नर जर जिंकला तर तो कळप त्याच्या मालकीचा होतो. हे अपना सर्वांस माहित आहे. हरणांच्या कळपात इन ब्रीडिंग मूळे काही विकृती अली असं माझ्या ऐकिवात नाही.
७】मानवी नातेसंबंधाची आणि शेळ्यांच्या नातेसंबंधांची आपण गल्लत करतो कि काय? मामाच्या मुलीशी लग्न केल्यानंतर बरयाच जोडप्यामध्ये सेक्स लिंक्ड रोग उदा सिकल सेल अनेमिया, रात अंधळेपणा, हिमोफिलिया इ होतात. काही समाजमध्ये नात्यातील मुलीशी लग्न केल्यामुळे त्या समाजातील मुलांमध्ये विकृती निर्माण झाल्याचे ऐकिवात असते. या सर्व बाबींचा आपण थेट संबंध शेळ्यांच्या प्रजननाशी जोडतो असे नाही काय? शेळी हा प्राणी आहे तेथे नैसर्गिक निवड तसेच कृत्रिम निवड चालते. मानवामध्ये मात्र तसे नाही. नैसर्गिक निवडीच्या तत्वात मानवाने हस्तक्षेप केला आहे आणि कृत्रिम निवड मानवत केली जात नाही. उदा मामाच्या मुलीशी लग्न केलं आणि होणाऱ्या अपत्यास हिमोफिलिया हा रोग झाला तर आपण आधुनिक मेडिकल सायन्स चा उपयोग करून त्या मुलाला वाचवतो व त्याचे लग्न लावून देतो. अश्या तर्हेने हिमोफिल्यास कारणीभूत असलेला जिन पुढच्या पिढीत जातो. येथे निसर्ग निवडीचे तत्व लागू केल्यास ज्यास हिमोफिलिया झाला आहे त्याचा लग्नापूर्वीच मृत्यू होईल व तो जिन पुढे जाणार नाही.
शेळ्यांमध्ये असे कोणते सेक्स लिंक्ड रोग आहेत जे इन ब्रीडिंग केल्याने निर्माण होतात, माझ्या माहितीत तर एकही नाही. इन ब्रीडिंग केल्याने नेमकी कोणती विकृती निर्माण होते किंवा मरतुकीचे प्रमाण नेमके किती वाढते?
८】 जसे हरणांच्या कळपात नैसर्गिक निवड व इन ब्रीडिंग होत असते तसे शेळ्याच्या कळपात नैसर्गिक निवडीला आपण संधी देत नाही. म्हणून शेळ्यांमध्ये इन ब्रीडिंग सोबत कृत्रिम निवड पद्धत अवलंबिल्यास कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण होणार नाही व मरतुक हि होणार नाही. शेळ्यांची अनुवांशिक सुधारणा मात्र घडून येईल. कोणत्याही प्रकारची जनुकीय हानी न होता उत्पादनक्षमता वाढवण्याचा हा राज मार्ग आहे.
९】 हि पद्धत रेस चे घोडे, कुत्री जसे डॉबरमन काही देशामध्ये मांजरे इ साठी वापरली जाते. शेळयात वापरली तर काय होईल?
१०】 धनगर किंवा मेंढपाळ हीच पद्धत वापरतात. त्यांचेकडे कुठे विकृती निर्माण झाल्याचे किंवा मरतुक वाढल्याचे माझ्या पाहण्यात नाही.
११】 दर वेळेला आपण त्याच जातीचा पण वेगळा बोकड वापरत गेलो तर आपल्या कळपत मोठ्या प्रमाणात वैविध्यता येईल. काही शेळ्याची कारडांची वाढ झपाट्याने होणार नाही तर काहींची झपाट्याने होईल. दूध उत्पादनाबाबतीत प्रत्येक शेळीत कमालीचा फरक दिसेल. या उलट आपलाच बोकड ठेवलंयास बहुतांश शेळ्या ह्या उत्पदानाच्या दृष्टीने समान पातळीवर येतील.

टीप:- वरील माहितीचा उपयोग करवायाचा असलयास तज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणत्याहि वाईट परिनामास व आर्थिक नुकसानइस मी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.